जिल्हा रुग्णालयातील उपचारांमुळेचआमचा माणूस आमच्यात..!

75 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (प्रतिनिधी):– जिल्हा रुग्णालयात दाखल करतेवेळी लोक आम्हाला काहीही सांगत होते. तिथे न जाण्याचा सल्ला ही देत होते. पण, जिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या रुग्णाला तातडीने दाखल करुन घेत चांगले उपचार केले. त्यामुळेच आज आमचा माणूस आमच्यात आहे, अशी भावना खोटले, ता. मालवण येथील 75 वर्षीय कोरोना मुक्त रुग्णाच्या नातेवाईकांनी आज व्यक्त केली.

सुरुवातीला त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना खसगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण, तिथे योग्य उपचार मिळाले नाहीत. तसेच तेथील खर्चही फार होता. त्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. ग्लानीमध्येच असलेल्या या रुग्णाला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर प्राणवायूच्या आधारावर ठेवले होते. योग्य औषधोपचार, सुश्रुषा आणि समुपदेशन यामुळे आज हा रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतला आहे.

कोरोनाकाळातील अनुभवाविषयी सांगताना त्यांचे नातेवाईक म्हणाले, सुरुवातीस 4 दिवस खासगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केले होते. पण, तिथे उपचार फारसे चांगले मिळाले नाहीत. खर्चही फार होता. त्यामुळे रुग्णाची परिस्थिती पाहता आम्ही त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इतर लोक आम्हाला बरेच काही सांगत होते. तिथे जाऊ नका, बेड्स मिळत नाहीत. उपचार चांगले होत नाहीत. रुग्णांची सोय केली जात नाही. तिथे बेड्स उपलब्ध असल्याची खात्री करून मगच रुग्णाला घेऊन जा. पण, लोकांच्या या ऐकिव गोष्टींपेक्षा वेगळाच अनुभव आम्हाला आला. आमच्या रुग्णाला गेल्या गेल्या लगेच दाखल करुन घेण्यात आले. 11 दिवस आमचा रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होता. या संपूर्ण काळामध्ये त्यांना चांगले जेवण मिळत होते. वेळेवर औषधे दिली जात होती.

मधुमेहाचा आजार असल्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष दिले जात होते. त्यांच्या प्रकृतीविषयी आम्हाला दिवसातून तीन वेळ फोनवरुन माहिती दिली जात होती. जिल्हा रुग्णालयातील उपचार, सेवा – सुश्रुषा यामुळेच आज आमचा माणूस ठणठणीत बरा होऊन घरी परतला आहे. तेथील डॉक्टर्स, नर्स यांनी चांगली सेवा दिली. त्यांच्या सेवे विषयी आभार मानण्यास शब्दच नाहीत. जिल्हा रुग्णालयातील उपचारांमुळेच आज आमचा माणूस आमच्या आहे. इतरांनीही खचून न जाता मानसिक धैर्य आणि जिल्हा रुग्णालयातील योग्य उपचारांचा आधार घ्यावा असेही ते म्हणाले. महत्वाचे म्हणजे त्यांनी आमचा माणूस बरा करून घरी पाठविला आहे. त्यांच्या या कार्याला तोड नाही.

You cannot copy content of this page