साहित्य संमेलन स्मरणिका : एक वाङ्मयीन दस्तावेज

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने….

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच होणारे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी दिल्लीत होत आहेत. या संमेलनाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून हे संमेलन 70 वर्षानंतर दिल्लीत होत आहेत हेही विशेष आहेत. या संमेलनावेळी स्मरणिका प्रकाशित करण्यात येते. याबाबत अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रमेश माने यांचा लेख….

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्मरणिकेची निर्मिती केली जाते. आजवर ९७ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने संपन्न झालीत. या संमेलनानिमित्त त्या त्यावेळी स्मरणिका प्रकाशित केल्या गेल्या. साहित्य संमेलने पार पडून जातात, संमेलनात चर्चा, विविध परिसंवाद, कविसंमेलने, मुलाखती, कथाकथन, इत्यादि भरगच्च कार्यक्रम असतात. त्यातील काव्य, कथा, भाषा, साहित्यविचार, मुलाखती ऐकताना सर्वच ग्रहण करता येत नाही. काही विचार हवेत विरून जातात. परंतु स्मरणिकेच्या माध्यमातून, विविध लेखांच्या माध्यमातून प्रकाशित झालेला लेखनविचार मात्र स्मरणिकेच्या निमित्ताने संस्मरणीय राहतो. अशा स्मरणिका वाङ्मयीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक वैभवसंपन्न दस्तावेज ठरतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकांवर काही लोकांनी शोधनिबंध आणि शोध प्रबंध देखील निर्माण केलेले आहेत. यावरून या स्मरणिकांचं मूल्य आपल्या लक्षात येईल.

आजवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातही झाली आहेत. अशी संमेलने ज्या प्रदेशात असतात त्या प्रदेशातील आयोजक संस्थेचा वाङ्मयीन, सांस्कृतिक व सामाजिक कार्याच्या लेखाजोखा स्मरणिकेच्या माध्यमातून वाचकांना कळतो. त्या संस्थेचा दैदीप्यमान इतिहासही कळतो. त्या संस्थेत आजपर्यंत साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आलेली मान्यवर मंडळी कळते. एकूणच त्या आयोजक संस्थेची वैभवशाली परंपरा माहित होते. नव्याने सुरू झालेल्या संस्थांना त्या कार्यातून प्रेरणा मिळते. म्हणून असे लेख स्मरणिकेतून वाचायला मिळतात.

संमेलन ज्या परिसरात असते त्या परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन व इतर महत्वाची वैशिष्ट्ये प्रस्तुत संमेलनाच्या शीर्षकगीतातून कळतात. अशा गीताचाही समावेश स्मरणिकेत असतो. स्थानिक आयोजकांनी व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांची साहित्य संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका कळते. शिवाय साहित्य महामंडळ, संमेलनाचे कार्याध्यक्ष, आयोजक संस्थेचे पदाधिकारी व संपादक मंडळाची ओळख होते. याशिवाय तेथील श्रध्दास्थाने, प्रमुख पाहुणे, संमेलन पत्रिकेतील मान्यवर साहित्यिकांचा परिचय होतो. यानिमित्ताने कोण कुठल्या वाङ्मयप्रकारात लेखन करतात ते कळते. स्थानिक साहित्यिकांचे वाङ्मयीन योगदान लक्षात येते. मान्यवरांच्या संदेशातून त्यांची संमेलनविषयक भावना कळते. त्या गावात किंवा परिसरात यापूर्वी संमेलन भरविले असेल तर त्या गतसंमेलनविषयीच्या काही आठवणी लेख किंवा जुन्या छायाचित्रांवरून कळतात. शिवाय त्या संमेलनातील वाद-प्रतिवाद, चर्चा, वेगळेपण कळते. (जसे की, १९५२ साली अमळनेर येथे झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र मराठी साहित्य अधिवेशनात अत्रे-फडके वाद खूप गाजला होता.) अशा वैशिष्ट्येपूर्ण नोंदी ज्ञात होतात. तसेच संमेलनाध्यक्षांचा एकूण वाङ्मयीन कार्य व त्यांना मिळालेल्या मानसन्मानाची माहिती मिळते.

स्मरणिकेच्या विविध विभागाची रचना केलेली असते. त्यात मराठी साहित्याची समकालीन सद्यस्थिती किंवा वर्तमान मराठी साहित्य, समकालीन मराठी साहित्याची वाटचाल अशा वेगवेगळ्या संकल्पनेवर (थीमवर) आधारित लेख समाविष्ट असतात. यात कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र- आत्मचरित्र, ललितगद्य, वैचारिक, समीक्षा, बालसाहित्य, विनोदी साहित्य, भाषांतरीत साहित्य, इत्यादि वाङ्मयप्रकाराचा लेखनप्रवास वाचण्यास मिळतो. तसेच मराठी भाषा, तिची विविधता, मराठी भाषेचे महात्म्य, ताम्रपट, शिलालेख यांच्या संदर्भखुणा आणि विशेष आदींच्या नोंदी कळतात.

