मुंबईत काळरात्रीने घेतले ३१ जणांचे प्राण! तुफान पावसाचा फटका!!

मुंबई– शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. अचानक पडलेला मुसळधार पावसाने अनेक दुर्दैवी घटना घडल्या असून त्यात ३१ जणांना प्राणास मुकावे लागले. चेंबूर येथील दुर्घटनेतील बचावकार्य संध्याकाळी संपले असून येथे २१ नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर २ जणांवर उपचार सुरू आहेत तर विक्रोळी येथे दुमजली इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील तीन ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने २ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली असून, राज्य सरकारने ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

चेंबूरच्या भारत नगर परिसरात एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत ५ ते ८ घरांवर कोसळली आणि लोक दबले गेले.

दरम्यान विक्रोळीमध्ये एक दुमजली इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला. पंचशील नगर भागात दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. तर भांडुपच्या अमरकोट भागामध्ये वनविभागाची भिंत कोसळल्याने सोहम थोरात नावाच्या १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

You cannot copy content of this page