कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी
प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
सिंधुदुर्गनगरी, दि. २८ (जि.मा.का): कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. राज्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. परदेशातून गावात येणाऱ्या नागरिकांची माहिती मिळवून सात दिवसांनंतर पुन्हा त्यांची आरटीपीसीआर तपासणी करावी. त्याचबरोबर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिली.
जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील आदी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार ओमिक्रॉन प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना करुन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, फेब्रुवारीमधील संभाव्य रुग्ण वाढीचा अंदाज घेऊन आतापासूनच आपली सर्व तयारी आवश्यक आहे. त्यादृष्टीने तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी एकत्रित बैठक घ्यावी. जत्रा, यात्रांच्या पार्श्वभूमीवर संबंधित देवस्थान समितीने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी बाबत निर्देश द्यावेत. येणाऱ्या भाविकांची थर्मल तपासणी आणि दुसरा डोस नसणाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करावी. त्याचबरोबर तपासण्याही वाढवाव्यात. आरोग्य विभागाने प्राणवायुचा साठा, त्या अनुषंगाने लागणारी साधनसामुग्री, जनरेटर सुस्थितीत ठेवावेत. आवश्यकत्या मनुष्यबळांसाठी प्रस्ताव पाठवावेत. जिल्ह्यातील कोविड केंद्रांबाबतही पूर्वतयारी ठेवावी.
सुरु होत असणाऱ्या जत्रा, यात्रा आणि विवाह सोहळ्यांसाठी मोकळ्या मैदानात २५० संख्येची मर्यादा पाळली जाईल, याबाबत सतर्क रहावे. पुन्हा एकदा मास्क वापरण्यासंदर्भात आवाहन करावे. त्याचबरोबर दंडात्मक कारवायाही कराव्यात. खासगी दवाखन्यांकडे येणाऱ्या ताप सदृष्य रुग्णांची तपासणी करावी. त्याबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे माहिती यायला हवी. प्रत्येक गावात १०० टक्के पहिला डोस पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आघाडीवर रहावे. बाहेरील राज्यातून अथवा जिल्ह्यातून येणाऱ्या मजुरांचे दोन डोस झाल्याबाबत तपासणी करावी. रात्रीच्या जमावबंदीचीही काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याबाबत पोलीस यंत्रणेने दक्षता घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.