रयतेचा पहिला स्वराज्यदिन – ६ जून राज्याभिषेक दिन

 

लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३.
संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.

 

“वा रे खुदा, अब तू भी शिवा को सामील हो गया, की शिवाजी राजा बन गया!” – औरंगजेब

६ जून १६७६ हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलेला दिवस. जवळपास ४०० वर्षाची गुलामी मोडून काढत लोकांना स्वतंत्र वातावरणात जगण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले. शेकडो वर्षे दुसऱ्याच्या चाकरीत घालविणाऱ्या हजारो मावळ्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देतानाच त्यांच्यातील शक्तीला सकारात्मक स्वरूप देत उभारलेल्या लोकोपयोगी राज्याला मान्यता मिळवून देणारा हा दिवस आहे. हजारो वर्षांच्या काळात सर्वांना अभिमान वाटावा आणि प्रत्येकाने जगाला सांगावे की, परकीय सत्तेच्या गुलामगिरीतून बाहेर काढतानाच स्वाभिमानाचा धडा देऊन स्वतंत्र मानसिकता देणारा हा दिवस. म्हणून आजच्याच दिवशी मानवतेला धर्म मानून जातीपातीच्या पलीकडील राज्य उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हाच समस्त भारतीयांचा पहिला स्वराज्य दिन.

जगाच्या पाठीवर ज्या – ज्या ठिकाणी भारतीय आहेत वा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित त्यांना आदर्श मानून त्या स्वरूपाची जीवनपद्धती स्वीकारून माणसे जगत आहेत; त्या – त्या ठिकाणच्या लोकांना हा दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातील स्वातंत्र्याचा दिवस असतो. कारण भारताला इंग्रजांच्या ताब्यातून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यकारभारास विसरून पेशव्यांनी राबविलेल्या स्वतंत्र धोरणामुळे इंग्रजानी मराठ्यांचा अर्थातच भारताचा पराभव केला. याचाच अर्थ असा की, भारतात स्वतंत्र राज्य अस्तितवात होते. मग त्यापूर्वी राज्ये नव्हती काय? तर याचे उत्तर आहे की, राज्ये होती; पण ती वंशपरंपरेने चालत आलेली. तसेच आपल्याच लोकांच्या फंदफितुरीमुळे आणि आपमतलबी स्वार्थीपणामुळे देवगिरी येथील विजयनगरच्या राज्याच्या पाडावानंतर भारतभर पसरलेल्या आणि सर्व भारताला गुलाम करणाऱ्या मुघल सत्तेच्या गुलामीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीयांची मुक्तता केली. एवढेच नव्हे तर या सर्व जुलमी राजवटीना आव्हान देत १६४५ साली तोरण्यापासून आपल्या स्वराज्याची सुरुवात करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांचे राज्य उभारले, रयतेच्या मनातील स्वप्न साकारले आणि त्याच स्वराज्याचा राजा म्हणून अधिकृत राज्याभिषेक ६ जून १६७६ ला केला.

या राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला. त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. त्यामुळे हा स्वातंत्र्यदिनच म्हणायला हवा. हे ज्यावेळी दिल्लीच्या औरंगजेब बादशहाला बातमी कळताच त्याने याबाबतीत खुदालाच जबाबदार धरले. त्यामुळे वैतागून तो म्हणतो की,
“वा रे खुदा,
अब तू भी शिवा को सामील हो गया,
की शिवाजी राजा बन गया!”
यातच या राज्याभिषेक सोहळ्याचे महत्व अधोरेखित होते.

