छत्रपती शाहू महाराज, आधुनिक भारताचा लोकराजा!

बहुजनांच्या उद्धाराचे कार्य करणारे छत्रपती शाहू महाराज!

छत्रपती शाहू महाराजांच्या शरीराला मॉलिश करणारा त्यांचा बॉडीगार्ड धनगर, मॉलिश करतानाच त्यांच्या पलंगावर गाढ झोपी गेला! आपल्या पलंगावर झोपलेल्या त्या निरागस धनगराला न उठविता आपली रजई त्यांच्या अंगावर घालून शाहू राजे त्या धनगराच्या घोंगडीवर झोपले! धनगराच्या घोंगडीवर आनंदाने झोपणाऱ्या राजाचे मन केवढे आभाळाएवढे होते; हे पाहिले की मन भरून येतं! (माझे पत्रकारितेतील गुरुवर्य कै. प्राचार्य मुकुंदराव कदम यांनी २००९ साली लिहिलेला लेख, पुन्हा प्रसिद्ध करीत आहोत! संपादक- नरेंद्र हडकर)

छत्रपती शाहू राजे हे कोल्हापूर संस्थानाचे स्वातंत्र्यपूर्व काळातील आदर्श राजे! ब्रिटीश काळात भारतात साडेसातशे संस्थाने होती. ही संस्थाने म्हणजे मोठी गंमत होती. दहा पंधरा गावांचेही संस्थान होती आणि या संस्थानाचे प्रमुख स्वतःला राजे समजत असत! राजा म्हणजे ईश्वराचा अंश मानला जायचा आणि राजाच्या घरी जन्माला येणाऱ्या बालकालाही वैभवशाली जीवन जगता यायचे. संरक्षण आणि सैन्य ब्रिटीश राज्यकर्ते सांभाळायचे आणि त्यासाठी संस्थानांकडून खर्च वसूल केला जायचा. हा पैसा संस्थानिक कष्टकरी शेतकऱ्यांकडून आणि कारागिर-व्यापाऱ्यांकडून जमा करायचे! राज्य संरक्षणाचे महत्वाचे काम नसल्याने बहुतेक संस्थानिक ऐषारामात लोळत राहायचे-नाचगाण्यात वेळ घालवायचे. ब्रिटीशांनी भारतातील संस्थानिकांना व्यसनी, छंदी आणि दुबळे करून सोडले होते. अशा प्रतिकूल आणि गुलामीच्या वातावरणात स्वतःच आणि स्वत्व टिकवून धरणारा राजा शाहू खराखुरा राजाच होता.

शाहू राजे हे जनतेचे राजे होते. आपले सिंहासन हे जनतेचे आहे आणि जनतेच्या कल्याणासाठी त्याचा वापर करायला हवा ही जाणीव असणारा हा एकमेव राजा! ब्रिटीशांची गुलामगिरी शाहू राजांना मान्य नव्हती. परंतु उघडपणे बंड करणे म्हणजे बहुजनांच्या उद्धाराचे कार्य करण्याची मिळालेली संधी वाया घालवायची हे शहाणपण या राजाकडे होते. ब्रिटीश साम्राज्याचे वर्चस्व झुगारून देणे एकट्या संस्थानिकाला शक्य नाही; हे शाहू राजांना माहित होते. छत्रपतींच्या घराण्यात बंडखोरी करणे आणि स्वतंत्र राज्य स्थापन करणे हा वारसा होता. छत्रपती शिवराजांनी हेच केले होते आणि ताराराणींनी त्याच मार्गांनी जाण्याचे ठरविले होते. कोल्हापूर संस्थानचे राजे चिमा यांनी ब्रिटीशांविरोधी असे बंड करून स्वतः फाशीच्या तख्तावर चढण्याचे शौर्य गाजविले होते. शाहू राजांच्या अंगात तेच तेज आणि वीरश्री होती. परंतु अशा भावनिक वीरश्रीने काहीच हाती लाभत नव्हते, हे जाणण्याचा शहाणपणा शाहू राजांकडे होता. त्यामुळे त्यांनी राज्याची गादी जनतेच्या म्हणजे गरीब
आणि कष्टकरी जनतेच्या उद्धारासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. दलित आणि कष्टकरी जनतेला सामाजिक न्याय देण्यासाठी आपली गादी वापरता येऊ शकते आणि त्याचा फायदा राज्याच्या गोरगरीब जनतेला देता येऊ शकतो; हे शाहू राजांनी जाणले आणि त्यांच्या मनातील परकिय राजसत्तेविरोधीची बंडखोरी कष्टकरी व अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी वापरावी हा निर्णय घेतला.

