श्री गुरुगीतेतील निवडक श्लोक मराठी अर्थासह

नाथसंविध्
।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।।

श्री गुरुगीतेतील निवडक श्लोक मराठी अर्थासह

सद्गुरुची खरीखुरी महती सांगणारी श्री गुरुगीता आम्हा सर्वसामान्य भक्तांना सद्गुरुंची भक्ती-सेवा
कशी करावी? याचे सहज सुलभ मार्गदर्शन करते. गुरुगीतेला वैदिक भक्ती प्रवासात अढळ स्थान आहे.
ही संपूर्ण गुरुगीता खुपच सुंदर, विलक्षण आहे. त्यातील प्रत्येक श्लोक-पद आम्हाला सद्गुरु तत्वाची
ओळख करून देतात. या गुरुगीतेमधील काही निवडक श्लोक मराठी अर्थासह देत आहोत. यावरून
गुरुगीतेचे माहात्म्य लक्षात येईल.

शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसाम्।
गुरुपादोदकं सम्यक संसारार्णवतारकम्।।
सद्गुरुचरणांचे जल हे पापरूपी चिखल सुकविणारे आहे, ज्ञानाचे तेज वाढविणारे आहे व संसाररूपी
सागरातून नीट पलीकडे नेणारे आहे.

अज्ञानमूलहरणं जन्मकर्मनिवारणम्।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं गुरुपादोदकं पिबेत्।।
अज्ञानाचे मूळच नष्ट करणारे, जन्म व कर्म दूर करणारे असे सद्गुरु चरणांचे जल ज्ञान व वैराग्य
अंगी बाणण्यासाठी प्राशन करावे.

काशीक्षेत्रं तन्निवासो जाह्नवी चरणोदकम्।
गुरुर्विश्वेश्वर: साक्षात् तारकं ब्रह्म निश्चितम्।।
सद्गुरु जेथे राहतात तेच काशीक्षेत्र जाणावे, त्यांचे चरणोदक हीच गंगा, सद्गुरु हेच साक्षात विश्वनाथ
(काशी येथील शिवस्थान) व सद्गुरु हेच तारक असे ब्रह्म होय हे निश्चित आहे.

गुरो: पादोदकं यत्तु गयाऽसौ सोऽक्षयो वट:।
तीर्थराज: प्रयागश्च गुरुमूर्ते नमो नम:।।
सद्गुरुंचे चरण जल जे आहे तेच गया; सद्गुरु हेच अक्षय्य वटवृक्ष आहेत. सद्गुरु हेच श्रेष्ठ असे
प्रयागतीर्थ आहे. हे सद्गुरुराया तुला नमस्कार.

गुरुमूर्तिं स्मरेन्नित्यं गुरुनाम सदा जपेत्।
गुरुराज्ञां प्रकृर्वीत, गुरोरन्यन्न भावयेत्।।
सद्गुरुंच्या मुर्तीचे नित्य ध्यान करावे, सद्गुरुनामाचा जप करावा. सद्गुरूंची आज्ञा पाळावी व
सद्गुरूशिवाय अन्य कोठेही भाव ठेवू नये, सर्वत्र एकच सद्गुरुभाव ठेवावा.

अनन्यश्चिन्तो मां, सुलभ परमं पदम्।
तस्मात्सर्वप्रयत्नेन, गुरोराराधनं कुरु।।
माझे अनन्य चिन्तन करणाऱ्यांना परमश्रेष्ठ पद सहज प्राप्त होते, म्हणून माझ्याशी एकरूपच अशा
सद्गुरूंची हरएक प्रयत्नाने आराधना करा.

