सर्वांगिण विकासाला पुरक वैचारिक तत्वे आणि श्रमांची उपयुक्तता पटवून देणारी `श्रमसंस्कार छावणी’
सामाजिक भान जपणारी गोपुरीतील आगळीवेगळी श्रमसंस्कार छावणी संपन्न!
सामाजिक भान जपणारी गोपुरीतील आगळीवेगळी श्रमसंस्कार छावणी मे महिन्यात संपन्न झाली. त्या शिबिरात सहभागी झाल्यानंतर नेमका काय अनुभव आला, तिथे काय शिकता आलं? हे सर्व सांगणारा हा लेख प्रसिद्ध करीत आहोत. वाचल्यानंतर `गोपुरी’च्या महान सामाजिक कार्याचे अधिष्ठान लक्षात येईल. -संपादक
कोकणातील गांधी म्हणून ओळखले जाणारे आप्पासाहेब पटवर्धन यांनी निसर्गाने नटलेला समृद्ध असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोपुरी या ठिकाणी चलनशुद्धी, विमुद्रिकरण, सेंद्रिय खत, आधुनिक शेती, आधुनिक शौचालय अशा कित्येक संकल्पना मांडल्या आहेत आणि त्या प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ०५ मे १९४८ रोजी एक संशोधन प्रकल्प उभा केला तो म्हणजेच गोपुरी आश्रम. यातून आजही अनेकांना काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळतेच…
आणि म्हणूनच तेथील व्यवस्थापकांनी या वर्षी ०५ ते ११ मे या कालावधीत एक आगळीवेगळी श्रमसंस्कार छावणी आयोजित केली होती. या श्रमसंस्कार छावणी मध्ये मी ही एक विद्यार्थी म्हणून सहभागी झालो होतो. खरं तर ही ह्याला छावणी म्हणण्यापेक्षा एक वैचारिक बैठकच म्हणायला हवी. कारण या छावणीसाठी लाभलेले वक्ते हे त्या त्या क्षेत्रातील तज्ञ होते, त्याचबरोबर सकाळी प्रार्थना, त्यानंतर श्रम करण्यासाठी आश्रमात आम्ही जायचो व दुपारच्या सत्रात वैचारिक मार्गदर्शन व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम अशी एकूणच शिबिराची रूपरेषा होती.
शिबिराच्या पहिल्या दिवशी लाभलेले मा. संकेत मुनोत यांनी गांधीजींबद्दल आज जे अनेक गैरसमज पसरवले जात आहेत; त्याबद्दल बोलताना खरे गांधी आणि त्यांचे विचार आम्हाला पटून दिले. त्याचबरोबर गांधीजींची हत्या ज्या नथुराम गोडसेने केली त्याचा विरोध दर्शवून ‘जे नथुरामला समर्थन दर्शवतात त्यांनी प्रथम गांधी वाचावे आणि त्यांचे विचार समजून घ्यावे’ असे सांगितले सरांनी गांधी समजून घेताना … ह्या विषयातील अनेक संदर्भ देऊन आमच्या प्रत्येकाच्या मनात आम्ही अजूनही न समजलेला गांधी रुजवण्याचा प्रयत्न मुनोत सरांनी केलेला आम्हाला पाहायला मिळाले. त्याच दिवशी संध्याकाळी गांधीजींच्या आयुष्यावर चित्रपट दाखवण्यात आला. गांधीजींनी दिलेल्या सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रांना जर आपण आपल्या जीवनात रुजवले तर नक्कीच आजचा युवक हा गांधीजींनी पाहिलेला भारत साकार करू शकतो आणि हाच उद्देश ठेऊन दिवसभर गांधीजींचा जीवनपट आमच्यासमोर उलगडून दाखविला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रार्थना करून आम्ही गोपुरी आश्रमात श्रम करण्यासाठी गेलो तर निसर्गाने नटलेला गोपुरी आश्रम त्यामध्ये आंबा, फणस, चिकू, पेरू यांसारख्या फळझाडांची लागवड केलेली होती. सोबतच भाजीपाल्याची सुद्धा शेती केली होती. त्याच बरोबर एक छोटीशी नर्सरी त्या ठिकाणी होती. दोन दिवस त्या नर्सरी मध्येच काम केलं तर एक दिवस केळी लागवडी साठी खड्डे खणले. त्याचबरोबर आम्ही ज्याठिकाणी राहायचो तिथे जाण्यासाठी जो कच्चा रस्ता होता; त्यावर सुद्धा माती टाकण्याचे काम