किर्तीचक्र पुरस्कार प्राप्त श्री. संतोषसिंह राळे यांची शौर्यगाथा
।। हरि ॐ ।।
आज आपण ऐकणार आहोत एका बापू भक्ताची एक अशी शौर्य गाथा, जी ऐकून हृदयाचे ठोके चुकले नाहीत तर नवलच.
श्री. संतोषसिंह तानाजी राळे. राहणार, राजगुरूनगर, जिल्हा पुणे. सध्याचे वय अवघे तेहतीस वर्षे. घरी पत्नी आणि तीन वर्षांचा लहान मुलगा. संतोषसिंह यांना लहानपणापासून एकच ध्यास होता, काहीही होवो, देश सेवेसाठी आर्मीमध्ये भरती व्हायचं. पण मार्गात सारखे अडथळे. तरीही देवावर श्रद्धा ठेऊन प्रयत्न चालूच ठेवले. खूप प्रयत्नांती २७ ऑगस्ट १९९४ रोजी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी संतोषसिंह यांचे स्वप्न सत्यात उतरले आणि बेळगावला ट्रेनिंगसाठी ते रवाना झाले.
जिद्द आणि अपार मेहनत यांची सांगड घालत संतोषसिंह यांनी एक एक टप्पा सर केला आणि २००१ साली थेट कमांडो कोर्समध्ये उच्च श्रेणी प्राप्त केली. त्यानंतर काश्मीर बॉर्डरजवळ कुपौडा भागामध्ये त्वरीत त्यांची नेमणूक झाली. संतोषसिंह यांच्या पत्नींना २००३ साली परमपुज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंबद्दल माहिती मिळाली आणि लागलीच त्यांनी आपल्या पतींना “ॐ मन: सामथ्र्यदाता श्री अनिरुद्धाय नम:” हा जप सांगितला. हा जप मिळाला तेव्हापासून जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होईल तेव्हा तेव्हा संतोषसिंह हा मंत्र जप करत असत. अगदी २००८ सालाच्या अखेरीपर्यंत संतोषसिंह यांनी परमपूज्य अनिरुद्ध बापूंना प्रत्यक्षात पाहिलेही नव्हते. हे विशेष.
काश्मीरमध्ये पोस्टींग असताना २१ ऑगस्ट २००८ रोजी एक मोठा आतंकवाद्यांच्या ग्रुप भारतामध्ये घुसखोरी करणार असल्याची खबर संतोषसिंह यांना मिळाली आणि आतंकवादी ज्या ठिकाणाहून घुसणार होते त्या ठिकाणी रात्री नऊ वाजता वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना आठ जवानांसोबत पाठविले. परंतु तेथे पोहचल्यावर आतंकवादी एक दिवस आधीच तिथून निघून गेले असल्याचे कळले. पुन्हा त्याच रात्री ते आतंकवादी एलओसी म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोलवरून सात ते आठ किलोमिटर आतमध्ये आले आहेत, अशी खबर मिळाली.
दुसऱ्या दिवशी पहाटे भारतीय सेनेच्या दुसऱ्या एका युनिटवर आतंकवाद्यांनी तिथून फायरिंग सुरु केले. म्हणून संतोषसिंह यांच्या युनिट कमांडर साहेबांनी त्यांना त्या ठिकाणी त्वरीत पाठविले. ते ठिकाण जास्त लांब असल्यामुळे संतोषसिंह यांना त्या ठिकाणी पोहचायला सकाळचे सात वाजले. एव्हाना उजाडले होते. जंगल खूप घनदाट होते. जंगलामध्ये खूप फायरिंग चालू होते. त्यामुळे संतोषसिंहांना पुढे जाता येत नव्हते. ते त्याच ठिकाणी सावधपणे मनातल्या मनात जप करीत उभे होते. तोपर्यंत सकाळचे नऊ वाजले. फायरिंग चालूच होती. आतंकवाद्यांना मारण्यासाठी संतोषसिंह यांचे रक्त खूप सळसळत होते. परंतु घनदाट झाडीमुळे आतंकवादी त्यांना दिसतच नव्हते.
त्यांनी त्याच ठिकाणी बापूंना विनंती केली, “बापू आज मला एक तरी आतंकवादी पाहिजे.” बापूंनी त्यांचं ऐकलं. संतोषसिंह यांच्याबरोबर सात जवान होते. त्यांनी बाकीच्या जवानांना त्याच ठिकाणी ठेवलं. स्वत:बरोबर दोन जवानांना घेतलं आणि ते अर्धा कि.मी. पुढे गेले. पुढे एक खूप मोठा डोंगर होता. जंगलही चांगलेच घनदाट होते. संतोषसिंह पुढे जाऊन एका ओढ्याजवळ थांबले. त्याच ठिकाणी तीन आतंकवादी येऊन लपले होते.
एव्हाना सकाळचे दहा वाजले होते. योगायोग म्हणजे अगदी त्याचवेळी संतोषसिंह यांच्या घरी त्यांची पत्नी परमपूज्य बापूंच्या पादुका पुजन करीत होती. अचानकपणे ते तीन आतंकवादी फायरींग करीत आले. स्वत:ला लगेच सावरत पहिल्या दहा सेकंदातच संतोषसिंहांनी दोन आतंकवाद्यांना मारण्यात यश मिळविले. अजून एक आतंकवादी त्याच ठिकाणी लपलेला होता. फायरिंग चालूच होते. संतोषसिंह यांनी बापूंकडे एकच आतंकवादी मागितला होता, बापूंनी त्यांना एकाच वेळी तीन आतंकवादी दिले होते. संतोषसिंह यांनी बापूंना मनोमन विनंती केली, “बापू, माझ्यासोबत माझे साथीदार आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये.” आणि खरंच त्या संपूर्ण फायरिंगमध्ये त्यांच्या साथीदारांना कुणालाही काहीही झाले नाही. तो २२ ऑगस्टचा दिवस पूर्ण गेला. रात्रही गेली संतोषसिंह त्यांचे साथीदार त्याच ठिकाणी तळ ठोकून होते. संतोषसिंह यांनी जवळजवळ दोन दिवस काहीच अन्नपाणी घेतले नव्हते.
