ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा आणि भविष्य…
शिक्षण म्हणजे काय?
विज्ञान आपल्याला सांगतं, आईच्या गर्भाशयात असतानाच बाळाची शिकण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. आपण त्याला `गर्भसंस्कार’ म्हणतो. त्यावेळी बाळ श्रवणाद्वारे म्हणजेच ध्वनीद्वारे शिकत असते. जन्माला आल्यावर मुलांची ऐकणे, बघणे, चव घेणे, स्पर्शाद्वारे थोडक्यात संवेदनाद्वारे शिकण्याची क्रिया सुरू होते. प्रत्येक मुल हे त्या वेळच्या परिस्थितीनुसार-वातावरणानुसार घडत जाते. शिक्षकांच्या दृष्टिकोनातून बघितल्यावर प्रत्यक्ष शाळेच्या वर्गात शिकणार्या मुलांचे साधारण तीन प्रकार पडतात. पुढच्या बेंचवर बसणारी मुलं, मधल्या बेंचवर बसणारी मुलं आणि शेवटच्या बेंचवर बसणारी मुले. पुढच्या बेंचवर बसणारी मुलं प्रचंड मेहनती तर शेवटच्या बेंचवर बसणारी जास्त बंडखोर प्रवृत्तीची असतात. मधल्या बेंचवरील मुलांमध्ये यातील संमिश्र भाव आढळतो. ही मुलं थोडी लाजणारी असतात.
मुलांबरोबर त्यांच्या पालकांचेही तीन प्रकार पडतात; १) शहरी, २) शहरी ग्रामीण, ३) ग्रामीण. ब्रिटिशांच्या काळात मॅकोलेने बनविलेल्या पद्धतीनुसार स्वतंत्र भारताची शिक्षण पद्धती अनुसरली गेली. ब्रिटिशांनी स्वतःचा फायदा नजरेसमोर ठेवल्यामुळे भारतीय शिक्षणव्यवस्थेत प्रचंड त्रुटी निर्माण झाल्या. त्यातील सगळ्यात महत्त्वाची त्रुटी म्हणजे कल्पनाशीलतेचा अभाव अर्थात त्याचा प्रभाव आपल्या शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धतीवरही पडला. त्याचे परिणाम आपल्याला १९९० च्या दशकापर्यंत सर्व क्षेत्रात पडल्याचे दिसतात. १९९० नंतर राजकीय अपरिहार्यतेमुळे आपल्याला आपली अर्थव्यवस्था खुली करणं भाग पडलं. त्यावेळी संपूर्ण जगाला भारताच्या प्रचंड मोठ्या बाजारपेठेच्या क्षमतेची हळूहळू जाणीव होऊ लागली. जगाला जाणीव झाली तसे आपणही जगाच्या जवळ जावू लागलो. माहिती तंत्रज्ञानामधील प्रचंड विस्फोटक क्रांतीमुळे माहितीचे, मोठ्या प्रमाणात ज्ञानाचे दरवाजे आपल्यासाठी सताड उघडले. ज्ञानाचा अर्थ म्हणजे निव्वळ माहिती नव्हे. शिक्षणातून मिळणारे ज्ञान ही कोणा एकाची मक्तेदारी नाही. हे यातील सगळ्यात मोठं फलित होतं.
ऑनलाइन शिक्षणाची गरज…
भारतात ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात कधी झाली? भारतात जेव्हा टेलिव्हिजन आले तेव्हा दूरदर्शनच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात झाली; असं म्हणता येईल. आज ऑनलाईन शिक्षणाची व्याख्या अशी सांगते की, `जे इंटरनेटद्वारे मिळते ते ऑनलाइन शिक्षण.’ कोरोनाच्या या भीषण संकटाच्या वेळी जाणवलेल्या प्रत्यक्ष गोष्टी आपल्याला असं सांगतात. भारतात शाळेत प्रत्यक्ष न जाता प्रत्येक घरात घेतले जाणारे शिक्षण हे ऑनलाइन या सदरातच मोडेल. मग ते माध्यम कोणतेही असू दे. यापुढे शाळा ही संकल्पना अप्रत्यक्षरीत्या अस्तित्वात असेल. तीन बेंचवरील मुलांची सरमिसळ झालेली असल्याने शिक्षण शिकविण्याच्या पद्धतीलाच हादरे बसले आहेत. पालकांमध्येही सरमिसळ झाल्याने त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. सगळ्यात मोठी जबाबदारी असेल शिक्षकांची. नवीन तंत्रज्ञान आणि संस्कार यांची योग्य सांगड घालूनच शिक्षण मुलांपर्यंत पोहोचविणे ही दुहेरी कसरत शिक्षकाला करावी लागेल. प्रत्यक्ष संपर्क नसताना मुलांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान शिक्षकांना पेलायचे आहे. पालकांचे सहकार्य असताना किंवा नसताना ही गोष्ट साध्य करायची आहे. आपले राज्यकर्ते आज आपल्याला सांगताहेत, कोरोनाबरोबर जगण्याची आपण सवय करून घेऊया.