केले. खरंच श्रमाची किंमत तेव्हाच समजते जेव्हा आपण स्वतः करतो. काही शिबिरार्थ्यांसाठी हे काम नवीन होते; कारण काही शहरी भागातून आलेले होते. त्याच बरोबर पुणे, बीड अशा लांब पल्ल्याच्या जिल्ह्यातून शिबिरार्थीं आले होते. सर्वांनी मनापासून काम केले व त्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. नर्सरीमध्ये काम केल्यामुळे झाडांची ओळख झाली त्याचबरोबर त्यांचे उपयोग सुद्धा आम्हा सर्वांना समजले. झाडांची लागवड कशी करायची? त्याची निगा काशी राखायची? हे देखील आम्हाला शिकता आले. त्याचबरोबर नारळीच्या झावळ्यांपासून शोभेच्या वस्तू बनवायचे प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले. त्यामुळे आम्ही निसर्गाशी जोडलो गेलो होतो.
मा. लक्ष्मीकांत देशमुख हे नुकत्याच झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, त्याच बरोबर मराठीतील प्रतिभावंत साहित्यिक त्यांना भेटण्याची खूपच इच्छा मनात घर करून होती. ती इच्छा शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण झाली. सर दिवसभर आमच्यासोबत होते. त्यांचा विषय ‘साहित्य आणि समाज’ हा होता. सर त्या बद्दल बोलताना म्हणाले, साहित्यातील सौंदर्याची परिभाषा बदलायला हवी; कारण ज्या साहित्यात समाजातील वास्तवभान व समाजातील घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब असते ते साहित्य वास्तववादी असते. साहित्य समाज मनावर परिणाम करत असते आणि म्हणूनच साहित्यिकांनी राजकारण, समाजकारण; , अर्थकारण यावर भाष्य करायला हवे. सर आम्हाला प्रेरणा देताना म्हणाले,“माणसाला माणूस बनवण्यासाठी पुस्तके उपयोगी पडतात आणि म्हणूनच आजच्या तरुण पिढीने पुस्तके वाचायला हवी.” सरांबरोबर दिवसभर खूप चर्चा झाली त्यातूनच मला साहित्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळवता आली.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे आणि म्हणूनच आपली अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे; परंतु आज आपण पाहिले तर देशातील शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. असे का होते? हे समजून सांगताना तिसऱ्या दिवशी लाभलेले डॉ. सतीलाल पाटील हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी उद्योजक. त्यांनी शाश्वत शेती आणि जागतिकीकरण या विषयावर अतिशय महत्वाचे आणि आजच्या घडीला देशातील शेतकऱ्यांना महत्वाची माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी भ्रमण केलेल्या देशांबद्दल सुद्धा माहिती आम्हाला दिली. त्यांनी आम्हाला जग फिरवून आणले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ते एका प्रवासाच्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाले की, एकदा भारत ते म्यानमार हा दुचाकीवरून प्रवास केला; परंतु परतत असताना भारताच्या सीमेलगतच त्यांचा अपघात झाला आणि त्यात ते जखमी झाले. त्यामुळे त्यांना प्रवास अर्धवटच करता आला. परंतु ते जेव्हा एक महिन्याने त्यातून सावरले त्या वेळी पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन आपला राहिलेला प्रवास पूर्ण केला. म्हणजे ध्येयवेड्या प्रवास करणाऱ्या सतीलाल पाटील यांनी जीवनात कितीही मोठे संकट आले तर तिथे थांबायचे नाही, आपले ध्येय पूर्ण करायचे! असा संदेश आम्हा सर्व शिबिरार्थींना दिला.