त्रैलोक्यस्फुटवक्तारो, देवाद्यसुरपन्नगा:।
गुरुक्त्रस्थिता विद्या गुरुभक्त्या तु लभ्यते।।
त्रैलोक्यात ज्यांची कीर्ती आहे असे काही श्रेष्ठ देव, असुर व पन्नग इत्यादी स्पष्टवक्ते, उपदेशक व
वक्ते आहेत, पण जी विद्या सद्गुरुमुखात निवास करते ती मात्र फक्त सद्गुरुभक्तीनेच प्राप्त होते.

गुकारस्त्वन्धकारश्च रुकारस्तेज उच्यते।
अज्ञानग्रासकं ब्रह्म, गुरुरेव न संशय:।।
‘गुरु’ या शब्दातील ‘गु’ हे अक्षर म्हणजे अंधार (अज्ञान) व ‘रु’ हे अक्षर प्रकाश (ज्ञान) होय, असे
म्हटले जाते. ‘सदगुरु’ हेच अज्ञान नाहीसे करणारे ब्रह्म आहे यात काही संशय नाही.

कर्मणा मनसा वाचा नित्यमाराधयेद्गुरुम्।
दीर्घदण्डं नमस्कृत्य निर्लज्जो गुरुसन्निधौ।।
शरीरमिन्द्रियं प्राणं सद्गुरुभ्यो निवेदयेत्।
आत्मदारादिवंâ सर्वं सद्गुरुभ्यो निवेदयेत्।।
आपले कर्म, मन, वाणी यांनी सद्गुरुंची नेहमी उपासना करावी. सद्गुरुंसमोर लज्जा न बाळगता सरळ
साष्टांग नमस्कार करावा. आपले शरीर, इंद्रिये, प्राण यासह आपल्या सर्व गोष्टी सद्गुरुंना अर्पण
कराव्यात.

कृमिकीटभस्मविष्ठा-दुर्गन्धिमलमूत्रकम्।
श्लष्मरक्तंर त्वचा मांसं वंचयेन्न वरानने।।
हे वरानने (सुवदने), आपले शरीर जरी कृमी, कीटक, भस्म, विष्ठा, दुर्गंधी मल, मूत्र, शेंबूड, रक्त,
त्वचा व मांस यांचे बनलेले असले तरी तेही सद्गुरुंना अर्पण केल्यावाचून राहू नये. तेही सद्गुरुंच्या
कारणी लावावे.

गुरुर्बह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।
गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम:।।
सद्गुरु हेच ब्रह्म-विष्णू-महेश्वर आहेत, परब्रह्म आहेत. अशा सद्गुरुंना माझे नमन असो.

यदंघ्रिकमलद्वंद्वं द्वंद्वतापनिवारकम्।
तारकं सर्वदाऽऽपद्भ्य: श्रीगुरुं प्रणमाम्यहम्।
ज्यांचे चरणद्वय हे शीतोष्णादि द्वंद्वांचा ताप निवारण करणारे व सर्व काळी संकटातून तरून नेणारे
आहेत त्या श्रीसद्गुरुंना नमन असो.

शिवे क्रुद्धे गुरुस्त्राता गुरौ
क्रुद्धे शिवो न हि।
तस्मात्सर्वप्रयत्नेन श्रीगुरुं शरणं व्रजेत्।
शंकर आपल्यावर रागावले तरी सद्गुरु आपले रक्षण करतील, पण सद्गुरु जर रागावले तर शंकरही
आपले रक्षण करू शकणार नाही. म्हणून हर प्रयत्नाने श्रीसद्गुरुंंनाच पूर्णपणे शरण जावे.

अ-त्रिनेत्र: सर्वसाक्षि अ-चतुर्बाहुरच्युत:।
अ-चतुर्वदनो ब्रह्मा
श्री गुरु: कथित: प्रिये।।
हे प्रिये पार्वती तीन नेत्र नसलेला पण सर्व काही पाहणारा (शंकर), चार बाहू नसणारा पण अच्युत
(विष्णु), चार मुखे नसणारा पण ब्रह्मा असा सद्गुरु आहे असे म्हटले आहे. (बाह्य लक्षणे नाहीत पण
तिन्ही देवांचे ऐश्वर्य सद्गुरुंच्या ठिकाणी आहे.)