ज्या प्रदेशात संमेलन भरविले जाते त्या प्रदेशातील सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन, आध्यात्म, पौराणिक, ऐतिहासिक, लोककला, इतर विविध कला त्यांची परंपरा, नियतकालिके, दिवाळी अंक, ग्रंथालये, खाद्यसंस्कृती, पोशाख, बोलीभाषा, बोलीचे विविध प्रकार, सण-उत्सव, श्रद्धा, लोकमानस, लोकतत्त्व, व्यक्तिविशेष, विविध वाङ्मयप्रकारातील लेखन जसे की, कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र-आत्मचरित्र, वगैरे विषयी लेख अंतर्भूत असतात. याखेरीज एक स्वतंत्र विभागही त्यात निर्माण करता येऊ शकतो, तो म्हणजे काही विशिष्ट कलाकृतींच्या वाङ्मयीन योगदानावर किंवा विशेष लक्षणीय ठरलेल्या आणि सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठलेल्या कलाकृतींवर लेख समाविष्ट केले जाऊ शकतात. अमळनेर येथे संपन्न झालेल्या ९७ व्या संमेलनाच्या स्मरणिकेत तसा प्रयोग केला गेला. उदाहरण- ‘रानातल्या कविता- ना. धों. महानोर (प्रा. इंद्रजीत भालेराव), पाचोळा- रा. रं. बोराडे (डॉ. गणेश मोहिते), सूड – बाबुराव बागूल (प्रा. ज्ञानेश्वर कांबळे), संध्याछाया-जयवंत दळवी (सुदेष्णा कदम), बहिणाबाईची गाणी- बहिणाबाई चौधरी (प्रा. बी. एन. चौधरी) अशा प्रातिनिधिक परंतु साहित्यप्रांतात मैलाचा दगड ठरलेल्या कलाकृतींच्या योगदानावर अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश केला होता. काव्य विभागात जुन्या कवींच्या स्मृति जाग्या करता येऊ शकतात. मागील संमेलनातील स्मरणिकेत खान्देशातील दिवंगत कवींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘काव्यस्मृतिगंध’ हा एक उपघटक केला होता. त्यात खान्देशातील महत्वाचे वाङ्मयीन योगदान देणाऱ्या कवींच्या एकेक कवितांचा सन्मान केला होता. तर दुसऱ्या उपघटकात सद्यस्थितीत लेखन करणाऱ्या नव्या-जुन्या विविध जाणिवेच्या कवी-कवयित्रींच्या काव्याचा सन्मान करता येतो किंवा केला आहे. तसेच काही स्थानिक कवींच्या प्रातिनिधिक कविताही घेता येऊ शकतात. जो ‘खान्देश वैभव’ मध्ये प्रयोग केला आहे.

काही विशेष मुलाखतीही स्मरणिकेत समाविष्ट करता येतात. मागील वर्षी संमेलन अमळनेरात असल्याने अमळनेर ही भूमी पूज्य सानेगुरुजी यांची कर्मभूमी म्हणून परिचित आहे. म्हणून अशा भूमीत संमेलन होत असल्याने सानेगुरुजींच्या पुतणी सुधाताई साने-बोडा यांची संजय बच्छाव यांनी घेतलेली मुलाखत समाविष्ट केली आहे. या मुलाखतीतून सानेगुरुजींच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. गुरुजींच्या कामाची अनेक पैलू कळाली. म्हणून अशा वैशिष्ट्येपूर्ण मुलाखती घेता येतात.

स्थानिक प्रदेशाची वैशिष्ट्ये नोंदविणाऱ्या स्मरणिकेच्या मुखपृष्ठाची निर्मिती स्थानिक चित्रकाराकडून करता येते. त्याचबरोबर काही प्रासंगिक किंवा लेखाला अनुसरून उत्तम रेखाटनेही घेता येऊ शकतात. त्यातूनही कलात्मकतेची अनुभूती घेता येते. संमेलनाच्या व स्मरणिकेच्या निमित्ताने जाहिरात देणाऱ्या दातृत्त्ववान लोकांची, संस्थाची ओळख होते. शिवाय विविध लेखकांची लेखनाच्या माध्यमातून ओळख होते.

एकूणच साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेतून वाचक आणि लेखक हा नक्कीच समृद्ध होत असतो. कारण तो एक वाङ्मयीन दस्तावेज असतो. अर्थात कुठलाही दस्तावेज हा समाज आणि संस्कृतीसाठी वैभवसंपन्न ठरत असतो.

(लेखकाने अमळनेर येथे संपन्न झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ‘खान्देश वैभव’ या स्मरणिकेचे संपादन केले आहे.)

प्रा. डॉ. रमेश माने

(मराठी विभाग)

प्रताप महाविद्यालय, अमळनेर, जि. जळगाव.

संपर्क – ९८९०३३१२३७