विचार करा, दोन दिवस अन्न पाणी घेतले नव्हते. पण त्यांना खरी भूक होती ती त्या तिसऱ्या आतंकवाद्यास यमसदनी धाडण्याची. तिसऱ्या दिवशी त्यांना तो लपलेला आतंकवादी सापडला आणि त्यालाही त्यांनी चकमकीत अखेरचे पाणी पाजलेच. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी माहिती मिळाली की, अजून दोन आतंकवादी त्याच ठिकाणी जंगलामध्ये फिरत आहेत.
साहेबांनी ह्या कामगिरीसाठी पुन्हा संतोषसिंहाचीच निवड केली. त्यांच्यासोबत १६ जवान दिले गेले. संतोषसिंह यांनी शांतपणे बापूंचे स्मरण करुन जंगलात प्रवेश केला. जंगल इतके दाट होते की सूर्य किरणदेखील जमिनीवर पडत नव्हते आणि विशिष्ट एक अंतरापुढे काहीच दिवस नव्हते. हेच ते दिड तास संतोषसिंह त्या जंगलात चालत होते. बाकी सर्व जवान खूप हुशारीने त्यांच्या पाठीपाठी चालत होते.
अचानक काही कळायच्या आत एका आतंकवाद्याने संतोषसिंहावर एक राऊंड फायर केला, पण…. पण त्यांना एकही गोळी लागली नाही. सर्व जवानांनी जागच्या जागी पोझिशन घेतली. परंतु आतंकवादी कुणालाही दिसतच नव्हता. संतोषसिंह यांनी स्वत:बरोबर एका जवानाला घेतले आणि बाकी जवानांना थोडे पाठीमागे ठेऊनच सुरक्षित ठिकाणी पाठविले. संतोषसिंहानी पुढे चालायला सुरुवात केली. पन्नास ते शंभर मिटर ते खूप सावधरितीने चालत होते. आतंकवादी आपल्या समोरच चार ते पाच मिटरवर झाडापाठीमागे लपला आहे, याचा संतोषसिंह यांना अंदाज आला होता. आतंकवाद्याने त्याला पाहिले होते, पण अजूनही संतोषसिंहनी त्याला पाहिले नव्हते. आतंकवादी त्यांना बेसावधपणे पाहून अचानक त्याच्यासमोर आला आणि एके ४७ रायफलमधून त्यांच्यावर अंधाधूंद फायर केले. त्याच्याजवळ एक खूप मोठे झाड होते. ते लगेचच त्या झाडाच्या पाठी मागे गेले, ते आणि आतंकवाद्यांमध्ये खूप कमी अंतर होते. दोघांमध्ये खूप फायरिंग झाली. परंतु झाडी खूप असल्यामुळे संतोषसिंह यांच्या गोळ्या त्याला लागत नव्हत्या आणि त्याच्याही गोळ्या संतोषसिंह यांना लागत नव्हत्या. आतंकवाद्याचे लक्ष संतोषसिंहाकडेच होते, तोपर्यंत संतोषसिंहाच्या साथीदाराने बाजूला जाऊन त्याला दोन गोळ्या मारल्या आणि आतंकवाद्यांचे फायरिंग काही क्षण बंद झाले.
संतोषसिंह यांना एक क्षण वाटले की, इतक्या फायरिंगमध्ये त्यांना खूप ठिकाणी लागलं असेल. पण तपासून पाहता बापू कृपेने त्यांना काहीही इजा झाली नाही. अखेर संतोषसिंहांनी आपली जागा सोडली आणि त्या आतंकवाद्याला संपवलंच. त्या एकूण मिशनमध्ये तेरा आतंकवादी मारले गेले. होय, तेरा आतंकवादी मारले गेले.
अशाप्रकारे परमपूज्य बापूंच्या कृपेमुळे संतोषसिंह यांना एक ना दोन अनेक संधी मिळाल्या आणि त्यांनी त्या संधीचं नुसतं सोनंच केलं नाही तर अधिकवर्णी आनंद अनुभवला. ह्या कामगिरीमुळे आर्मीकडून त्यांची किर्ती चक्र या शौर्य पदकासाठी सरकारकडे शिफारस पाठविण्यात आली. २६ जानेवारी २००९ रोजी त्यांना राष्ट्रपतींकडून किर्ती चक्र हा पुरस्कार जाहीरही झाला आणि १९ मार्च २००९ रोजी राष्ट्रपतींतर्फे ह्या शौर्य पदकाचे मानकरी ठरले.
संतोषसिंह यांना या अनुभवाबद्दल विचारता ते एकच सांगतात की, ह्या मिशनमध्ये अक्षरश: मला माझ्या बापूने कृतांताच्या दाढेतून ओढून बाहेर काढले. माझा देवच हे सर्व करू शकतो. त्याची शक्ती अगाध आहे. सद्गुरू चरणांना माझे कोटी कोटी प्रणाम. माझे कोटी कोटी प्रणाम. खरंच आपल्या देशासाठी इतक्या तळमळीने लढणाऱ्या एका शूर जवानाला आधार देण्यासाठी आपले बापू का नाही धावत जाणार?
।। हरि ॐ ।।
(पा. `स्टार वृत्त’ प्रसिद्ध ता. शुक्रवार १२ जून २००९)