कोरोनाची लस सध्या आपल्या दृष्टीक्षेपात आहे; पण ती प्रत्यक्ष आपल्यापर्यंत निर्वेध पोहोचेपर्यंत काय काय होईल? याची भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात आपण कल्पना तरी करू शकतो का? तेव्हा ज्या माध्यमातून आपण आपल्या पाल्याचं शिक्षण सुरू केलंय; ते माध्यम बळकट करणे, त्याबद्दल प्रश्न मांडून त्याची उत्तरे शोधून काढणे, त्यातील त्रुटी दूर करणे; हीच काळाची गरज आहे.
भारतात ऑनलाइन शिक्षण कसे असावे? याचा आढावा आजच्या घडीला भारतात पर्यायाने महाराष्ट्रात घ्यायला पाहिजे. आज ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याच्या सोयी सुविधांचा अभाव आहे. या क्षेत्रात फार कमी काम झालेले आहे; पण जी परिस्थिती आहे ती अगदी निराशजनक नाही. आपल्याला आपल्या हातात असलेल्या सर्व साधनांचा पुरेपूर वापर करून किंवा सध्याच्या साधनांमध्ये तात्पुरती सुधारणा करून ती साधने ऑनलाइन शिक्षणासाठी वापरता येतील. रेडिओ, टेलिव्हिजन यांचाही वापर सहजपणे करता येईल. खासकरून ग्रामीण भागात जिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, तिथे हा पर्याय वापरता येईल. यासाठी राजकीय इच्छाशक्तीची जोड हवी. जिथे शाळा सुरु करणे शक्य आहे, तिथेही यापुढे ऑनलाइन शिक्षण दिवसातून काही वेळेकरता अनिवार्य असले पाहिजे. यापुढे जर कोरोनासारखे अजून भयंकर संकट आपल्यावर कोसळले तर त्याची ही पूर्वतयारी असेल. यापुढे फक्त गुण कमाविण्यासाठी शिक्षण हे बाजारू स्वरूप नसेल. शिक्षणाच्या लांबीपेक्षा त्याची खोली आता महत्त्वाची असेल.
मी किती वेळ मुलांना शिकवलं आणि मुलांनी किती वेळ अभ्यास केला? यापेक्षा मुलांना किती कळलं? यावर आता भर देणे गरजेचे आहे. शासनाचे धोरण त्याला अनुरूप असेल, ही आशा. आपली इच्छा असो वा नसो आपली मुलं या माध्यमातूनच शिकतील. फक्त या माध्यमाला योग्य वळण देणं, हे आपल्या हातात आहे. ऑनलाइन शिक्षणाचा आपण देव करणार की दानव? हे आपणच म्हणजे शाळा, शिक्षक, पालक, समाज आणि शासन आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी यांच्या हातात राहील.