विजापूरचा आदिलशहा, गोवळकोंड्याचा कुतुबशहा, अहमदनगरचा निजामशहा, दिल्लीचा मुघल बादशाह, जंजिऱ्याचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज, मुंबईचे इंग्रज, स्वतःचे मांडलिक असणारे आणि दुसऱ्याच्या गुलामीत धन्यता मानणारे वतनदार, जहागीरदार यांच्यासह अनेक परकीय सत्ताना धक्का देत छत्रपती शिवाजी महाराजांनीआपल्या लोकांच्या कल्याणासाठी, रयतेच्या भल्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी मूठभर मावळ्यांना सोबत घेत रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्याच्या विस्तारासाठी रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये हा दंडक आपल्या सैनिकांना घालून देतानाच रयतेस पोटास लावणे आहे हा जाहीरनामा प्रसिद्ध करत त्याप्रमाणे आपल्या राज्याची वाटचाल सुरु ठेवत रयतेचा विश्वास संपादन करतानाच स्वराज्य विस्तार केला. माझे राष्ट्र अगोदर, कुटुंब नंतर आणि अर्थात शेवटी मी ही भावना स्वतःसह रयतेच्या, मावळ्यांच्या मनात रुजवली. त्यामुळे अवघ्या ३५ वर्षाच्या काळात शेकडो वर्षाअगोदर भारतीयांच्या मनातील विझल्या मनाला प्रज्वलित करणारे स्वराज्य निर्माण केले. जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा व एकच राज्य होते की, जेथे लोकांना जगण्यापेक्षा स्वराज्यासाठी कामी येण्याची चढाओढ असायची.

मग ही चढाओढ अफजलखान भेटीच्या वेळी, पन्हाळ्यावरून सुटताना, आग्र्याच्या कैदेतून निसटताना यासह असंख्य ठिकाणी दिसून येते. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात हे राज्य माझे आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात बळावत होती. या भावनेचा प्रमोत्कर्ष बिंदू म्हणजे हा राज्याभिषेक होय. कारण याच कारणामुळे प्रत्येकाच्या भावनेचा, बलिदानाचा, त्यागाचा, शौर्याचा आदर राखला गेला.

आता हे करत असताना वा स्वराज्याची उभारणी करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर अनंत अडचणी, संकटे उभे राहिले, अनेकवेळा मांडलेला डाव अर्ध्यावर सोडण्याची वेळ आली; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आत्मविश्वासाच्या आणि आपल्या जिवलग सहकाऱ्यांच्या जोरावर न डगमगता आपली काटेरी वाटचाल सुरूच ठेवली. आदिलशाही, निजामशाही, इंग्रज, पोर्तुगीज यांच्यासह मुघल सत्तेचे अनेक पराक्रमी सरदार स्वराज्य संपविण्यासाठी आले; परंतु छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मार्गावरून कधीही भरकटले नाहीत. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शहाजीराजे यांची शिकवणच एवढी शक्तिशाली होती की, छत्रपती शिवाजी महाराज अशा संकटातून लिलया पार झाले. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे कौतुक होणे खूप गरजेचे आहे. कारण वडिलांच्या मदतीने विजापूर दरबारी चाकरी वा वडिलांच्या मदतीने दिल्ली दरबारी मनसबदारी वा वडिलांना मिळालेली जहागिरदारी सांभाळत जहागिरदारपुत्र म्हणून बिरुदावली मिरवणे असे सोयीचे व परंपरागत मार्ग उपलब्ध असतानाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या माँसाहेब जिजाऊ व वडील शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिमानास्पद कार्य उभारले. अशक्यप्राय असणाऱ्या अनेक गोष्टी त्यांनी स्वतः पुढाकार घेत पार पाडल्या. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात वाढला. आणि लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपला राजा म्हणून मान्यता दिली.

लोक शिवरायांना राजाच मानत होते; परंतु बऱ्याच काळापासून वतनदारी करणारे, लोकांना लुटणारे आणि मुघलांसह सर्व परकीय शक्ती मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक जहागिरदारांचा उत्तराधिकारी किंवा त्या जहागिरी पुरता राजा एवढेच मान्य करत होते. त्यामुळे कर्तृत्व असूनदेखील छत्रपती शिवाजी महाराजांना वाट पाहावी लागत होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय दूरगामी विचार करत राज्याभिषेक करण्याची तयारी चालवली. त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या. ज्याप्रमाणे स्वराज्याची निर्मिती करताना छत्रपती शिवाजी महाराजांना अडचणी आल्या. स्वकीय आणि परकीय यांनी टोकाची विरोधी भूमिका घेतली, त्याप्रमाणेच राज्याभिषेक करतानाही अनेकांनी (अगदी मंत्रीमंडळातील लोकांपासून) अडचणी उभारल्या. ह्या अडचणी जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचे ठरविले नव्हते, तोपर्यंत कुणीच काही बोलले नाहीत वा विरोध केला नाही, मात्र ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचे नियोजित केले तेंव्हापासून मात्र विरोधाची धार तीव्र व्हायला सुरुवात झाली. हा विरोध एवढा टोकाचा आणि आतल्या गाठीचा होता की, आपल्याला पोटाला ज्यांच्यामुळे मिळते त्यांच्याशी गद्दारी करणे वा त्यांच्या मिठाला न जागने हे योग्य होणार नाही, असा विचारही कुणाच्या मनात आला नाही.

काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय नव्हेत. त्यामुळे त्यांना राजा बनण्याचा अधिकार नाही. त्यावेळी मग छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजस्थानात जाऊन राजपुतांपैकी सिसोदिया घराण्याचे पूर्वज व शिवरायांचे पूर्वज एकच आहेत याचा पुरावा मिळवला आणि राजा बनण्यातील एक अडचण दूर केली. तरीही आता राज्याभिषेक करायचा म्हणजे त्या तोडीचा पुरोहित हवा. स्वराज्याच्या आणि रयतेच्या दुर्दैवाने म्हणा किंवा वर्णवर्चस्ववादी लोकांच्या मुजोर मानसिकतेमुळे म्हणा राज्याभिषेकासाठी एकही पुरोहित महाराष्ट्रात मिळाला नाही वा मिळू नये अशी व्यवस्था करण्यात आली. एका शूद्राने राजा बनणे हे शास्त्रसंगत नाही म्हणून स्वराज्यातील एकाही पुरोहिताने पौराहित्य स्वीकारले नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी व बाळाजी आवजी यांनी काशीच्या पंडित गागाभट्ट यांच्याशी संपर्क साधून त्यांना यासाठी तयार केले. त्यांनीही मोठ्या प्रमाणात दक्षिणा (खंडणी?) घेत राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शविली. आयुष्यात कधीही एका पैचा देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्यात खर्च केला नाही. नाईलाजाने का होईना छत्रपती शिवाजी महाराजांनी या गोष्टीला परवानगी दिली. गागाभट्ट हे रायगडावर आल्यावर देखील त्यांनी हा राज्याभिषेक करू नये, यासाठी काही लोकांनी अडथळे आणले; त्यामुळे पुन्हा पुन्हा गागाभट्ट हे नकार देत होते आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांना विनंती करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय चातुर्याने ही बाब हाताळत राज्याभिषेक पूर्णत्वाला नेला. प्रत्येक वेळी ते अगदी छोट्या – छोट्या गोष्टी साठी देणगी (खंडणी) मागत होते आणि हतबल झालेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांना त्यांच्या गरजा पुरवत होते. यात एक कहर म्हणजे संस्कृत पंडित असणाऱ्या गागाभट्टांनी ऐन राज्याभिषेकावेळी पुरोणोक्त मंत्र म्हणयाला सुरुवात केली; परंतु त्यांच्या दुर्दैवाने म्हणा किंवा कटकरस्थानी वर्णवर्चस्ववाद्यांच्या दुर्दैवाने म्हणा त्यावेळी जवळच संस्कृतमधील महापंडित संभाजीराजे बसून होते. त्यांनी ही चूक गागाभट्टांच्या लक्षात आणून दिली. गागाभट्टांनी मग मात्र आपली चूक मान्य करत वेदोक्त मंत्रांनी राज्याभिषेक पूर्ण केला. विशेष म्हणजे यानंतर समयनयन हा ग्रंथ संभाजीराजांना अर्पण केला होता.

जवळपास ४०० वर्षांपासून गुलामी करणाऱ्या अखंड भारतात अनेक जहागीरदार, वतनदार, राजे असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पाऊल उचलले आणि यशस्वी करून दाखवले. विजयनगरचे राज्य फितुरीच्या साहाय्याने संपुष्टात आल्यानंतर भारताला मूळ भूमीपुत्राचा राजा नव्हता. शेतकरी, कष्टकरी, कामकरी यांना स्वतंत्र अस्तित्व नव्हते. महिला – तरुणी सुरक्षित आणि स्वतंत्रपणे जगू शकत नव्हत्या. ते सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेकाने भारताला व भारतीयांना मिळवून दिले. एवढेच कशाला सगळ्यांना जगण्याचा मार्ग दाखवून दिला. म्हणून इंग्रजांच्या गुलामीतून १५० वर्षांनी आपण १९४७ ला मुक्त झालो असलो तरीही हा राज्याभिषेक दिन पहिला स्वतंत्र दिन म्हणूनच ओळखायला हवा.

