७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे…
नवीदिल्ली:- भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं. त्यावेळी झालेल्या भाषणातील महत्वाचे मुद्दे…
१) सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, सर्वस्वी त्याग केला त्यांना आणि सुरक्षा दलांमधील प्रत्येकजण देशाचे व देशांच्या नागरिकांचं संरक्षण करतात त्यांना आज नमन करण्याचा दिवस असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन आपल्या भाषणाला सुरूवात केली.
२) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना वॉरियर्सचाही उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांनाही नमन करून कोरोनाने अनेक कुटुंबांवर विपरीत परिणाम झाला, अनेकांचे प्राण गेले. अशा सगळ्या कुटुंबियांसाठी सहवेदना व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे कोट्यावधी लोकांची संकल्पशक्ती कोरोनावर विजय मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला.
३) आजच्या स्वातंत्र्यदिनापासून National Digital Health Mission चा आरंभ झाला. भारताच्या आरोग्य क्षेत्रात ही एक मोठी क्रांती आहे. प्रत्येक भारतीयाला आरोग्य ओळखपत्र (हेल्थ ID) दिला जाणार आहे. प्रत्येक नागरिकाच्या संपूर्ण आरोग्यविषयक माहिती, असलेल्या आजारांची माहिती त्यात असेल.
४) कोरोनाची लस तयार करण्यासाठी देशाचे वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये ऋषीमुनींप्रमाणे काम करत आहेत. देशात तीन लशींच्या चाचणीचं काम वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहे. संशोधकांनी हिरवा कंदिल देताच ती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याची योजना आखली आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा यासाठी सज्ज ठेवली आहे.
५) भारतीय जवानांनी शत्रूला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. सीमेवर भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला किंवा चिथावल्यास भारतीय जवान काय करू शकतात? हे अख्ख्या जगाने लडाखमध्ये पाहिलंय.
६) शेजारी राष्ट्रांसोबतचे अधिक दृढ करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केलाय. शांतता नांदली तरच खऱ्या अर्थाने विकास होईल.
७) ‘आत्मनिर्भर भारत’ हा १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनलेला आहे. आपल्याला यासाठी सज्ज व्हायला हवं, स्वत:ला तयार करायला हवं. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारतासारख्या देशाचं योगदान वाढणं, ही आजची गरज आहे. यासाठी भारताला सशक्त व्हावं लागेल, आत्मनिर्भर व्हावं लागेल. आपल्याकडे प्रचंड नैसर्गिक संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे. कधीपर्यंत जगाला कच्चा माल पाठवून, तयार माल विकत घेत राहणार आहोत?
८) देशात आपण आधी धान्य आयात करायचो. पण आज भारताची जगात ज्याला गरज असेल त्याला अन्न पुरण्याची आपली क्षमता आहे. आपल्या शेतकऱ्यांनी हे करून दाखवलं. आपण आत्मनिर्भर झालो की शेजारच्या देशांचाही त्याचा फायदा होईल.
९) भारतात स्त्रीशक्तीने देशाचं उज्वल केलं आहे. एकीकडे भारतात स्त्रिया भूमिगत कोळसा खाणींमध्ये काम करत आहेत तर दुसरीकडे लढाऊ विमाने चालवत आहेत. देशातील ४० कोटी जनधन खात्यांपैकी जवळपास २२ कोटी खाती महिलांची आहेत. कोरोना काळात एप्रिल-मे-जून या तीन महिन्यांमध्ये महिलांच्या खात्यात जवळपास ३० हजार कोटी रुपये थेट ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
१०) जम्मू-काश्मिरमध्ये विकासाची गंगा वाहू लागली आहे. आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत विकास जोमाने सुरु झाला आहे.
११) वोकल फॉर लोकल ही भारताची मानसिकता असायला हवी, हा जीवन मंत्र व्हायला हवा. भारतातल्या सुधारणांच्या परिणामांकडे जग बारकाईने निरीक्षण करीत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे गेल्या वर्षी आतापर्यंतचे एफडीआयचे सगळे विक्रम मोडले. त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली. कोरोना काळातही मोठमोठ्या कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहेत.
१२) मेक इन इंडिया सोबतच मेक फॉर वर्ल्डचं उद्दिष्टं घेऊन देशाला वाटचाल करायची आहे. सगळ्या पायाभूत सुविधा एकमेकांशी जोडायच्या आहेत. जलजीवन मिशन कार्यक्रमातून वर्षभरात दोन कोटी कुटुंबांपर्यंत पाणी पोहोचविलं. आत्मनिर्भर भारतासाठी समतोल विकास महत्वाचा असून त्यासाठी मागास असलेले ११० जिल्हे निवडले आहेत.
१३) शेती आणि शेतकरी कऱ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.शेतकऱ्यांसाठी अनेक कायद्यांमध्ये बदल केला. त्याच्या त्यांना फायदा होणार आहे.