शिक्षकांची ऑनलाईन शिक्षणातील भूमिका…
दोन प्रकारे शिक्षकांना ही भूमिका पार पाडायची आहे. एक स्वतः शिकणे ज्याला आढावा इंग्लिशमध्ये अपडेट म्हणतो. स्वतःला दर दिवशी नवीन माहितीने सज्ज ठेवणे आणि दुसरे शिकविणे सुद्धा. सोयीसुविधांचा अभाव असल्याने सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या नजरेसमोर नसतील; फक्त मोबाईलची स्क्रीन किंवा कॅमेरा शिक्षकांच्या समोर असताना पोट तिडकीने-आत्मीयतेने शिकविणे; ही निश्चितच कठीण गोष्ट आहे; पण अशक्य नाही. एका वेळेला पन्नास विद्यार्थ्यांना एक शिक्षक जर अर्धा तास शिकवत असेल त्या प्रत्येक शिक्षकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, अर्ध्या तासात तीस मिनिटे असतात. त्यातील पुढील बेंचवरील मुले त्यांना माहीत असतात; ती दहा समजा. याचा अर्थ ती दहा मुले तुमचं निश्चिती ऐकणार आहेत. मधल्या बेंचची तीस मुले आपण सोयीसाठी पकडू. या तीस मुलांसाठीही ३० मिनिटे आहेत. यातील किमान एक मिनिट तरी प्रत्येक मुलाला भावला तरी निश्चितपणे रेकॉर्डिंगच्या माध्यमातून किंवा रिपीट टेलिकास्टच्या माध्यमातून या मुलांचा प्रश्न सोडविता येईल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे; शेवटच्या बेंचवर असणाऱ्या दहा मुलांचा. शिक्षकांना ही मुलेही निश्चितपणे माहीत असतात. या मुलांवर विशेष लक्ष देण्याची गरज असते. पालकांशी दररोज संपर्क साधून ही गोष्टही साध्य होऊ शकते.
नवीन शिक्षक असताना किंवा नवीन विद्यार्थ्यांना शिकविताना मात्र त्या प्रत्येक शिक्षकाला आपला अनुभव समृद्ध करत नेला पाहिजे. इंटरनेट, युट्युब यावरून जो माहितीचा अखंड स्रोत वाहत असतो, तो विश्वासाहार्य आहे की नाही? याची पडताळणी करून म्हणजेच अभ्यास करून त्याचा उपयोग शिकविताना होऊ शकतो. स्वतः तयार केलेल्या किंवा नेटवर मिळणाऱ्या प्रतिमा, ऍनिमेशन याचाही वापर शिक्षक करू शकतात. कोरोनाने `न भूतो न भविष्यती’ प्रकार घडविलेला आहे. संपूर्ण जग तीन-चार महिने पूर्ण ठप्प करण्याचा चमत्कार घडला. त्याचे पडसाद पुढील काळात पडणार आहेत. त्यामुळे मानवी इतिहासात त्याची नोंद कोरोना अगोदरचे जग आणि नंतरचे जग अशी काही वर्षांनी होईल.
जे सजीव अनुकूलनास प्रतिसाद देऊन स्वतःमध्ये बदल घडवितील तेच टिकतील; नैसर्गिक सत्य आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर जे शिक्षक, विद्यार्थी, पालक केंद्रित ठेऊन स्वतःमध्ये अनुकूल बदल सतत करतील; त्या शिक्षकांचे भविष्य निश्चितपणे यापुढे उज्वल राहील. अर्थात हीच गोष्ट सर्व क्षेत्राला कमी-अधिक प्रमाणात लागू असेल.
पालकांची ऑनलाइन शिक्षणातील भूमिका…
आजच्या घडीला कोरोनाने जर सर्वात जास्त परिणाम केला असेल तर पालक या घटकावर केला आहे. स्वतःचे घर, कुटुंब, करिअर सांभाळताना आपल्या पाल्याचे करिअर, शिक्षण, आरोग्य सर्वच गोष्टी प्रत्येक पालकाला बघाव्या लागतात. पण मुळात रोजगार, आरोग्य, अन्नपुरवठा या प्राथमिक गरजा पुरविणाऱ्या चौकडीच जिथे मोडकळीस येतात तेव्हा त्याचे परिणाम सखोल असतात. अशा संकटाच्या वेळी बहुतेक वेळा घरगुती हिंसाचार काही प्रमाणात वाढतो. स्वतःची मनस्थिती थंड ठेवून यावर मात करणे हे एक मोठे आव्हान प्रत्येक पालकांसमोर असेल. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत जर त्या पालकांना शक्य नसेल तर त्याने किमान थोडे दिवस तरी म्हणजे या माध्यमाची सवय आपल्या पाल्याला होईपर्यंत शक्य होईल ती मदत आपल्या पाल्याला करावी. शिक्षकांचा यात मोठा वाटा असेल. आतापर्यंतच्या प्रत्यक्ष अनुभवावरून असे जाणवत आहे की ,बऱ्याच मुलांना व पालकांना या गोष्टीशी जुळवून घेताना त्रास होत आहे. प्रत्येक माध्यमाचे स्वतःचे निश्चित असे फायदे तोटे असतात. आपल्या कुटुंबाचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाला आज तरी पर्याय नाही. याअगोदरही सतरा नंबरचा फॉर्म भरून आपली कितीतरी मुलं घरी अभ्यास करूनच पुढे गेलेली आहेत.
