दुष्काळासह इतर प्रश्नांचा सामना करण्यासाठी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा – मुख्यमंत्री

▪ संत विद्यापीठ, तिरूपतीच्या धर्तीवर दर्शनबारी, स्काय वॉक प्रकल्पांना मंजुरी
▪ मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास मान्यता
▪ पंढरपूर शहरासाठी भुयारी गटार योजनेला निधी
▪ नामसंकीर्तन सभागृहासाठी भरघोस निधी

पंढरपूर:- राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आणि त्याच्या पशूधनला दिलासा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बळ मिळावे, असा आशीर्वाद पांडुरंगाकडे मागितला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. पंढरपूरमधील सर्व विकास प्रकल्प वारकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सोबत घेऊनच मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास वास्तूचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार प्रशांत परिचारक, भारत भालके, सुजीतसिंह ठाकूर, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा साधना भोसले, मंदिर समितीचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब डांगे, बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, आषाढी एकादशीच्या दिवशी इच्छा असूनही वारकऱ्यांना कोणतीही बाधा येऊ नये म्हणून पंढरपूरला आलो नाही. मात्र माझा विठ्ठल हा ठायी-ठायी आहे. त्यामुळे घरातील देव्हाऱ्यातील विठ्ठल-रूक्मिणीची पूजा केली. पंढरपूरमध्ये राज्यासह देशातून भाविक येतात. मंदिर समितीच्यावतीने बांधण्यात आलेल्या भक्त निवासामुळे या भाविकांची मोठी सोय झाली आहे. सर्वांना या भक्त निवासाचा लाभ होणार आहे. त्यामुळे हे भक्त निवास पांडुरंगाच्याही पसंतीस उतरेल.

पंढरपूरमध्ये संत विद्यापीठ, स्काय वॉक, तिरूपती बालाजीच्याधर्तीवर दर्शनबारी यासह नामसंकीर्तन सभागृह या प्रकल्पांना राज्य शासनाच्यावतीने मंजुरी देण्यात येत असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, पंढरपूरचे संस्कार जिवंत ठेवण्याचे काम तसेच वारकरी संप्रदायातील संतांचा वारसा या ठिकाणी उभा राहणार आहे. या निमित्ताने हे संस्कार पुढच्या पिढीला समजतील. त्याच बरोबर मंदिर समितीच्या माध्यमातून वारकऱ्यांची आणि पांडुरंगाची सेवा करणाऱ्या मंदिर समितीच्या सेवकांचा आकृतीबंधाला मंजुरी दिल्याची घोषणा श्री. फडणवीस यांनी केली.

`नमामि चंद्रभागा` या प्रकल्पाच्या माध्यमातून भीमा नदीच्या उगमापासूनचे शुध्दीकरण करण्यात येत आहे. पंढरपूरला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांना केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्यामुळे या रस्त्यासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून या रस्त्यांची कामे गतीने सुरू आहेत. पंढरपूर शहरातील रस्ते विकासासाठी नगरोत्थान प्रकल्पामधून १८० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. शहरातील रस्त्यांची काही कामे बाकी असल्यास त्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, त्यालाही मान्यता दिली जाईल. तसेच पंढरपूर शहरासाठी भुयारी गटार योजनेला मंजुरी देण्यात आली असून त्याचेही काम वेगाने सुरू असल्याचे ते म्हणाले.

नामदेव महाराज स्मारकाचा आरखडा तयार असून या स्मारकाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. एकनाथ महाराज पालखी मार्गासह ६५ एकराच्या विकासाला निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच यात्रा अनुदानही ५ कोटीपर्यंत वाढविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री. चंद्रकांत पाटील म्हणाले, भक्त निवासाच्या माध्यमातून अतिशय सुंदर वास्तू उभारण्यात आली आहे. मंदिर समितीच्या माध्यमातून पांडूरंगाच्या दर्शनाला आलेल्या वारकऱ्यांची यामुळे सोय झाली आहे. वारकऱ्यांसाठी यापुढेही मंदिर समितीने नवनवीन संकल्पना राबवाव्यात.

यावेळी मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मराठा समाजाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मंदिर समितीच्यावतीने डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अतुल भोसले यांनी केले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य, वारकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *