मागणी आणि आवश्यक नसताना १५ लाख रुपयांचा साकव बांधला! अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे शासनाचा निधी वाया!
शासनाच्या पैशांचा अपव्यव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी!
कणकवली (प्रतिनिधी):- विकास कामांसाठी जनतेला विविध खात्याच्या कार्यालयात अनेक प्रस्ताव पाठवावे लागतात, त्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात, त्या त्या अधिकाऱयांना पटवावे लागते आणि शेवटी विकास कामातून किती टक्केवारी मिळेल? यावर ते विकासाचे काम मंजूर होऊन पूर्णत्वास जाईल की नाही? ते ठरते. मात्र कणकवली तालुक्यातील आयनल गावात कोणाचीही मागणी नसताना (आमदारांचे मागणीचे पत्र आता त्याच कार्यालयाला सापडत नाही) आणि आवश्यकता नसताना १५ लाखांचा साकव बांधला; तोही नियमांची पायमल्ली करून व खोटी माहिती जोडून! यासंदर्भात आयनल गावातील जेष्ठ नागरिक आणि निवृत्त शासकीय अधिकारी श्री. जयसिंग साटम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला प्रताप चव्हाट्यावर आणला आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांच्या चिकित्सक वृत्तीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाचा लाखो रुपयांचा निधी कसा वाया घालविला; त्याचे वास्तव समोर आणले आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, आयनल गावठण येथे २०१९ साली सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १५ लाख रुपये खर्च करून साकव बांधण्यात आला. सदर साकवाला २०१४-१५ मध्ये विशेष घटक योजना साकव कार्यक्रम अंतर्गत मंजुरी देण्यात आली होती. हा साकव व्हावा, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आणि ग्रामसभेचा ठराव नसतानाच हा साकव बांधण्यात आला. त्यामुळे ह्या १५ लाख रुपयाच्या साकवाचा उपयोग शुन्य असून शासनाच्या पैशांचा अपव्यव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सदर साकवाची आवश्यकता असल्याचे भासविण्यासाठी अधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्रे तयार केली.
१) `आयनल बौद्धवाडी येथे साकव बांधणे’ असा प्रस्ताव तयार झाला पण प्रत्यक्षात साकव बौद्धवाडीपासून दोन किलोमीटरवर असलेल्या गावठण वाडीत बांधला गेला.
२) सदर साकवाचा वापर १८० लोकसंख्या असणारी बौद्ध / अनुसूचित ग्रामस्थ करणार आहेत; असे प्रस्तावात नमूद करण्यात आले. मात्र जनगणनेनुसार तेथील लोकसंख्या (बौद्ध / अनुसूचित ग्रामस्थ नसलेली) ४९ च्या आसपास आहे.
३) साकवाच्या दोन्ही बाजूला रस्ता आहे आहे; असे प्रस्तावात नमूद केले आहे; मात्र साकवाच्या दोन्ही बाजूला शेती असून साधी पायवाटही नाही.
४) सदर साकवाच्या शंभर मीटर अंतरावर आयनल चाफेड भरणी रस्ता आहे आणि त्यावर मोठे पूल असून बारामाही वाहतूक सुरु असते. ही बाब मुद्दामहून लपविण्यात आली.
५) सदर साकव तात्कालीन आमदार प्रमोद जठार यांच्या मागणी पत्रावरून मंजूर करण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद आहे; परंतु माहितीच्या अधिकारात सदर मागणीचे पत्र मागितले असता ते मागणीचे पत्र सापडत नसल्याचे लेखी कळविण्यात आले आहे.
असे असताना सदर अनधिकृत साकव आयनल ग्रामपंचायतीने आपल्या ताब्यात घेतला. ग्रामपंचायतीने ह्यासंदर्भांत दक्षता घेणे गरजेची होती; पण तसे झाले नाही. आता आयनल रोहिलेवाडी पावणादेवी मंदिर धनगरवाडी ते बौद्धवाडी रस्त्यावर देवाचा चाळा येथे विशेष घटक योजनेंतर्गत साकव बांधण्याची मागणी तेथील ग्रामस्थांची आहे. हीच मागणी आयनल ग्रामपंचायतीने संबंधित खात्याकडे केली आहे. ह्याचाच अर्थ आयनल गावठण येथे झालेला साकव रोहिलेवाडी पावणादेवी मंदिर येथे होण्याची गरज असताना मागणी आणि आवश्यक नसताना १५ लाखाचा साकव आयनल गावठण येथे बांधला.
ह्यासंदर्भात श्री. जयसिंग साटम यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाची देवगड, कणकवली आणि रत्नागिरी येथील कार्यालये तसेच कोकण भवन येथे पत्र व्यवहार केला, माहितीच्या अधिकारात सर्व माहिती जमा केली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा केलेला प्रताप चव्हाट्यावर आणला.
विकास कामांसाठी ग्रामस्थांना विविध कार्यालयांमध्ये-लोकप्रतिनिधींकडे वर्षानुवर्षे विनंती करावी लागते. तरीही विकासकामे होत नाहीत. मात्र ठेकेदाराला अनुकूलता दाखवून अधिकारी वर्ग आवश्यक नसणाऱ्या विकास कामांवर शासनाचा निधी खर्च करतात. ठेकेदारांना काम देण्यासाठी खोटे प्रस्ताव तयार करून ग्रामीण पातळीवर आवश्यक नसणारी लाखो रुपयांची कामे केली जातात. आपल्या स्वस्वार्थासाठी अधिकारी वर्ग शासनाचा अशाप्रकारे निधी वाया घालवत असतील तर त्याची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवरून घ्यावीच लागेल.