एखादा सशक्त पर्याय आपल्यापुढे येईपर्यंत शिक्षणाची चौकट न मोडणे ही पालकांची जबाबदारी आहे. काही बाबतीत आपले खर्च वाढतील, तर काही बाबतीत कमी होतील. ज्या पालकांना आपल्या मुलांना संपूर्ण वेळ मदत करणे शक्य नसेल त्यांनीही दिवसभरात मुलांनी केलेल्या अभ्यासाची किमान काही मिनिटे तरी आढावा घेणे गरजेचे राहील. स्मार्टफोन असेल तर ऑटोरेकॉर्डिंग-चाईल्डलॉक हे पर्यायही फोन संदर्भात वापरणे आवश्यक आहेत. मुलांची मानसिकता शिक्षकांअगोदर पालकांनाही माहीत असते. प्रत्येक मुल हे त्या पालकाचे प्रतिबिंब असते. पण ते त्या पालकांच्या सर्वच बाबतीत दोन पावले पुढे असते. तेव्हा योग्य तो समतोल ठेवून ही माध्यमे हाताळली तर निश्चितच यातून प्रगती साधता येईल. स्मार्टफोन हा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे. त्यामुळे आपले मुल कोणत्या साईट्स बघतं, कोणते गेम खेळतं? यावर प्रत्येक पालकाने कटाक्षाने नजर ठेवणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याचा अतिरेक होत नाही ना? हेही बघणे गरजेचे आहे. प्रत्येक पालकांचा आपल्या मुलांवर विश्वास असतो, तो ठेवलाच पाहिजे. पण हा विश्वास डोळस असावा.
शाळांची ऑनलाइन शिक्षणासंदर्भात भूमिका…
कोरोना अगोदर प्रत्येक शाळेचा एक स्वतःचा असा वैयक्तिक ठसा होता. कोर्पोरेट भाषेत बोलायचे झाले तर ब्रँड होता. त्याला कारणीभूत होती शाळेच्या व्यवस्थापनाची प्रचंड मेहनत, कल्पनाशीलता, शिक्षकांचा सक्रिय सहभाग. आजच्या घडीला या सर्व गोष्टींची पुनर्रचना करण्याची वेळ प्रत्येक शाळेवर आलेली आहे. आतापर्यंत तयार केलेली यंत्रणा टिकविणे आणि विद्यार्थी पालकांचे समाधान; या दुहेरी संकटाचा सामना शाळांना करायचा आहे. आपण जोपासलेली मूल्यं सांभाळत संस्कारक्षम शिक्षण देऊन पुढची पिढी घडवायचं अवघड आव्हान शाळांसमोर समोर आहे; तेही विद्यार्थी शाळेत येत नसताना. यासंदर्भात एक उदाहरण नजरेसमोर ठेवणे आवश्यक आहे. नोकिया कंपनी जेव्हा मोबाईल क्षेत्रात पूर्ण भरात होती, त्याचवेळेस टच स्क्रीन मोबाईल जगभरात येवू घातले होते. कंपनीने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. जगभरातील मोबाईल क्षेत्रातील सर्वात अग्रेसर असणारी नोकिया कंपनी काही वर्षातच मागे पडली. फोटोग्राफी क्षेत्रात कोडॅक कंपनीचे हेच झाले. शिक्षणाच्या क्षेत्रात याची तुलना न करताही हे ठाम विधान करता येईल की, बदल हा प्रत्येक गोष्टीचा स्थायीभाव आहे. आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, `कोंबडा झाकला तरी सूर्य उगवायचा राहत नाही.’ आज तरी या माध्यमांना विरोध करणाऱ्यांनी विरोध केला तरी उद्याचा दिवस ऑनलाइन शिक्षणाचाच असेल. तेव्हा प्रत्येक शाळेने याला अनुसरूनच अनुकूल बदल हळूहळू करणे यापुढे श्रेयस्कर ठरेल. अनुभवी तत्वनिष्ठ शाळांनी आणि त्यांच्या व्यवस्थापनाने या माध्यमावर पकड मिळविणे गरजेचे आहे.