सामाजिक सुधारणा, शिक्षण विषयाचा आग्रह आणि समाज प्रबोधन राज्यात घडवून आणायला ब्रिटीश सरकारचा विरोध नाही; हे राजांना माहित होते. त्यामुळे त्यांनी अस्पृश्यता राज्यात संपवायला हवी हा विचार मनात घेतला आणि त्यादृष्टीने कार्य करायला सुरुवात केली. अस्पृश्यता मोडायची असेल तर समाज जागा करायला हवा आणि समाज जागा करायचा तर त्याला शिकून शहाणा करणे गरजेचे आहे; हे वास्तव शाहू राजांच्या लक्षात आल्याने संस्थानात त्यांनी अस्पृश्यांच्या मुलांना मोफत वसतीगृह सुरू केली. अस्पृश्यता घालवायची असेल तर अस्पृश्यता खोट्या धर्म अंधश्रद्धांच्या संस्कारांनी ज्यांच्या मनाचा ताबा घेतला, त्या बहुजन समाजातही जागृतता आणायला हवी; हे शाहू राजांना कळून चुकले. त्यांनी सर्व जातींच्या मुलांची वसतीगृहे सुरू करण्यास सर्व जातींच्या पुढाऱ्यांना प्रोत्साहन दिले आणि आर्थिक मदतही केली. स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला सामाजिक परिवर्तनाची परिवर्तनवादी चळवळ करणारा हा राजा द्रष्टा होता. भविष्याचा वेध घेणारा होता; ही गोष्ट आज प्रकर्षाने समोर येते आणि शाहू राजे किती महान आणि थोर होते; ते लक्षात येते!

छत्रपती शिवाजी राजांचा वारसा सांभाळणारे शाहू राजे आधुनिक काळात शिवाजी राजांएवढेच दूरदृष्टीचे आणि बुद्धिमान होते याची प्रचिती येते. राज्य हे जनतेचे आहे आणि आपण सिंहासनावर बसलो आहोत ते जनतेचे प्रतिनिधी आहोत; ही छत्रपतींची दृष्टी शाहू राजांकडे असल्याने त्यांनी राजेपण कधीच सोडून दिले आणि साध्या कष्टकरी माणसासारखे जगणे पसंत केले! राजेशाही आहार सोडून दिला, वावरणे आणि मिरविणे बंद केले आणि सामान्य जनतेत मिसळून वावरायचे; हा जीवनाचा मार्ग निश्चित केला. धनगर, मांग, पासेपारधी, महार, गोंधळी आदी लोकांच्या कला आणि कौशल्ये आनंदाने पाहिली आणि त्यांना प्रोत्साहन दिले! हा राजा धनगरांच्या बकऱ्यांच्या झुंजी आनंदाने पाहायचा आणि पारध्यांच्या कोंबड्यांची लढत पाहून खूष व्हायचा! मांगांची शरीरयष्टी पाहून त्यांचे कौतुक करून त्यांना मल्लविद्येकडे कसे
आकर्षित करता येईल? त्याचा विचार हा राजा करायचा! सारे लोक आपले आहेत, एका रक्ताचे आहेत. जाती-पाती आणि धर्म हे सारे लबाड आणि स्वार्थी लोकांनी निर्माण करून आपला फायदा साध्य करण्याची ती योजना मुद्दाम तयार केली आहे; याची जाणीव राजांना होती आणि म्हणूनच सर्व जाती धर्मांच्या गरीब व कष्टकरी जनतेला एकत्रित करण्याचा सतत प्रयत्न त्यांनी केला! समाजाभिसरणाची ही प्रभावी प्रक्रिया शाहू राजांनी महाराष्ट्रात प्रथम सुरू केली. म. ज्योतिबा फुले या समाज सुधारकाने समाजातील जातीव्यवस्था नष्ट करून समाज जागृत करण्याचे कार्य हाती घेतले होते; हे खरे आहे. परंतु बहुजन समाज जागृतीची ही चळवळ शाहू राजांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नेण्याचे काम केले. महाराष्ट्रात आज अन्य राज्यांपेक्षा बहुजन समाज एकसंघ दिसत आहे; त्यांची मुळे छत्रपती शाहू राजांच्या सत्यशोधक चळवळीत सामावलेली आहेत.

देशभरातील समाज जातीभेदांनी विकलांग झालेला असताना कोल्हापूर संस्थानाचा राजा जातीभेद तोडून सारा बहुजन समाज एक कसा करता येऊ शकेल याचा विचार शंभर वर्षापूर्वी करीत होता. हे पाहिले की शाहू राजांची भविष्यभेदी दृष्टी लक्षात येते आणि त्यांच्यासारखा राजा महाराष्ट्रात झाला; हे महाराष्ट्राचे भाग्यच ठरते!