स्वदेशिकस्यैव शरीरचिन्तनम्।
भवेदनन्तस्य शिवस्य चिन्तनम्,
स्वदेशिकस्यैव च नामकीर्तनम्,
भवेदनन्तस्य शिवस्य कीर्तनम्।।
स्वत:च्या सद्गुरुंच्या मूर्तीचे ध्यान केले म्हणजे अनंत अमर्याद अशा शंकराचेच चिन्तन होईल आणि
स्वत:च्या सद्गुरुंचे नामसंकीर्तन केले तर तेही अनंत अशा शिवाचेच कीर्तन होईल. (कारण गुरु व शिव
यात एकरूपता आहे.)

यत्पादरेणुकणिका कपि संसारवारिधे:।
सेतुबंधायते नाथं देशिवंâ तमुपास्महे।।
ज्यांच्या चरणांच्या धुळीचा एखादा कणही संसारसागरातून तरून जाण्यासाठी एखादा सेतू असावा तसा
ठरतो, त्या सद्गुरुची आम्ही उपासना करतो.

यस्मादनुग्रहं लब्ध्वा महदज्ञानमुत्सृजेत।
तस्मै श्रीदेशिकेन्द्राय, नमश्चाभीष्टसिद्धये।।
ज्यांच्या कृपेचा लाभ झाल्यास महान अज्ञान नष्ट होते त्या श्रेष्ठ अशा सद्गुरूंना माझे अभीष्ट साध्य
व्हावे म्हणून नमन करतो.

सर्वश्रुतिशिरोरत्न-विराजितपदांबुज:।
वेदान्ताम्बुजसूर्या यस्तस्मै श्रीगुरवे नम:।।
ज्यांचे चरणकमल वेदांतील सर्वश्रेष्ठ वाक्यरत्नांनी सुशोभित झालेले आहेत आणि जे स्वत: वेदान्तरुपी
कमलाला उमलविणारे सूर्यच आहेत, अशा श्रीसद्गुरुंना नमन असो. (गुरुच वेदांताचे रहस्य उलगडून
दाखवतात.)

यस्य स्मरणमात्रेण, ज्ञानमुत्पद्यते स्वयम्।
य एव सर्वसंप्राप्तिस्तस्मै श्रीगरवे नम:।।
ज्यांचे नुसते स्मरण केले तरी ज्ञान आपल्या बुद्धीत आपोआप उत्पन्न होते व जे स्वत: म्हणजेच सर्व
इष्ट गोष्टींची प्राप्ती असते, कुतार्थता असते, अशा श्रीसद्गुरुंना वंदन असो.

अनेकजन्मसंप्राप्त-सर्वकर्मविदाहिने।
स्वात्मज्ञानप्रभावेण तस्मै श्रीगुरवे नम:।।
जे स्वत:च्या आत्मज्ञानाच्या प्रभावाने अनेक जन्मांत अर्जित केलेले सर्व कर्म (साधकाचे, शिष्याचे
पूर्वकर्म) जाळून टाकतात, त्या श्रीसद्गुरुंना वंदन असो.

न गुरोरधिकंत्त्वं न गुरोरधिकं तप:।
तत्त्व ज्ञानात्परं नास्ति
तस्मै श्री गुरुवे नम:।।
सद्गुरूपेक्षा श्रेष्ठ तत्त्व नाही, सद्गुरुसेवेपेक्षा श्रेष्ठ तप नाही, सद्गुरुप्रद आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ असे
तत्त्व (सार) दुसरे नाही, असा ज्यांचा महिमा आहे त्या श्रीसद्गुरूंना वंदन असो.

