मुलांना प्राथमिक शिक्षण मराठीतून देण्याचा महाराष्ट्राने संकल्प करावा – राज्यपाल

मुंबई,२७:- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. मात्र त्यासाठी सर्व महाराष्ट्राने मुलांना प्राथमिक शिक्षण मराठीतून देण्याचा संकल्प केला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साहित्य, संस्कृती व समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ‘वाग्धारा सन्मान’ देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह तसेच वाग्धाराचे अध्यक्ष वागीश सारस्वत उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास यांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. ज्ञानेश्वर महाराजांना लोक ज्याप्रमाणे ‘माऊली’ म्हणून संबोधतात त्याप्रमाणे मराठी ही राज्यातील सर्वांची ‘माऊली’ आहे. या माऊलीचे वैभव वाढावे असे सर्वांना वाटते. परंतु, बहुतेक जण आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठविणे पसंत करतात, असे त्यांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्याचा पुरस्कार करण्यात आला असल्याचे सांगून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी सर्वांनी आपल्या पाल्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीत देण्याचे ठरविले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

आपले स्वतःचे शिक्षण मातृभाषेतून झाले असले तरीही त्यामुळे परदेशी पाहुण्यांशी इंग्रजीतून बोलणे आपल्याला कठीण वाटत नाही, असे सांगून इंग्रजी साहित्य अवश्य वाचले पाहिजे परंतु मातृभाषेचा सार्थ अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ. रामजी तिवारी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला, तर अभिनेत्री शिखा मल्होत्रा यांना करोना काळात नर्स म्हणून केलेल्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

पत्रकार प्रकाश जोशी, वरिष्ठ पोलीस अधिकारी कैसर खालिद यांसह जयंत देशमुख, सुनील मेहरोत्रा, शेखर अस्तित्व, सूरज प्रकाश, रंजन कुमार सिंह, सुभाष काबरा, संजय मासूम, उमाकांत बाजपेयी, सागर त्रिपाठी, वैद्यराज माखन (भोपाल), डॉ. रजनीकांत मिश्र, संयोग कोचर (बालाघाट), सलोनी तोडकरी (मानगांव), मनश्री पाठक (नाशिक), स्मिता गोंडकर (पुणे),दूर्गेश्वरी सिंह महक (नोएडा), आशुतोष कुमार सिंह (दिल्ली), मुकेश प्रजापति मधुर (अम्बेडकर नगर), निकिता राय, डॉ. सागर, नेहा सिंह राठौर (बिहार) यांना देखील सन्मानित करण्यात आले. पद्मश्री सिंधुताई सपकाळ व पंडित अजय पोहनकर यांच्या अनुपस्थितीत वाग्धारा पुरस्कार त्यांच्या वतीने स्वीकारण्यात आले.

You cannot copy content of this page