माहिती आणि जनसंपर्क विभागाला उर्वरित महाराष्ट्राचे वावडे का? -मराठी पत्रकार परिषदेचा प्रश्न
मुंबई: मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबई म्हणजेच महाराष्ट्र आहे का? किमान माहिती आणि जनसंपर्क विभागाला तरी असे वाटते… कारण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यासाठी जी समिती नेमली आहे त्यातील सर्वच्या सर्व म्हणजे नऊ ही सदस्य मुंबईचेच आहे.. माहिती आणि जनसंपर्क विभागाला उर्वरित महाराष्ट्राचे एवढे वावडे का? हा प़श्न आता विचारला जात आहे.
माहिती आणि जनसंपर्क विभाग आपल्या निर्णयाने दररोज नवनवे विक्रम प्रस्तापित करीत असते.. पंढरीनाथ सावंत यांना ज्या विभागाने पत्रकारितेतील अतुलनीय कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे त्याच विभागाने त्यांची पेन्शन नाकारण्याचा उद्दामपणा केला आहे.. आता पुरस्काराच्या निमित्तानं वेगळं नाटक केलं गेलं आहे..
पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य करणारया पत्रकारांना सरकार विविध पुरस्कार देऊन सन्मानित करते.. त्यासाठी राज्यभरातून प्रवेशिका मागविल्या जातात.. आलेल्या मुठभर प्रवेशिकेतून पुरस्कर्तीथींची निवड केली जाते.. त्यासाठी एक समिती नेमली जाते.. माहिती महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करते.. यंदाच्या समितीत खालील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे..
नरेंद्र कोठेकर, मुंबई, विद्याधर चिंदरकर मुंबई, रेनी अब्राहम, मुंबई, इंदरकुमार जैन मुंबई, शेख अहमद अस्लम मुंबई, रश्मी पुराणिक मुंबई, रवींद्र आंबेकर मुंबई, अशोक पानवलकर मुंबई, अरूण कुलकर्णी मुंबई..
वरील सर्व सन्माननीय सदस्य मुंबईकर आहेत.. मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रात या समितीत काम करण्यास एकही पत्रकार पात्र नाही असे माहिती जनसंपर्क विभागाला वाटत असावे.. गंमत अशी पुरस्कारासाठी ज्या प्रवेशिका येतात त्यातील बहुतेक प्रवेशिका ग्रामीण भागातील असतात.. माहिती आणि जनसंपर्क विभागाला ग्रामीण महाराष्ट्राचे वावडे का? असा सवाल मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी,कार्याध्यक्ष विजय जोशी यांनी विचारला आहे.