शिबिराच्या चौथ्या दिवशी सकाळी श्रम करून आल्यावर शिबिराच्या आयोजक मनीषा पाटील मॅडम यांनी ‘स्वतः बद्दल बोलू काही’ अशा स्वरुपाचा एक कार्यक्रम घेतला. शिबिरार्थींनी स्वतःच्या आयुष्यातील घडलेल्या घटना सांगितल्या. प्रत्येकाच्या आयुष्यात काहींना काही घडतच जे खरच भयानक असते; तर काहींमध्ये परिवर्तन घडवणारे असते. खरंच प्रत्येकाने आपले अनुभव सांगताना डोळे पानावतील असे अनुभव सांगितले. जे त्यांच्या मनात रुतून बसले होते. मॅडमांनी हा घेतलेला कार्यक्रम मनाला भावणारा होता; कारण स्वतः बद्दल सांगायला एक विचारपीठ प्रत्येकाला मिळाले. त्याच दिवशी दुपारच्या सत्रात आत्माराम परब सरांनी आम्हाला मार्गदर्शन केले. सर ईशा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, मुंबई याच्या माध्यमातून जगभर टूर्स घेऊन जात असतात. सरांचे ‘लडाख प्रवास अजून सुरू आहे ‘ हे पुस्तक माझ्या वाचनात आले होते. त्यामुळे त्यांना भेटण्याची इच्छा होती. पर्यटन व्यवसायातून रोजगार संधी या विषयावर बोलताना सरांनी इतर देशातील प्राणी, पक्षी त्याच बरोबर लडाखमधील निसर्ग सौंदर्य आम्हाला दाखवले. त्याचबरोबर कोकणात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसाय होऊ शकतो. मात्र कोकण हे पर्यटन व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टीकोनाने पाहत नाही ही खंत सुद्धा व्यक्त केली.
जतीन देसाई सरांचे नाव खूप ऐकले होते; कारण ते नेहमी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संबंध यावर न्युज चॅनल्स वर बोलत असतात. एक जागतिक दर्जाचे अभ्यासक व महाराष्ट्रातील जेष्ठ पत्रकार व समीक्षक आम्हाला त्यांच्या सारखे मार्गदर्शक लाभले ही खरच मोठी गोष्ट आहे. सर आम्हाला सकाळी ११ वाजल्यापासून रात्री २ वाजे पर्यंत मार्गदर्शन करत होते. आम्हाला ते ऐकावसं वाटत होतं, कारण ते समाजकारण, राजकारण, आणि अर्थकारण या विषयावर अतिशय सखोल माहिती दिली. त्याचबरोबर भारत – पाकिस्तान यांच्या संबंधित सुद्धा सर बोलताना मलाला व डॉ. अब्दुल सलाम या नोबेल पारितोषिक विजेत्यांबद्दल सरांनी माहिती दिली. आत्ताच्या सरकारने जे निर्णय योग्य नियोजन न करता घेतलेत त्यावर टीका करून `१५ लाखाची वाट मी सुद्धा पाहतोय’ असं सांगून गाजर दाखविणाऱ्या मोदींनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्याचबरोबर टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट मिळवण्यामध्ये आज विकला जातोय. येथील जे राजकारणी आहेत त्याच्या दबावामुळे मीडिया आज जनतेची दिशाभूल करतो आहे, असे देखील ते म्हणाले. खरंच जतीन देसाई सरांमुळे ज्ञानाचे भंडार आम्हा समोर खुले झाले.
