प्रभानवल्ली येथे ७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न

संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव संग्रहाचे प्रदर्शन

रत्नागिरी: -लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे ७ वे ग्रामीण मराठी साहित्य सन्मेलन पार पडले. या सन्मेलनामध्ये तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव या संग्रहाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. दोन दिवस विविध मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी प्राचार्य गणपत शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष अशोक लोटणकर, रत्नागिरी बैंक ऑफ इंडिया उपआंचलिक प्रबंधक के. आर. कंदी, राजापुर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईचे अध्यक्ष सुभाष लाड, मंगेश चव्हाण, साहित्यिक दिपक नागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आदर्श विद्यामंदीर प्रभानवल्ली-खोरनिनको येथील समीक्षक वि. शं. चौघुले साहित्यनगरी मध्ये आयोजित केलेले हे सन्मेलन ज्येष्ठ कवी व साहित्यिक अशोक लोटणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

दोन दिवस चाललेल्या या सन्मेलनाला विविध साहित्यिक, सामाजिक, कला, क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींनी भेटी दिल्या. निकेत पावसकर यांच्या या संग्रहामध्ये देश परदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रे आहेत. यातील निवडक संदेश पत्रांचे प्रदर्शन या सन्मेलनात करण्यात आले होते.

विविध मान्यवरांच्या भेटी

या प्रदर्शनाला संमेलनाध्यक्ष अशोक लोटणकर, ज्येष्ठ बालकवी सुर्यकांत मालुसरे, कवी डॉ. सुनिल सावंत, अभिनेते अमोल रेडिज, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, साहित्यिक दिपक नागवेकर, कोकण मिडियाचे संपादक प्रमोद कोनकर, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मसुरकर, चित्रकार महेश करंबेळे, पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्रदर्शन पाहिले.

संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव संग्रहाचे प्रदर्शनबाबत मान्यवरांचे मनोगत!

आनंदयात्रीच…
आपला अफाट स्वाक्षरी संग्रह पाहुन खूपच आनंद वाटला. आपण जणू आनंदयात्रीच आहात. संग्रह करणे तो जतन करणे व इतरांना आनंद देण्यासाठी प्रदर्शित करणे, हे सर्व आपण अतिशय छान काम केले आहे. आपल्या प्रदर्शनाला भेट देणे हा एक दिर्घ अभ्यासाचा अनुभव/विषय व्हावा, हीच शुभेच्छा!
-संजय गोरे, धाऊलवल्ली (राजापूर )

छंद जोपासणाऱ्याच्याच आयुष्यात अर्थ…
माणुस जन्माला येतो व जातो
तो कधीतरी उठुन दिसावा,
म्हणूनच तुझ्यासारखा काहितरी
प्रत्येकाला छंद असावा.
छंद जोपासण्यासाठी आपला गेलेला वेळ व्यर्थ नसतो. फक्त त्यालाच आयुष्यात अर्थ असतो.
-अभिनेते अमोल रेडिज, भांबेड, लांजा

नाविन्यपूर्ण उपक्रम…
आजपर्यंत बरेच प्रदर्शने पाहिली. परंतु अक्षरे संग्रह हा नविन उपक्रम आज पहिल्यांदा पाहिला आणि खुप छान वाटलं, असेच उपक्रम चालू रहावेत.
-जयेश नारायण जाधव (प्रभुलकर), प्रभानवल्ली

कोकणाची शान वाढविणारा स्तुत्य उपक्रम…
शैक्षणिक साहित्य सन्मेलनाच्या निमित्ताने अक्षरोत्सव हा नाविन्यपुर्ण कार्यक्रम पहावयास मिळाला. एक वेगळा छंद जोपासून कोकणची शान वाढविण्याच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे प्रत्येकाला भविष्यात काहितरी चांगली कला जोपासण्याची प्रेरणा मिळेल.
-श्रीपत काशिराम इंदूलकर, मुख्याध्यापक प्रभानवल्ली शाळा नं. 3

You cannot copy content of this page