नांदगाव आरोग्य केंद्राला समाजसेवक श्री. सुरेश डामरे यांच्याकडून वैद्यकीय साहित्य प्रदान
नांदगाव (संतोष नाईक):- कणकवली तालुक्यातील नांदगाव आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वापरण्यासाठी चांगल्या दर्जाचे मास्क, सॅनिटायझर आणि हॅण्डग्लोज समाजसेवक श्री. सुरेश डामरे यांच्याकडून देण्यात आले.
कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढत असून आरोग्य प्रशासनावर त्याचा प्रचंड ताण येत आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी साधने वस्तू अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे मास्क, सॅनिटायझर आणि हॅण्डग्लोज शासनाकडून वेळेवर मिळणे कठीण झाले आहे. म्हणूनच समाजसेवक श्री. सुरेश डामरे यांनी पुढाकार घेत मुंबईवरून नांदगाव आरोग्य केंद्राला सॅनिटायझर आणि हॅण्डग्लोज देऊन आपली सामाजिक बांधिलकी नेहमीप्रमाणे जोपासली आहे.
नांदगाव आरोग्य केंद्राला यापूर्वीही समाजसेवक श्री. सुरेश डामरे यांनी इनव्हर्टर, वैद्यकीय साधने, औषधे दिली आहेत. त्यांनी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला केलेली मदत स्तुत्य असून अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.