मन्नाथ: श्रीजगन्नाथो मद्गुरुस्त्रिजगद्गुरु:।
ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नम:।।
माझे गुरुनाथ हेच जगाचे नाथ (श्रीविष्णु) आहेत, माझे सद्गुरु हेच तिन्ही जगांचे गुरु आहेत, त्यांच्या
कृपेनेच मला अशी अनुभूती आली आहे की, माझे आत्मस्वरूप सर्व भूतमात्रांच्या आत्मस्वरूपांशी
एकरूप आहे, अशा श्रीसद्गुरूंना वंदन असो.

ध्यानमूलं गुरोर्मूति: पूजामूलं गुरो: पदम्।
मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरो: कृपा।।
सद्गुरुचीं मूर्ती हेच ध्यानाचे सार, सद्गुरूचरण हेच पूजेचे सार, सद्गुरुवचन हेच मंत्राचे सार व
सद्गुरूकृपा हेच मोक्षाचे सार होय.

यस्मात्परतरं नास्ति नेति नेतीति वै श्रुति:
मनसा वचसा चैव
नित्यमाराधयेद् गुरुम्।।

ज्या सद्गुरुंपेक्षा श्रेष्ठ काही नाही व वेदही ‘न इति न इति’ असे म्हणून ज्यांचे वर्णन करू शकले
नाहीत त्या ब्रह्मरूप श्रीसद्गुरूंची मनाने व वाणीनेही नित्य आराधना करावी.
श्रीमत्परब्रह्म गुरुं स्मरामि,
श्रीमत्परब्रह्म गुरुं वदामि।।
श्रीमत्परब्रह्म गुरुं नमामि,
श्रीमत्परब्रह्म गुरुं भजामि।।
श्रीमत् परब्रह्म अशा सद्गुरुंचे स्मरण करतो, त्याचेच नाम घेतो, त्यांनाच वंदन करतो व त्यांचीच
भक्ती करतो.

गुरुगीतात्मवंâ देवि शुद्धतत्वं मयोदितम्।
भव्यव्याधिविनाशार्थं स्वयमेव जपेत्सदा।।
हे देवी, मी हे गुरुगीता रूपी शुद्ध तत्वच सांगितले आहे. संसारताप नष्ट करण्यासाठी याचा स्वत:च जप
करावा, हे नित्य म्हणावे.

अनंतफलमाप्नोति गुरुगीताजपेन तु।
सर्वपापप्रशमनं सर्वदारिद्यनाशनम्।।
गुरुगीतेच्या जपाने सर्व पापे नष्ट होतात. सवे प्रकारचे दारिद्र्य नष्ट होते व माणसाला अनंत फल
प्राप्त होते.

कालमृत्युभयहरं सर्वसंकटनाशनम्।
यक्षराक्षसभूतानां चोरव्याघ्रभयापहम्।
हे गुरुगीता स्तोत्र मृत्यूचे भय हरण करणारे, सर्व आपत्ती नष्ट करणारे, यक्ष, राक्षस, भेतेखेते, चोर,
वाघ यांचे भय दूर करणारे आहे.

महाव्याधिहरं सर्वं विभूतिसिद्धिदं भवेत्।
अथवा मोहनं वश्यं स्वयमेव जपेत्सदा।।
हे गुरूगीतारूप स्तोत्र सर्व प्रकारच्या महाव्याधी नष्ट करणारे, वैभव आणि सिद्धी देणारे होईल. यात
मोहिनी व वंशीकरण या शक्तीही आहेत. याचा जप स्वत:च करावा.

असिद्धं साधयेत्कार्यं नवग्रहभयापहम् ।
दु:स्वप्ननाशनं चैव सुस्वप्नफलदायकम्।।
जे कार्य यशस्वी झालेले नसेल ते यशस्वी करणारे, नवग्रहांचे भय दूर करणारे, वाईट स्वप्ने नष्ट
करणारे व चांगल्या स्वप्नांचे फळ देणारे असे हे स्तोत्र होवो.

You cannot copy content of this page