पूरग्रस्त चिपळूणवासियांना `शिवार आंबेरे’च्या पेजे महाविद्यालयाचा मदतीचा हात

रत्नागिरी- तालुक्यातील शिवार आंबेरे येथील श्रमिक किसान सेवा समितीच्या, श्रमिक विद्यालय आणि लोकनेते शामरावजी पेजे कला, विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग (NSS) मार्फत चिपळून येथील पूरग्रस्तांना एक मदतीचा हात देण्यात आला. विशेषतः कळंबस्ते, काविळतळी व खेर्डी येथील लोकांना ही मदत देण्याचा प्रयत्न केला.

पाच किलो तांदूळ, अर्धा किलो डाळ, एक किलो साखर, चहा पावडर,बिस्किटे, वेफर्स, टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, गोडेतेल, गरम मसाला, कांदे, बटाटा, कडधान्य, शेंगदाणे, मीठ, चपातीचे पीठ या सर्वांचे एक किट बनवण्यात आलं आणि अशाप्रकारे 160 किटचे वाटप या पूरग्रस्तांना करण्यात आले. यासोबत प्रत्येकी एक चादर व एक टॉवेलही देण्यात आला.

ही सर्व मदत लोकनेते शामरावजी पेजे वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्यातून उभी केली. यामध्ये पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तिमत्त्वांनीही यामध्ये मोठे सहकार्य केले. पनोरे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन नरसळे, बेनी बुद्रुकचे सामाजिक कार्यकर्ते परेश दादा खानविलकर, बेनी बुद्रुक चे सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत कशेळकर, लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते भाई चौगुले यांचा सदर मदतीमध्ये खूप मोठा वाटा आहे.

त्याचबरोबर या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्रमिक किसान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोहिते, संस्था सचिव मधुकर थुळ, संस्था उपाध्यक्ष नारायण आग्रे, समाज नेते सुरेश भायजे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी कुळ्ये, संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते विलास डिके, लांजा तळवडे आंबेकर – भितळे वाडी विकास मंडळ, खानवली लावगण येथील नाना खानविलकर यांनीही खूप मोलाचे सहकार्य केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राकेश आंबेकर, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्राध्यापक नितेश केळकर, सहाय्यक प्राध्यापक नितीन वळवी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी खूप मेहनत घेतली.