कोल्हापुर येथे संदेश पत्र संग्रह प्रदर्शनाचे अभ्यंकर यांच्या हस्ते उद्घाटन
हे प्रदर्शन म्हणजे कलावंतांचा मेळावा : अभिनेते माधव अभ्यंकर
कोल्हापूर:- तुझी कल्पनाच भन्नाट आहे, मला हे खुप आवडले, खरं तर हे प्रदर्शन म्हणजे कलावंतांचा मेळावा आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते माधव अभ्यंकर यांनी केले. ते कोल्हापुर येथील शाहू स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या निकेत पावसकर यांच्या संदेश पत्र संग्रह प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत डॉ. बाळकृष्ण खरात, चित्रकार अक्षय मेस्त्री, सत्यम सुतार, शिवाजी चौगुले आदी उपस्थीत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन फित सोडून करण्यात आले. या प्रदर्शनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील निवडक 250 व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. कला, साहित्य, सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन 2021 च्या निमित्ताने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवसभर चाललेल्या या प्रदर्शनाला विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी अक्षरोत्सव परिवाराकडून अभिनेते माधव अभ्यंकर यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रदर्शनाला कलाकार शिवाजी चौगुले, काष्टशिल्पकार, अभिनेते अनंत चौगले यांच्यासह असंख्य रसिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यापूर्वी मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी आणि बेळगाव येथे या संग्रहाचे प्रदर्शन झाले आहे.
कोल्हापुर येथे आयोजित केलेल्या संदेश पत्र संग्रह प्रदर्शनाचे उद्घाटक अभिनेते माधव अभ्यंकर यांना संग्राहक निकेत पावसकर यांनी भेटवस्तू देऊन सत्कार केला.