छत्रपती शाहू राजे राजघराण्यात जन्माला आले नाहीत. त्यांचा जन्म कागलाच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे घाटगे घराणे हे सरदार घराणे होते. छत्रपतींच्या गादीला वारस हवा म्हणून या मुलाला दत्तक घेण्यात आले! आपण छत्रपती घराण्यात दत्तक आलो आहोत- आपली ही गादी नव्हे ही गोष्ट संवेदनशील शाहू राजांना सतत लागून राहिली होती. त्यामुळे त्या गादीचा मोह आणि आस्था राजांना कधीच वाटली
नाही. जे नशीबाने आणि योगायोगाने मिळाले ते मिरविण्यात पुरुषार्थ कसला? याची जाणीव त्यांना होती. त्यामुळेच त्यांच्या शरीराला मॉलिश करणारा त्यांचा बॉडीगार्ड धनगर, मॉलिश करतानाच त्यांच्या पलंगावर गाढ झोपी गेला! आपल्या पलंगावर झोपलेल्या त्या निरागस धनगराला न उठविता आपली रजई त्यांच्या अंगावर घालून शाहू राजे त्या धनगराच्या घोंगडीवर झोपले! धनगराच्या घोंगडीवर आनंदाने झोपणाऱ्या राजाचे मन केवढे आभाळाएवढे होते हे पाहिले की मन भरून येतं!

गरीब आणि कष्टकरी जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा राजा शेवटपर्यंत गरीब जनतेच्या उद्धारासाठी काम करीत राहिला आणि सर्वसामान्यांची प्रगती पाहून खूष होत गेला. शेतकऱ्याचा मुलगा मॅट्रीक झाला आणि त्याची बातमी राजवाड्यावर आली की शाहू राजे त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना राजवाड्यावर बोलावून घेत आणि त्यांचे कौतुक करीत असत.

शाहू राजे १८१४ साली कोल्हापूर संस्थानाच्या सिंहासहासनावर बसले आणि १९०२ सालात ब्राह्मणेत्तरांना संस्थानाच्या नोकरीत आरक्षण दिले! आरक्षणापूर्वी संस्थानातील कारकून, मामलेदार, कलेक्टर, न्यायाधीश आदी पदांवर ब्राह्मण आणि तत्सम उच्च जातीचीच माणसे निवडली जायची. अशा माणसांकडून बहुजन समाजाला न्याय मिळणे कठीण असायचे. शाहू राजांनी हे ओळखले आणि बहुजन समाजांतील शिकलेली मुले राजांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागी नेमली! आपल्या जागा बहुजन समाजातील म्हणजे खालच्या जातीच्या लोकांना मिळू लागल्या आणि त्याला शाहू राजे कारण ठरले म्हणून कोल्हापूर संस्थानातील ब्राह्मण संतप्त झाले आणि त्यांनी आपल्या तक्रारी लोकमान्य टिळकांकडे पोहचविल्याचे काम सुरू केले. शाहू राजे नोकऱ्यांपुरतीच सुधारणा करून थांबले नाहीत तर गावपातळीवरची व्यवस्था बहुजन समाजाकडे दिली. धार्मिक विधींचा आणि धर्मसंस्कारांची मक्तेदारी ब्राह्मण समाजाकडे होती ती मक्तेदारी मोडण्यासही राजांनी सुरुवात केली. शाहू राजांच्या या समाज सुधारण्याच्या कार्याने काहीजण बिथरले आणि त्या वर्गाने महाराजांना बदनाम करण्यास सुरुवात केली.

डॉ. आंबेडकर हे दलितांचे नेते दलितांसाठी काम करायला लागलेले पाहून शाहू राजांना आनंद वाटला. त्यांनी डॉ. आंबेडकरांचे अभिनंदन करण्यासाठी परळच्या त्यांच्या चाळीत गेले आणि शाबासकी दिली! दलित समाजांतील एक तरूण दलित समाजासाठी काम करायला तयार झाला हे ऐकून आनंदणार आणि आपले राजेपण विसरून एक सहृदयी माणूस म्हणून डॉ. आंबेडकरांना त्यांच्या घरी भेटायला गेला ही गोष्ट
स्थितप्रज्ञ योग्याला शोभणारी नाही? असा राजा महाराष्ट्राला लाभला हे सुदैव आहे!

अशा या महामानव राजाचा पुतळा देशाच्या संसद भवनाच्या प्रांगणात उभारला गेला आणि त्याचे अनावरण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्राच्या कन्येच्या हस्ते झाला आहे, ही घटनाच औचित्यपूर्ण आहे. ज्या कोल्हापुरच्या नेत्यांनी शाहू राजांवरील प्रेमाने हे कार्य पूर्णत्वाला नेले त्यांच्याबाबतही आम्ही कृतज्ञच आहोत. महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाची आणि खऱ्या धर्मनिरपेक्ष राजकारणाची ओळख हा मानवतावादी महामानवाचा पुतळा देशाला सतत करून देईल अशी आमची श्रद्धा आहे!

(पा. `स्टार वृत्त’-प्रसिद्ध ता.३१ मार्च २००९)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *