शेतकरी अडचणीत-खेडेगावातील एस. टी. सुरु करा! -मोहनराव केळुसकर

कणकवली:- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्यातील तालुक्यांच्या शहरातून स्मार्ट बसेसवाल्यांनी जाहिरातबाजी करून मुंबईकडे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र राज्यातील लोकांसाठी जीवनवाहिनी असलेली लालपरी एस. टी. अद्याप तळ्यात-मळ्यात हा खेळ करण्यात दंग झाली आहे. गावातील खेड्या-पाड्यांतील शेतकरी अद्यापही या लालपरी एस. टी. गाड्यांच्या प्रतिक्षेत चातकासारखी वाट पहात आहे. त्यांचा उद्रेक होण्यापूर्वी एस. टी. ने गावागावांसह मुंबईकडे फेऱ्या सुरू केल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळूसकर यांनी पत्रकातून केली आहे.

खाजगी बस मालकांनी शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार गाड्यांच्या मुंबईकडे फेऱ्या बिनधास्तपणे सुरू केल्या आहेत. मात्र एस. टी. महामंडळाचे अधिकारी अद्याप कोरोनाच्या दुष्टचक्राच्या फेऱ्यात अडकून पडले आहेत, असा आरोप करून ते पुढे म्हणतात, कोकणासह राज्यात सद्या एस. टी. च्या फेऱ्या ठराविक गावातच सुरू आहेत. चांगले प्रवासी भारमान असलेल्या अनेक गावांत अद्याप फेर्या सुरू करण्यास विनाकारण कचरत आहेत. उदाहरणदाखल कणकवली- घोडगे मार्गासह अनेक मार्गांवर चांगले प्रवासी भारमान आहे. मात्र घोडगे- सोनवडे येथील एक तरुणी दिड महिन्यापूर्वी कोरोना निगेटिव्ह झाल्यानंतरही एस. टी. चे अधिकारी ही बससेवा सुरू करण्यास धजावत नाही. त्यांच्या या मानसिकतेमुळे एकीकडे एस. टी. चे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे शेतकरी शेतीच्या कामात मग्न असला तरी शेतीसाठी लागणारी बि-बियाणे, खते-किटकनाशके आणण्यासाठी शहरात येऊ शकत नसल्याने त्याचे मोठे नुकसान होत आहे.

वास्तविक गावा-गावांतील सरपंचासह लोकप्रतिनिधी यासाठी प्रयत्न करायला हवेत. एस. टी. च्या अधिकाऱ्यांवर दबाव आणायला हवा. मात्र अलिकडच्या काळात राजकीय पदाधिकाऱ्याकडे चारचाकी गाड्या आल्याने त्यांना सामान्य शेतकऱ्यांबद्दल आता सोयरसुतक राहिलेले नाही, असा आरोप केळुसकर यांनी केला आहे.

You cannot copy content of this page