शिबिराच्या सहाव्या दिवशी सिंधुदुर्ग दर्शनासाठी होता. त्यात आम्ही गार्डन, समुद्रकिनारा, सेवांगण, काजू व्यवसाय, आंबा व्यवसाय व काही धार्मिक स्थळे सुद्धा पहिली. खरं तर आमची सहल ही अभ्यास पूर्ण होती. कोकणात आंबा आणि काजू यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. अशाच उत्पादनावर प्रक्रिया करून परदेशातही त्या वस्तूंची निर्यात करू शकतो. त्यासाठी नवीन प्रोजेक्ट सिंधुदुर्गमध्ये उभारले जात आहेत. कोकणाला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभला आहे, परंतु त्याचा उपयोग तेथील स्थानिक लोक करताना दिसत नाहीत; जर त्याकडे लक्ष दिले तर नक्कीच पर्यटनाच्या बाबतीत कोकण अग्रेसर होऊ शकते.
शिबिराच्या शेवटच्या दिवशी आम्हाला महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या व्यक्ती म्हणजेच साम टीव्ही चे संपादक व लेखक संजय आवटे सर वक्ते म्हणून लाभले. सरांनी जात – धर्म आणि राजकारण या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केले. असे म्हणणे योग्य ठरणार नाही; कारण सरांनी चर्चा सत्रच घेतले. जातीय व्यवस्था आणि त्याचे परिणाम यावर सरांनी सुरवातीला मार्गदर्शन केले. त्यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले. सोबतच ‘अच्छे दिन आले की नाही? ‘ यावर चर्चा घेऊन मोदींनी घेतलेल्या निर्णयांवर दोन गटात चर्चा घेण्यात आली. त्यातूनच नोटबंदी, बुलेट ट्रेन, GST या विषयांवर चर्चा झाली. आता ज्या योजना मोदी सरकार जनतेसमोर आणत आहे, त्याचे नियोजन योग्य पद्धतीने केले जात नाही. परिणामी त्याचा तोटा इथल्या जनतेला भोगावा लागतोय. त्याचबरोबर धार्मिक राजकारण करून मोदी सरकार धर्मवाद निर्माण करत आहे का? हा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला. एकूणच सरांनी सध्याच्या वास्तववादी राजकारणाचे चित्र आम्हा समोर उभे केले. त्यावर ते म्हणाले- ‘माणसांची किंमत पैशांच्या फुटपट्टीवर मोजतात, ती व्यवस्थाच आपण बदलायला हवी’ यामध्ये आम्हा युवकांची भूमिका कोणती आहे? याचीही जाणीव सरांनी आम्हाला करून दिली.
शिबिराचा शेवटचा दिवस असल्याने त्या दिवशी संध्याकाळी शिबिराचा समारोप करण्यात आला. त्या निमित्ताने सर्व शिबिरार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याच बरोबर मनिषा पाटील मॅडम यांनी आपले अनुभव आम्हाला सांगितले व मुंबरकर सर जे गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मुंबरकर मॅडम, अमोल सावंत, मंगेश नेवगी, सदाशिव राणे या सर्वांच्या मेहनतीमुळे हे शिबीर यशस्वी झाले. व्यवस्थापन समितीने नेहमी आम्हा शिबिरार्थींचा विचार करून आमची काळजी घेतली. विचारांची उधळण झालेल्या या शिबिरामुळे जे नवीन विचार आम्हाला मिळाले ते नक्कीच आम्हा सर्वांमध्ये परिवर्तन घडविणारे होते. एकूणच या शिबिरात नियोजन, वेळ, पुस्तके आणि अनुभव यांचा आयुष्यात अत्यंत महत्वाचा वाटा असतो आणि हेच आम्हाला या शिबिरात शिकायला मिळाले. शिबिरातील नियोजन उत्तम होते त्याचबरोबर सर्व वक्ते हे आम्हा युवकांना प्रेरणा देणारे होते. अशा वैचारिक उधळण करणाऱ्या शिबिराला मला येण्याची संधी मिळाली. त्यामुळे सर्व आयोजकांचे मनापासून आभार आणि पुढील काळात अशी शिबीरे होणे अत्यंत महत्वाचे आहे.
धन्यवाद….!
तुषार राजेश्री दिपक मांडवकर
७७७४९४७४७६