इंटरनेट हे असे जाळे आहे की ज्यावर वावरत असलेल्या प्रवृत्ती `चांगल्या की वाईट’ हे ओळखणे फार अवघड आहे. म्हणूनच शिक्षणाच्या क्षेत्रात तरी आपली भूमिका ओळखून त्वरित पावले उचलणे श्रेयस्कर ठरेल. आजच्या घडीला विद्यार्थी शाळेत असताना असणारे सर्वच उपक्रम राबविणे शक्य नाही; पण विद्यार्थ्यांचे वेळापत्रक, डायट या संदर्भात महत्त्वाच्या सूचना शाळा सहज करु शकतील. शिक्षकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे, यावर प्रत्येक शाळेने भर दिला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नसेल त्यांनाही थोड्याफार प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे; ही शाळेची जबाबदारी असेल. यासाठी आवश्यकता असल्यास सेवाभावी संस्थांची मदत घेता येऊ शकेल. शक्य झाल्यास सर्व शाळांच्या व्यवस्थापनाने एकत्र येऊन शासनावर प्रभाव टाकावा. स्वातंत्र्यानंतर उभारलेल्या शिक्षणाचा हा डोलारा कोसळू नये; ही सर्वांची जबाबदारी आहे आणि हा डोलारा पेलणारे खांब म्हणजेच शाळा होय.
ऑनलाइन शिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांची भूमिका…
आजचा एक विद्यार्थी प्रचंड चिंतेत तरी आहे किंवा दुसर्या प्रकारचा विद्यार्थी प्रचंड बेफिकीर आहे. हे विधान करण्याला समाजात घडणारे प्रत्यक्ष अनुभव कारणीभूत आहेत. स्वतःचे करिअर-व्यक्तिमत्व याबद्दल सजग असणारा विद्यार्थी आज खरोखरच धास्तावलेला आहे. तर `पुढे येईल ते पुढे बघू’ असे म्हणणारा विद्यार्थी बेफिकीर आहे. आज प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठेवले पाहिजे; यापुढील काळ टायलेन्टचाच असेल. निव्वळ सर्टिफिकेटचा नसेल. कोरोना काळाने हे सिद्ध केलंय. रोजगार क्षेत्रात यापुढे फक्त कुशल हातालाच वाव मिळेल. येऊ घातलेल्या आर्थिक क्षेत्रातील मंदीत टिकाव धरायचा असेल तर उत्पादन क्षेत्रात, सेवा क्षेत्रात असलेल्या प्रत्येक घटकाला आपल्या खर्चावर मर्यादा घालाव्या लागतील. याचा थेट परिणाम रोजगारावर होईल. साहजिकच आजच्या विद्यार्थ्यांवर होईल. हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग जास्तीत जास्त शिक्षणासाठी कसा करता येईल? याकडे प्रत्येक विद्यार्थ्याने कटाक्षाने बघणे गरजेचे आहे. शिक्षण हे फक्त पुस्तकी पांडित्य या अर्थाने हे विधान नाही. मिळणारी माहिती आत्मसात करणे, श्रवण करणे, मनन करणे; सगळ्यात महत्वाचे त्यावर चिंतन करणे. यावर प्रत्येक विद्यार्थ्याचा भर असणे आवश्यक आहे. यातूनच कल्पना उमलतील. यापुढे इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा कल्पना मांडणे, त्या कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करणे; याला महत्त्व येईल. म्हणून विद्यार्थीदशेत असतानाच आपल्या कल्पना लिहून ठेवणे; त्यासंदर्भात त्या अनुषंगाने जास्तीत जास्त माहिती संग्रह करणे, पालकांशी-शिक्षकांशी विचारविनिमय करणे, एक लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करणे; हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. इंटरनेटवर करिअर गायडन्ससारख्या बऱ्याच कोर्सेसचे पेव फुटले आहे; तसेच पेव फुटेल. त्यामुळे कोर्स संदर्भात आवश्यक बाब नीट लक्षात घेऊन त्याचा भविष्यातील उपयोग, आर्थिक निकष तपासून घेऊन व पालकांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीचा निर्णय घ्यावा. आपले डोळ्यांचे, कानांचे आरोग्य नीट ठेवणे, आपली मनस्थिती नीट ठेवणे; सगळ्यात महत्त्वाचे नैराश्यापासून दूर राहण्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा.
प्रत्येक विद्यार्थी हा जगाची, राष्ट्राची, राज्याची, समाजाची, घराची एक अनमोल ठेव असते. ही ठेव भविष्याच्या उन्नतीसाठी जपणे, ही वरील प्रत्येक घटकाची जबाबदारी नाहीतर आद्यकर्तव्य ठरते. टेक्नॉलॉजीच्या आहारी न जाता टेक्नॉलॉजीचे पंख लावून कल्पनेच्या विश्वात भराऱ्या मारत आपल्या घरट्याची, घरटे विसावलेल्या फांदीची, वृक्षाची, तिला आधार देणाऱ्या मातीची काळजी घेणं, तिचा विकास करणं;हेच यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय राहिले पाहिजे.
ऑनलाइन शिक्षणासंदर्भात शासनाची भूमिका
गेल्या त्र्याहत्तर वर्षात भारतात आणि जगभरात दोन क्षेत्रांची प्रचंड हेळसांड झालेली आहे. पहिल्या आरोग्य क्षेत्र आणि दुसरे शिक्षण क्षेत्र. दोन्ही क्षेत्रांचा परिणाम एकमेकांवर होत असतो. आर्थिक निकष लावायचे झाले तर प्रत्येक देशाच्या शासनाने खरोखरच विचार करण्याची वेळ आली की, आपण आपल्या जीडीपीच्या किती टक्के या क्षेत्रासाठी वित्तीय बजेटमध्ये राखून ठेवतो? कोरोनाच्या फक्त तीन महिन्याचा काळातच सर्व विकसित, विकसनशील राष्ट्रांचे पितळ उघडे पडले आहे.
भावनिक मुद्दे बाजूला ठेवून, राजकारण बाजूला ठेवून आपण काही काळ तरी या मुद्द्याकडे गांभीर्याने बघणार आहोत की नाही? भारतासारख्या खंडप्राय देशातील प्रत्येक घटकाचे आज कर्तव्य आहे की, आपण शिस्तबद्धरीतीने शासनाला साथ देऊया. कारण लोकशाहीत आपण सर्व म्हणजेच शासन.
या शासनाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या प्रत्येकाने गेल्या सहा महिन्यात उडालेला गोंधळ जवळून बघितला असेल. हा अनुभव विदारक होता. शिक्षण क्षेत्रापुरतं बोलायचं झालं तर हे संकट किती काळाने आटोक्यात येईल हेच कळेनासे झाले. अजूनही याचा अंदाज येत नाही. परंतु महापुरात तरंगण्यासारखी आज परिस्थिती आहे. तेव्हा योग्य उपाययोजनांवर काम चालू झाले असेल ही आशा…!
ऑनलाईन शिक्षण क्षेत्र हे पुढील भविष्य असल्याने शाळांशी संवाद साधून प्राथमिक सुविधा उभारणे हे शासनाच्या हातात आहे. जसे शिक्षणासाठी स्वस्त दरात स्मार्टफोन उपलब्ध करून देणे, डाटा स्वस्त करणे, जिथे नेटवर्क उपलब्ध नाही तेथे कंपन्या व स्थानिक यातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, शिक्षणासाठी सुरळीत व थोडा स्वस्त दरात वीजपुरवठा उपलब्ध करून देणे, सिम कार्ड-मेमरी कार्ड व शिक्षणाशी संबंधित डिजिटल वस्तूंना करात सवलत देणे. शिक्षणासंदर्भात कर्ज देताना आजही बऱ्याच वित्तीय संस्था नाराज असतात.
स्मार्टफोन, लॅपटॉपसारख्या गोष्टी जर शिक्षक-विद्यार्थी संबंधित असतील तर वित्तीय संस्थांनी आजच्या घडीला कर्ज परत फेडीसाठी जी लूट माजवली आहे; त्याची शासनाने आज गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. ऑनलाइन शिक्षण क्षेत्राविषयी एक ठोस धोरण आखून शिक्षण क्षेत्र परत मजबूत करण्याची शासनासमोर अभूतपूर्व अशी संधी आहे. समाजातील प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन जे शासन ही गोष्ट करेल, त्याची दखल देशातील नव्हे तर जग आणि पर्यायाने इतिहास घेईल. इतिहासावर ठसा उमटविण्याची ही संधी निश्चितच शासन घालविणार नाही.
ऑनलाइन शिक्षणाचा भविष्यकालीन वेध
भारताला प्राचीन काळापासून शिक्षणाचा अतिप्रगत वारसा लाभला आहे. इतिहासात नजर टाकल्यास जाणवेल की, भारताने शिक्षण क्षेत्रात संपूर्ण जगाचे नेतृत्व काही काळ केलेले आहे. काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टी हरविल्या. शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला. ज्ञानासाठी शिक्षण ही प्रवृत्ती बदलून उपजीविकेसाठी शिक्षण ही प्रवृत्ती वाढली. अर्थात ही काही वाईट गोष्ट नाही व नव्हती. परंतु सर्टिफिकेट्ससाठी ही गोष्ट सर्वमान्य व्हायला लागली. तेव्हा अधःपतनाला सुरुवात झाली. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षात इतर देशांच्या तुलनेत आपली प्रगती का झाली नाही? याचे उत्तर हेच आहे. आपण इतर सर्व गोष्टींकडे बोट दाखवीत राहिलो, परंतु इतर बोटे आपल्याकडे निर्देश करीत होती. याची साधी जाणीव आपल्याला झाली नाही आणि यापुढेही ही चूक आपल्याला सुधारायची आहे.
कोरोना काळात आपण विचार केलेला असेल तर यापुढे आपल्याला आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात सर्व क्षेत्रांमध्ये शिस्त बाळगावी लागेल. बेशिस्तीची प्रत्येक समाज मनाने ताबडतोब दखल घेऊन त्यावर शिस्तबद्ध पद्धतीने तोडगा काढणे आवश्यक आहे. आर्थिक मंदी- तिसरे महायुद्ध या गोष्टी क्षितिजावर दिसत आहेत. एकजुटीने त्याला सामोरं जाण्याची आपली आपण तयारी करणं; हे नागरिक म्हणून- राष्ट्र म्हणून आपले कर्तव्य आहे. यापुढे शिक्षण-क्षेत्र बदलत जाणार आहे.
होलोग्राम, आर्टिफिशियल इंटीलिजन्स, क्वांटम थेअरी, नॅनो टेक्नॉलॉजी, बायो टेकनॉलॉजी यांचा वाढता वापर शिक्षण क्षेत्रात होईल. डुकराच्या मेंदूत चिप टाकून त्याचा मेंदू कॉम्प्युटरशी जोडला गेल्याचे प्रयोग आजच्या घडीला चालू आहे. व्हर्च्युअल रिऍलिटीचा म्हणजेच आभासी प्रतिमांचा उपयोग शिक्षण क्षेत्रात उद्या धुमाकूळ घालेल. प्रत्येक विद्यार्थी घरातच राहून शाळेसारख्या वातावरणात शिकेल. स्मार्टफोनचा वापर काळ बाह्य होईल. विद्यार्थ्यांनी घातलेल्या गणवेशात असे सॉफ्टवेअर असेल की तो शाळेच्याच परिस्थितीत शिकेल. शासनाच्या जबरदस्त निर्बंधांना माणसांना तोंड द्यावे लागेल. शिक्षण क्षेत्रात जबरदस्त क्रांती होण्याचे संकेत आहेत. ह्यात आपली इच्छा असो व नसो आपल्याला सहभागी व्हावेच लागेल.
शिक्षण उपासक श्री. भगवान डामरे
शायरन (किरण)
क्रांतीची मशाल नाहीतर नाही…
मंद तेवणारी पणती तर होऊ शकतो मी
जगाला प्रकाश देणारा सूर्य नाहीतर नाही…
अंधार छेदणारा किरण तरी होऊ शकतो मी
गरुडाची झेप नसेल माझ्यात…
पण मधमाशीचे कष्ट तर उपसू शकतो मी
हत्तीचे बळ नसेल माझ्यात…
पण मुंगीची चिकाटी तरी धरू करू शकतो मी
अर्जुनासारखा लक्ष्यभेद करू शकलो नाहीतरी…
एकलव्याची गुरूभक्ती तर आचारु शकतो मी
अशोकासारखा कलिंग नाश नाही…
पण स्वराज्य घडविणाऱ्या शिवरायांचा मावळा तरी होऊ शकतो मी
——————————————–
`शायरन’च का? शायरन हा एक फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ किरण. काळ्याकुट्ट अंधारात हा किरण कदाचित मार्ग नाही दाखवू शकणार; पण निश्चितच आशेची उब तरी देऊ शकतो. सुरेश भटांची एक कविता आठवते;
उषःकाल होता होता काळ रात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
दुर्दैवाने सामान्य माणूस स्वतःच आयुष्य जाळणाऱ्या मशाली होऊ शकत नाही; पण निश्चितपणे अंधारात लुकलुकणारा काजवा होण्याचे धाडस त्याच्यात असते. आदिगुरू शंकराने सगळ्यात पहिल्यांदा मानवी मेंदूचे प्रचंड सुप्त सामर्थ्य ओळखलं म्हणूनच शिवाने हाक दिली `हर हर महादेव’.
प्रत्येकात एक ईश्वर- महादेव होण्याचे सामर्थ्य आहे. शायरन हा आपल्या मस्तकात असणाऱ्या ज्ञानचक्र किंवा आज्ञाचक्र जागृत झाल्यावर मानवी मनाच्या शुद्ध पवित्र जाणिवांना-भावनांना बळ देणारा किरण आहे.
——————————————-
शून्यामध्येच होतसे शिवशक्तीचे तांडव
विस्फोट होताचक्षणी प्रकट ओजस रौरव
तरंगामागे तरंगे ही वल्ह्यामागे वलये
डोले रुद्र भयंकर देई हुंकार प्रलये
घेई जन्म काल बनवे मूलद्रव्य पहिले
बनती तारे त्याचे जे शिव चरणी वाहिले
गळा शोभे धूमकेतू मस्तकी आकाशगंगा
उत्पन्न होई धरा जेव्हा नर्तन येई रंगा
नृत्याच्या पदघाताने पुढे उल्का विकट
आदळे ती धरेवरी नी चंद्र होई प्रकट
बने आवरण वायूंचे फिरे धरेभोवती
शिवशक्तीचा आशीर्वाद राही धरेसोबती
आवरण दुभंगे जो पडे विजेचा चाबूक
कोसळती जलधारा भावुक
महासागरे जन्मे पेशी फुलतसे जीवनी
उत्क्रांतीच्या मार्गे या जीवन होतसे पावन
बिंदूतूनी उगम पावते ऊर्जा निरंतर
बिंदू ऊर्जा पुन्हा बिंदू, त्यात ना पडे अंतर
शिवशक्तिचा खेळ लाघवी लागली दाखवी आभास
जीवनाच्या कवितेत मृत्यूची भूमिका खास
———————–
शिक्षण म्हणजे मधमाशीचे मध गोळा करणं…
शिक्षण म्हणजे मुंगीचं चढावावरती चढणं…
शिक्षण म्हणजे फुलपाखराचं कोषातून येणं…
शिक्षण म्हणजे गरुडाच्या पिल्लाचं हवेत उडणं…
शिक्षण म्हणजे बाबासाहेबांची ती तपसाधना…
शिक्षण म्हणजे टिळकांची ठाम कर्तव्यभावना…
शिक्षण म्हणजे साने गुरुजींच्या वात्सल्याचा पान्हा…
शिक्षण म्हणजे अंधारात प्रकाश देणारा कान्हा…