नांदगाव बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारांना आर्थिक अडचणीत आणणारा आणि सामान्यांच्या गैरसोयीचा!

नांदगाव (प्रतिनिधी):- कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील बाजारपेठ १ जून ते ८ जून बंद ठेवण्याचा अयोग्य निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे नांदगाव दशक्रोशितील सामान्यांची गैरसोय होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जाते; परंतु ह्या तुघलगी निर्णयाने काहीच साध्य होणार नाही; अशी स्थानिक व्यापारांची आणि सर्वसामान्य जनतेची भावना आहे.

नांदगाव येथील व्यापारी वर्ग गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्णपणे काळजी घेऊन आणि शासनाचे सर्व नियम पाळून आपला व्यवसाय करीत आहेत. कोरोना महामारीने व्यापारी वर्ग आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. तरीही ते प्रशासनाला सहकार्य करतात. ह्या पुर्वीही नांदगाव येथील व्यापारांनी आपली दुकाने बंद ठेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चोख नियोजन केले; परंतु पुन्हा पुन्हा बाजारपेठ बंद ठेऊन नेमके काय साध्य करायचे आहे? असा व्यापारांचा संतप्त सवाल आहे.

नांदगाव बाजारपेठ आठ दिवस बंद ठेवल्याने कोरोनाचा प्रसार थांबेल; असं म्हणणे संयुक्तीक ठरणारे नसून तथाकथित नेत्याने स्वत:च्या प्रसिद्धीसाठी असे चूकीचे निर्णय घेऊ नयेत; असे मत अनेक व्यापारांनी मांडले. नांदगाव येथील व्यापारांची अधिकृत सभा न होता नाक्यावर झालेल्या चर्चेने असे निर्णय लादल्यास व्यापारांचा उद्रेक पाहावयास मिळेल.

नांदगाव बाजारपेठेमध्ये दशक्रोशितील गावांमधील गरीब कष्टकरी जनता, शेतकरी, वृद्ध येत असतात. पाऊस सुरू झालेला आहे. कोरोनामुळे जनताही त्रस्त झालेली आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांची त्यामुळे प्रचंड गैरसोय होणार आहे. अशा चुकीच्या निर्णयामुळे भविष्यात नांदगाव बाजारपेठेवर गंभीर दुष्परिणाम होईल. कारण जनता आज आपली सोय करेल आणि नांदगाव ऐवजी प्रत्येक गावातील दुकाने आवश्यक तो माल ग्राहकांना पुरवतील. मग बाजारात येणार कोण? ह्याचा विचार आजच व्यापारांनी करावा; अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे.

नांदगाव बाजारपेठ यापुर्वी बंद ठेवण्यात आली आणि लगत असलेल्या असलदे गावात अनधिकृतपणे मासळी बाजार एका तथाकथित गावपुढाऱ्याने सुरू केला. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोरोनाचा प्रसार झाला. त्याचप्रमाणे शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करीत असताना, जनता कफ्र्यूला सहकार्य करताना व्यापारांनी आपली दुकाने बंद ठेवली किंवा ठराविक वेळेत दुकाने सुरू ठेवतात. परंतु नांदगाव बाजारपेठ लगत असलदे गावात गोवा बनावटीची दारू अनधिकृतपणे राजरोसपणे विकली जाते. त्यावर कोणीही निर्बंध आणत नाहीत. तथाकथित पुढाऱ्याच्या दारू धंद्यामुळे खऱ्याअर्थाने कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका अधिक संभवतो. तोच तथाकथित पुढारी नांदगाव व्यापारांना आणि रिक्षा व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडतो. मग तो आपला अनधिकृत दारू धंदा बंद का करीत नाही? असा सवाल नाक्यावरील झालेल्या चर्चेत एका जेष्ठ व्यापाराने सडेतोडपणे विचारताच संबंधित तथाकथित नेत्याची भंबेरी उडाली; तरीही त्याने नांदगाव बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय लादला. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page