प्रत्येकाला आपलेसे वाटेल असे गीत! -अभिनेते विजय पाटकर

सिंधुदुर्ग सुपुत्र संगीतकार गीतकार प्रणय शेट्ये यांच्या गीताला पसंती

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- एकाच गीतात फुल पॅकेज पहायला मिळेल असे सुंदर गाजली हलद हे गीत झाले आहे. कोकणातील दशावतार ही लोककला, सुंदर लोकसंगीताचा वापर, कोकणचे वैशिष्टपूर्ण सौंदर्य आणि प्रचंड ऊर्जा असलेली सर्व तरुण कलाकार मंडळी अशी वेगळी खासियत असलेले गीत पाहून प्रत्येकाला आपलेसे वाटेल असे सुंदर गीत झाले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी केले.

कणकवली तालुक्यातील शिडवणे येथील संगीतकार, गीतकार आणि दिग्दर्शक प्रणय शेट्ये यांच्या बहुचर्चित आणि वेगळा प्रयोग असलेल्या गाजली हलद या गीताचा लोकार्पण सोहळा मुंबई येथील बॉस स्टुडिओमध्ये ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि सुप्रसिध्द पार्श्वगायक डॉ. उत्कर्ष शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ विजय पाटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी बॉस स्टुडिओचे पंकज शाह, संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक प्रणय शेट्ये, पार्श्वगायिका कांचन किरण मिश्रा, दिग्दर्शक सिद्धार्थ श्रीवास्तव, समाजसेवक संतोष कासले यांच्यासह संपूर्ण द्रौपदी टीम उपस्थित होती.

यावेळी बोलताना उत्कर्ष शिंदे म्हणाले की, लोकसंस्कृतीशी निगडित असे सुंदर गीत झाले असून कोकणाने जपलेली वैशिष्ट्यपूर्ण सुंदरता यामध्ये दिसते आणि संगीतामधून ऐकायला मिळते. लोकसंगीत आणि लोककलेचा सुंदर वापर यामध्ये झालेला आहे. त्यामुळे हे गीत प्रत्येकाला आपले वाटेल.

संपूर्ण चित्रीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात
या गीताचे संपूर्ण चित्रीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, झोळंबे, नेरूळ, वालावल, शिडवणे अशा विविध ठिकाणी झाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध ठिकाणचे निसर्ग सौंदर्यही ठळकपणे दिसते.

यामध्ये नीळकंठ सावंत, ऋतुजा राणे, रोहित कांबळे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर सुधीर कलिंगण यांच्या कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या कलाकारांनी यामध्ये महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तर शुभांगी केदार, जसराज जोशी, नागेश मोरवेकर, सार्थक कल्याणी या प्रसिध्द गायकांनी हे गीत गायले आहे. या गीताच्या माध्यमातून कोकण अचूक टिपले आहे चिन्मय जाधव यांनी तर कार्यकारी निर्माता म्हणून अंकुश महाजन यांनी काम पाहिले आहे.

या गीताने युट्यूबवर अल्पावधीतच उंच भरारी घेतली आहे. कोकणातील दशावतार या लोककलेचा वापर करून वेगळा प्रयोग यानिमित्ताने केला असून तो प्रेक्षकांनी पहावा आणि प्रतिसाद द्यावा, असे आवाहन निर्माते पंकज शाह यांनी केले आहे. याबाबत बोलताना संगीतकार गीतकार प्रणय शेट्ये म्हणाले की, कोकणातील दशावतार या लोककलेतील स्त्री भूमिका करणाऱ्या पुरुषाची हळद कशी असू शकते, यावर हे गीत चित्रित केले असून आम्हाला खात्री आहे की, रसिक यालाही पसंती देतील.

छायाचित्र;- गाजली हलद या गीताचे लोकार्पण ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, पार्श्वगायक डॉ. उत्कर्ष शिंदे यांच्या हस्ते व निर्माते पंकज शाह, संगीतकार गीतकार प्रणय शेट्ये, पार्श्वगायिका कांचन किरण मिश्रा, दिग्दर्शक सिद्धार्थ श्रीवास्तव यांच्यासह संपूर्ण द्रौपदी टीम यांच्या उपस्थितीत झाले.

You cannot copy content of this page