पुढील वर्षीच्या ३३ कोटी वृक्षारोपणात शासन लोकांचा सहभाग वाढविणार
सर्व वृक्षारोपण मोहिमांतील जिवंत झाडांची माहिती वन विभागास द्यावी
ठाणे:- यापूर्वी पार पडलेल्या २, ४ आणि १३ कोटी वृक्षारोपण मोहिमेतील किती झाडे जिवंत आहेत याविषयीची माहिती ३१ जानेवारीपर्यंत सर्व विभागांनी वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी तसेच पुढील वर्षी म्हणजे २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने जनतेतून जास्तीत जास्त सहभाग कसा मिळेल याचे नियोजन करण्याच्या सुचना वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी काल दिल्या. यादृष्टीने लोकशिक्षण व प्रबोधन होणे गरजेचे आहे यावरही त्यांनी भर दिला.
येथील नियोजन भवनाच्या सभागृहात कोकण विभागाच्या वृक्ष लागवडीचे नियोजन आणि तयारीचा आढावा श्री.खारगे यांनी घेतला. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील तसेच सर्व जिल्हाधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल) उमेश अग्रवाल, तसेच वन विभागाचे अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी भूमी बँक तयार करणे, मार्च २०१९ पर्यंत रोपांसाठी खत, माती भरून खड्डे तयार करणे, नद्यांच्या किनाऱ्यांपासून १ किमी अंतरावर वन, शासकीय, झासागी जमिनींवर वृक्षारोपण करणे, खासगी क्षेत्रावर फळ, बांबू लागवडीस प्रोत्साहन देणे, सामाजिक वृक्ष लागवडीचा सहभाग मोठा असावा यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यावसायिक यांच्याशी करार करून त्यांना सहभागी करून घेणे अशा स्वरूपाच्या सुचना विकास खारगे यांनी दिल्या.
रानमळा धर्तीवर वृक्ष लागवड, कन्या वन समृद्धी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळझाड योजना, नरेगा अशा विविध योजनेतील वृक्ष लागवडीस गती द्यावी, कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना फळझाड लागवडीसाठी उत्तेजन द्यावे असे सांगून विकास खारगे म्हणाले की, १ कोटी व्यक्तींची हरित सेना उभारण्यात येत असून त्यासाठीही २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत जास्तीत जास्त नोंदणी करावी. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली या पालिकांनी त्यांच्या पाणीपुरवठा स्थळांवर त्रिपक्षीय करार करून मोठ्या प्रमाणावर रोपे लावावीत तसेच कांदळवन लागवडही त्या त्या क्षेत्रात होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.