मोसमी पावसाने पाश्चिम घाटमाथ्यास झोडपले
ताम्हिणीत ५५६ मिलिमीटर, तर भिरामध्ये ४०१ मिमी आणि लोणावळ्यात ३२९ मिमी पाऊस!
पुणे:- मोसमी पावसाने गुरुवारी रात्रभर पाश्चिम घाटमाथ्यस झोडपले. ताम्हिणीत ५५६ मिलिमीटर, तर भिरामध्ये ४०१ आणि लोणावळ्यात ३२९ मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर अन्य ठिकाणीही सरासरी २५० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, मंगळवार, बुधवारपासून पावसाचा जोर वाढला. गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत घाटाच्या परिसरात अतिमुसळधार पाऊस पडला. लोणावळा (टाटा) ३११ मिमी, लोणावळा ३२९ मिमी, शिरगाव ४८४ मिमी, आंबोणे ४४० मिमी, डुंगरवाडी ४०७ मिमी, कोयना (पोफळी) १३२ मिमी, कोयना (नवजा) १५७ मिमी, खोपोली २२५ मिमी, ताम्हिणी ५५६ मिमी आणि भिरा ४०१ मिमी पावसाची नोंद झाली.
किनारपट्टी परिसरातही मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला, तर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अलिबाग येथे २९ मिमी, हर्णे येथे ५५ मिमी, कुलाबा ४५ मिमी, सांताक्रुज ७७ मिमी, रत्नागिरी येथे ३४ मिमी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे १४३ मिमी, कोल्हापूर येथे १७ मिमी, सातारा येथे २० मिमी पावसाची नोंद झाली. तर मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला.
घाटमाथ्यावर आजही अतिमुसळधारेचा अंदाज
हवामान विभागाने शुक्रवारी (२६ जुलै) किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रत्नागिरी, रायगड आणि साताऱ्याला लाल इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या घाट परिसरात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना नारंगी इशारा देण्यात आला आहे, तर नाशिक, धुळे, नंदूरबार आणि पूर्व विदर्भाला पिवळा इशारा देण्यात आला आहे.