दूरदर्शी आमदार म्हणून डॉ. भारती लव्हेकर यांची अभिनंदनीय निवड!
एशिया पोस्ट नियतकालिकाने भारतात केलेल्या `५० आदर्श आमदार २०२०’ विशेष सर्व्हेत आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची निवड
एशिया पोस्ट नियतकालिकाने भारतात केलेल्या `५० आदर्श आमदार २०२०’ विशेष सर्व्हेत आमदार म्हणून डॉ. भारती लव्हेकर यांच्यासह महाराष्ट्रातील आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार आणि आमदार देवयानी फरांदे यांची नुकतीच निवड झाली आहे. दूरदर्शी आमदार म्हणून डॉ. भारती लव्हेकर, प्रेरक आमदार म्हणून सुधीर मुनगंटीवार, भविष्यवादी आमदार म्हणून देवयानी फरांदे यांनी विशेष सर्वेक्षणात स्थान पटकावले आहे. ह्या आदर्श आमदारांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
देशातील ३१ राज्यांच्या विधानसभेतील ४ हजार १२३ आमदारांपैकी ३ हजार ९५८ आमदारांना ह्या सर्व्हेत सामील करून घेण्यात आले होते. (एका राज्याची विधानसभा सध्या कार्यान्वित नसल्याने १६५ आमदारांच्या जागा रिक्त आहेत.) ह्यामध्ये मंत्री आणि मुख्यमंत्री यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. प्रथम फेरीत वेगवेगळे निकष लावून १ हजार ५०० आमदारांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर आमदारांनी आपल्या मतदार संघात केलेले कार्य, राज्यासाठी मांडलेले मुद्दे, सभागृहात मांडलेले प्रस्ताव, शासनाला विचारलेले प्रश्न, त्यांच्या कार्याची पद्धत, लोकप्रियता, जनतेशी सलोखा, लोकहिताचे कार्य आणि मतदारांच्या समस्यांवर केलेले काम; असे अनेक मुद्दे विचारात घेऊन विविध श्रेणीत शास्त्रशुद्ध सर्वे करण्यात आला. त्यातून एशिया पोस्ट नियतकालिकाने भारतातील ५० आमदारांची निवड केली आणि त्यांच्या कार्यानुसार विशेषणं दिली. ह्या ५० आमदारांमध्ये महाराष्ट्राचे चार आमदार असून त्यामध्ये वर्सोवा विधानसभेच्या लोकप्रिय आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनाही सन्मान प्राप्त झाला आहे.
डॉ. भारती लव्हेकर यांनी आमदार म्हणून केलेल्या कार्याची दखल देशपातळीवर अनेकवेळा घेण्यात आली आहे. भारतातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडची बॅंक सुरु करणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार आहेत. त्यांना यापूर्वी भारताच्या `फर्स्ट लेडी’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम व डिस्पोजल मशीन स्थापन केल्या. या व्यतिरिक्त त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध, महिला आरोग्य व शिक्षण यासाठीही उत्कृष्ट कामे केलेली आहेत. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी खूप मोठे कार्य केले असून मतदार संघात कोणीही उपाशी राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर धान्य वाटप आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आयुर्वेदिक औषधे, लहान मुलांसाठी टॉनिक, मास्क, सॅनिटायझर अशा आवश्यक गोष्टी देऊन जनतेला खूप मोठा दिलासा दिला. त्यांनी हजारो स्वयंसेवकांच्या माध्यमातून गरजूवंताच्या घरी जाऊन सेवा केली आहे.
डॉ. भारती लव्हेकर यांनी केलेल्या कार्याकडे पाहता त्या आदर्श आमदार आहेतच. एशिया पोस्ट नियतकालिकाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आमदार भारतीताई लव्हेकर यांचे पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन! त्यांनी भविष्यातही आदर्शवत काम करून जनतेचा, मतदार संघाचा, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करावा. त्यांच्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा!
-मोहन सावंत (सहसंपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’)