लातूर लोकसभा मतदारसंघात दिव्यांगजणांकडून चालविणारे मतदान केंद्र निर्माण करणार

लातूर:- लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी किमान एक मतदान केंद्र पूर्णपणे दिव्यांगजणांकडून चालविले जाणार आहे. या मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष व इतर सहाय्यक अधिकारी हे सर्व दिव्यांग व्यक्तीच असतील. हा एक पथदर्शक प्रकल्प म्हणून राबविला जाणार असून दिव्यांगजण हे कोणतीही जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडू शकतात. हा संदेश दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित डिस्ट्रीक्ट आणि इनक्लूशिव्ह इलेक्शन फॉर डिसॲबिलीटी पिपल समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. मिणगिरे, संवेदना संस्थेचे कार्यवाहक सुरेश पाटील, वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता भरत कांबळे, प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन साळुंके, राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन बिराजदार, शिक्षणाधिकारी (प्रा.) वैशाली जामदार, शिक्षणाधिकारी (मा.) औदुंबर उकिरडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी अनेक नवीन बाबींचा समावेश केलेला असून प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

दिव्यांगजण यांच्यावर दिलेली जबाबदारी हे ते सक्षमपणे पार पाडू शकतात. त्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या लातूर शहर, लातूर ग्रामीण, उदगीर, अहमदपूर, निलंगा व लोहा या सहा विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक मतदान केंद्र हे दिव्यांग व्यक्तीकडूनच चालविले जावे यासाठी सक्षम दिव्यांग अधिकारी कर्मचारी संबंधित संघटना व सामाजिक संस्थांनी सूचवावेत. त्या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाकडून योग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

संपूर्ण देशभरात असे दिव्यांग व्यक्तीकडून चालविले जाणारे मतदान केंद्र निर्माण झाल्यास ते इतरांसाठी मॉडेल मतदान केंद्र असेल. तसेच यातून दिव्यांगजणांवर सोपविलेली जबाबदारी ते इतर व्यक्तींसारखीच कार्यक्षमपणे पार पाडू शकतात, हा संदेश सर्वत्र जाऊन एक प्रकारे दिव्यांगजणांचा सन्मान होईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

आयोगाने यावर्षीच्या निवडणुकांमध्ये दिव्यांगजणासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिल चेअर उपलब्ध करुन देणे, दिव्यांगजणांची घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करणे, ईव्हीएम मशीनमध्येच ब्रेल लिपीचा वापर केल्याने दिव्यांगांना मतदान करणे सोपे होणार आहे. त्याप्रमाणेच अंधुक दृष्टी असलेल्यांसाठी मॅग्नीफॉईड ग्लासचा वापर करणे व दोन्ही हात नसलेल्या व्यक्तींसाठी मतदार सहकारी सोबत ठेवणे आदी सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिली.

दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती कार्यक्रम राबविणे. तसेच प्रत्येक दिव्यांग मतदाराला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी प्रोत्साहित करणे, यासाठी सर्व दिव्यांग संघटना व सामाजिक संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.

लातूर लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात होणार असून दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. तरी मतदारसंघातील २ हजार तीन मतदान केंद्रावर येणारा प्रत्येक दिव्यांग मतदार हा प्रशासनासाठी अति अति महत्त्वाचा मतदार (व्ही व्ही आय पी ) असेल व त्या मतदाराला अगदी सहज व सुलभपणे मतदानाचा हक्क बजाविता येईल, यासाठी प्रशासन कटीबध्द असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिली.

You cannot copy content of this page