उद्या सिंधुदुर्गातील ५ हजार ९४१ सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी होणार
सिंधुदुर्गनगरी दि. 22 ( जि.मा.का) : जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत क्षेत्रीय तपासणी संच ( फिल्ड टेस्ट किट) च्या माध्यमातून उद्या दि. 23 फेब्रुवारी 2022 रोजी एकाची दिवशी अभियान स्वरुपात जिल्ह्यतील एकूण 431 ग्रामपंचायतीमधील 741 महसुली गावातील 5 हजार 941 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पांतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे; हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी पाणी गुणवत्ता संनियत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीसाठी क्षेत्रीय तपासणी संचाच्या ( फिल्ड टेस्ट किटच्या ) माध्यमातून स्थानिक लोकांना सक्षम करण्यात येणार आहे. विशेषतः स्थानिक महिलांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत स्तरावर गावनिहाय पाणी गुणवत्ता तपासणीकरिता प्रति महसुली गाव 5 महिलांचे जैविक फिल्ड टेस्ट किट H2S व्हायलसबाबत प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. प्रशिक्षित पहिलांद्वारे दि. 23 फेब्रुवारी 2022 रोजी एकाच दिवशी अभियान स्वरुपात जिल्ह्यातील एकूण 431 ग्रामपंचायतीमधील 741 महसुली गावातील 4 हजार 941 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे जैविक FTK-H2S व्हायलस वापरून तपासणी करम्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागात साथरोग प्रतिबंध आणि निवारणाच्या दृष्टीकोनातून पाणी नमुन्याची तपासणी करणे अत्यावश्यक आहे. तरी सर्व ग्रामपंचायतीतील ग्रामसेवत, जलसुरक्षक आणि प्रशिक्षित महिलांनी सदर दिवशी योग्य नियोजन करून जैविक FTK-H2S व्हायलसद्वारे पाणी तपासणीसाठी सहभाग घेऊन सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन अध्यक्ष, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
जैविक फिल्ड टेस्ट किटद्वारे तपासणीमध्ये स्त्रोताचे 20 मि.ली. पाणी दिलेल्या व्हायलसमध्ये मार्कपर्यंत भरून 24 तास ठेवण्यात येणार आहे. 24 तासानंतर जर त्या पाण्याचा रंग बदलल्यास किंवा काळा झाल्यास सदर पाणी पिण्यास अयोग्य असणार आहे. त्वरीत सदर स्त्रोतांचे मार्गदर्शक सूचनानुसार ग्रामपंचायतच्या जलसुरक्षकाने टी.सी.एल. पावडरद्वारे शुद्धिकरण करुन पाणी नमुना प्रयोगशाळेत जैविक तपासणीसाठी पाठविण्यात यावेत.
महसुली गावनिहाय केंद्र शासनाच्या WQMIS संकेतस्थळावर हे जैविक पाणी नुमने तपासणीचे निष्कर्ष फोटो सहित नोंद करण्यात येणार आहेत.