लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन आवश्यक – रणजीत थिपे

नवी दिल्ली:- लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे, त्यासोबतच ठराविक तसेच निवडक अभ्यास केल्यास इच्छुक विद्यार्थ्यांना निश्चितच यश संपादन करता येईल, असा विश्वास नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले रणजीत हरिशचंद्र थिपे यांनी व्यक्त केला.

श्री. थिपे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. उपसंचालक दयानंद कांबळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी श्रीमती अमरज्योत कौर अरोरा उपस्थित होत्या. श्री. थिपे हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ४८० गुणक्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारीबाबत, ठराविक तसेच निवडक अभ्यास करणे खूप आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मूळचे चंदपूर जिल्ह्याचे श्री. थिपे यांनी नागपूर येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले असून ते कोल्हापूर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पर्यावरण अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत.

प्रतिभेला मेहनत व शिस्तीची जोड आवश्यक
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या प्रश्नावर श्री. थिपे यांनी सांगितले की, परीक्षेसाठी नव्या ऊर्जेने अभ्यासाला लागा व प्रतिभेला मेहनत आणि शिस्तेची जोड द्या. प्रत्येक विद्यार्थी हा प्रतिभावान असतो, मात्र, इच्छित यश मिळविण्यासाठी मेहनत आणि शिस्तही असणे अत्यंत गरजेचे आहे. अभ्यास करताना विषय समजून घेणे व तो समजावून सांगता येणे आणि त्या विषयाचे उचित विश्लेषण करणे या बाबींवर लक्ष दिल्यास अभ्यास सुकर होतो. महाराष्ट्रातील विद्यार्थी मेहनती आहेत असे सांगून, प्रशासकीय सेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशवंत व कीर्तीवंत व्हावे अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *