मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारात योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

मुंबई, दि. २० :- मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच भाषेचा प्रचार आणि प्रसार करुन भाषा संस्कृती संवर्धनासाठी योगदान देणारे शासकीय सेवेतील मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मराठी भाषा विभागातर्फे कौतुक करण्यात आले.

मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या हस्ते पुस्तक आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलींद गवादे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मराठी भाषा विभागातर्फे दि. १४ ते २८ जानेवारी या दरम्यान ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले होते. आजचा कार्यक्रम मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत पार पडणार होता. मात्र, राज्यमंत्री महोदय प्रकृती अस्वस्थतेमुळे येऊ शकले नाहीत. या कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा पाठविल्या आणि सर्व सन्मानार्थींचे अभिनंदन केले. शासकीय कर्मचारी आणि अधिकारी आपले कामकाज सांभाळून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योगदान देतात, म्हणून त्यांचे कौतुक केले पाहिजे, अशी सूचना मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. त्यानुसार मागील वर्षापासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यानुसार मंत्रालयात अभिवाचन व काव्य वाचन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. अभिवाचन स्पर्धेचा विषय ‘स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि स्वातंत्र्योत्तर भारत’ हा होता तर ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके आणि कवी वसंत बापट यांनी रचलेल्या कवितांचे वाचन करण्यासाठी काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

अभिवाचन स्पर्धेत शिल्पा नातू, अतुल कुलकर्णी, मंगल नाखवा, पूजा भोसले, संजना चाळके विजयी झाले. काव्यवाचन स्पर्धेत कौमुदी मरगज, अनिरुद्ध देशपांडे, शिल्पा नातू, संगीता बेडेकर, पूजा भोसले, अतुल कुलकर्णी, आणि अनिल आव्हाड विजयी झाले. यावेळी विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देण्यात आले. या दोन्ही स्पर्धांसाठी परिक्षक म्हणून श्रीनिवास नार्वेकर व श्रीमती राजश्री पोतदार यांनी काम पाहिले.

सन्मानपत्राने सन्मानित झाले शासकीय अधिकारी कर्मचारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी, कर्मचारी हे आपल्या कामकाजाच्या माध्यमातूनही मराठी भाषेच्या संवर्धनात मोठ्या प्रमाणात हातभार लावत असतात. त्यांच्या या कामाची दखल शासनाने घेतली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रभारी संचालक श्री. दयानंद कांबळे यांनी मराठीतील बातमीला नवमाध्यमांची जोड देऊन पत्रकारितेला नवीन आयाम दिला आहे. त्यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून जगभरातील मराठी भाषिकांना एकत्रित जोडण्याचे काम केले आहे. उपसंचालक श्रीमती सीमा रनाळकर या प्रदर्शन शाखेच्या प्रमुख आहेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने विविध माध्यमांसाठी त्यांनी संकल्पना चित्रे तयार केले. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी मराठी भाषेतून विपूल लिखाण केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील या तीन अधिकाऱ्यांसह मंत्रालयातील इतर कर्मचारी आणि अधिकारी यांचे सन्मानपत्र आणि पुस्तक देऊन कौतुक करण्यात आले.

मंत्रालयातील वाचकांना आवडीचे पुस्तक उपलब्ध करुन देणारे पुस्तक विक्रेते अनिल सुर्वे, मंत्रालय आवारात अभिजात मराठी भाषेचे दालन उभारणारे नेपथ्यकार सुनिल देवळेकर आणि मराठीतून स्वाक्षरी शिकविणारे कला शिक्षक गोपाल वाकोडे यांना यावेळी विशेष प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

You cannot copy content of this page