कोविड संसर्गामुळे आई वडिलांच्या मृत्यूने अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व शासन स्वीकारणार

नवीन योजना मंत्रिमंडळाने केली मंजूर; अनाथ बालकांच्या नावे ठेवली जाणार ५ लाख रुपयांची ठेव

मुंबई:- कोविड -१९ मुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काही बालकांच्या आई आणि वडील अशा दोनही पालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या अनाथ झालेल्या बालकांना दिलासा देण्याविषयी आम्ही विचार करत होतो. त्यानुसार अशा बालकांचे पालकत्व स्वीकारण्यास राज्य शासन खंबीर असून प्रतिबालक ५ लाख रुपये त्यांच्या नावे मुदत ठेव ठेवण्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.‍ त्याशिवाय अन्य योजनांचा लाभ देऊन बालकांचे संपूर्ण पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले.

अ‍ॅड. ठाकूर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कोविडच्या संसर्गाने अचानक दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. अशा बालकांना मायेचा अधार देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शून्य ते अठरा वयोगटातील बालकांसाठी नवीन योजना महिला व बालविकास विभागामार्फत आणण्याबाबत विचार केला जात होता. केंद्र शासनाचे अर्थसहाय्य मिळेल तेव्हा मिळेल. परंतु, राज्य शासन म्हणून आम्ही आमची जबाबदारी गांभीर्याने पूर्ण करणार आहोत. त्यासाठीच अशा बालकांच्या नावे ५ लाख रुपये मुदत ठेव ठेऊन त्या रकमेचा उपयोग भविष्यात त्यांच्या पुनर्वसनासाठी करण्यात येणार आहे. दरम्यान या बालकांचे संगोपन करण्यास कोणी नातेवाईक पुढे न आल्यास शासनाच्या बालसंगोपन गृहात दाखल करण्यात येईल.

You cannot copy content of this page