सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसाठी एसटी फेऱ्या त्वरित सुरु करा!

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांना निवेदन

कणकवली (प्रतिनिधी):- `कोरोना महामारीच्या दरम्यान बंद असलेल्या एसटी सुरु कराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अवैध प्रवासी वाहतूक रोखावी आणि जिल्ह्यातील एसटी आगारांमधील समस्यांबाबत उपाययोजना करण्यात याव्यात!’ अशी मागणी करणारे निवेदन सिंधुदुर्गच्या ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना देण्यात आले.

निवेदन दिल्यानंतर सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनीफ भाई पीरखान, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अमेय मोरे, कणकवली तालुका सदस्य मनोज वारे उपस्थित होते.