मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज प्रक्रियेत गतिमान कार्यवाही; २५ नोव्हेंबरपासून ३५ लाख ८ हजार रुपये वितरित

मुंबई:- मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे काम अतिशय गति पद्धतीने सुरू असून २५ नोव्हेंबर २०१९ पासून १०६ प्रकरणात ३५ लाख ८ हजार ५०० रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या योजनेसह रुग्णांना अन्य योजनांद्वारेही एकूण ४९५ प्रकरणात मदत करण्यात आली आहे. मदत निधीकडे प्राप्त होणाऱ्या अर्जावर तातडीने कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्यात येतो, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत काही वृत्तपत्रात नकारात्मक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्या अनुषंगाने कार्यालयामार्फत माहिती देण्यात आली आहे. वस्तुत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय सहाय्यता निधीतून जलदरित्या रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. २५ नोव्हेंबरपासून वैद्यकीय सहाय्यासाठी कालपर्यंत ५८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी जवळपास ४९५ प्रकरणे मंजूर झाली असून महात्मा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे प्राप्त होणाऱ्या अर्जावर कार्यवाहीसाठी विशिष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र रुग्णांना योजनेच्या पॅनेलवरील रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठविण्यात येते. अशा १९२ प्रकरणात रुग्णांना या योजनेचा लाभ दिला आहे. रुग्ण धर्मादाय रुग्णालयात उपचार घेत असल्यास धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावरुन संबंधित रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा दारिद्र्यरेषेखालील घटकांसाठी उपलब्ध खाटांची माहिती घेतली जाते. पात्र रुग्णांना याअंतर्गत पूर्णत: मोफत किंवा ५० टक्के सवलतीच्या दराने उपचार प्राप्त होतात. अशी ८७ प्रकरणे धर्मादाय रुग्णालयांकडे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय कॉकेलर इम्प्लांटची प्रकरणे पुणे येथील अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून हाताळली जातात. त्यांच्याकडे ९ प्रकरणे पाठविण्यात आली आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि कॉकेलर इम्प्लांट अशा पद्धतीने २८८ रुग्णांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित २०७ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याचे निश्चित करण्यात आले असून १०६ प्रकरणात थेट रुग्णालयांकडे मदत वितरित केली आहे. उर्वरित प्रकरणात कार्यवाही सुरु आहे. ५० प्रकरणात अपूर्ण कागदपत्रे असल्याने कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे मदतीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची स्थिती रुग्णांना समजण्यासाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या सूचनेनुसार एसएमएस सेवा सुरू करण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे, असेही सहाय्यता निधी कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.

Application process for Chief Minister’s Relief Fund accelerated. Rs. 35 lakh 8 thousand distributed since 25th November

You cannot copy content of this page