आता हा राज्याभिषेक ६ जुनलाच का? त्यामागेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टी आहे. शिवाजी महाराजांच्या मनात हा विचार अनेक दिवस म्हणजे अगदी आग्रा भेटीपासून सुरू होता; परंतु तसा योग जुळून येत नव्हता. आणि लोकांच्या मनातील राजाला लोकमान्यता मिळवून देणारा हा राज्याभिषेक ६ जूनला करण्याचे नक्की झाले. त्यामागेदेखील अनेक कारणे होती.

जेंव्हा विजयनगरचे राज्य अस्तित्वात आले, तेंव्हा ते संपविण्यासाठी सर्व शाह्या एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी विजयनगरचे राज्य संपवले. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः इतिहासापासून धडा घेणारे एक महान व्यक्तीमत्व होते. त्यांनी विचार केला की, आपण जर राज्याभिषेक करतोय हे मुघलांना कळले तर हे सगळे एकत्र येऊन राज्यभिषेक होऊ देणार नाहीत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कळले की, औरंगजेब हा स्वतः पठाणाच्या बंदोबस्तासाठी अफगाणिस्तान या बाजूला गेला आहे. औरंगजेब हा एप्रिल १६७६ ला गेला आणि महाराजांनी अवघ्या दोन महिन्यात ही तयारी करून राज्याभिषेक संपन्न केला.

हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अशीही आवई उठविली की, निजामशहाचा वारसदार हा आमच्या ताब्यात असून तो पेमगीरीच्या किल्ल्यावर आहे, त्याचा राज्याभिषेक होणार आहे. त्यामुळे आदिलशाही, सिद्दी, निजामशाही, कुतुबशाही हे शांत राहिले. आणि महाराजांनी आपल्याला अपेक्षित आहे ते घडवून आणले.

यासोबतच अजून एक महत्वाचे कारण म्हणजे ७ किंवा ८ जूनला मृग नक्षत्र सुरू होते. त्यानंतर आपल्या राज्यातील शेतकऱ्याला शेतीची कामे असतात. त्यामुळे त्यांनाही खूप अडचणीचे ठरू नये आणि वेळखाऊ होऊ नाही अशा विचाराने हा दिवस ठरवला.

तसेच रायगड हा किल्ला स्वराज्यातील अतिशय महत्वाचा किल्ला होता. जून महिन्यात रायगड परिसरात भरपुर पाउस असतो, अशावेळी एखाद्या शत्रूने हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी प्रयत्न केले, तरीही ते त्यांना अडचणीचे ठरावे. यासाठी महाराजांनी कोणत्याही प्रकारचे पंचांग, मुहूर्त वा भविष्य न पाहता हा दिवस निवडला.

यापेक्षाही ६ जून हा दिवस महाराजांनी निवडण्यामागे मला अजून एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे ५ जून (१६५९) हा औरंजेबाचा बादशहा होण्याचा दिवस होता. याच दिवशी अनेक कुकर्मे करून मुघल साम्राज्याचा सम्राट बनला होता. त्यालाही उत्तर म्हणून महाराजांनी ६ जून तारीख निवडली. या तारखेच्या माध्यमातून आपल्या जनतेला संदेश दिला की, आता कालच्या तारखेला औरंगजेबाचे जुलमी राज्य संपले असून, आजपासून आपले स्वराज्य सुरू झाले आहे. या सर्व कारणांचा विचार करून महाराजांनी हा ६ जुनलाच राज्याभिषेक केला.

आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे आज अनेक ठिकाणच्या राज्यात नवीन सरकारच्या स्थापनेवेळी शपथविधी घेतला जातो, त्याला अनेक ठिकाणचे प्रमुख पाहुणे उपस्थित राहत असतात. त्यांच्यासमोर मोठा डामडौल दाखवला जातो. अगदी त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकालाही जवळपास ४०० जण विविध देशाचे, विविध राज्यांचे, विविध ठिकाणचे प्रतिनिधी आणि जवळपास एक लाख लोक उपस्थित होते. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकला एक उच्च प्रतीच्या दर्जा मिळवून दिला. आजच्या सत्तास्थापनेचा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा यात फरक सांगायचं म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतर रयतेला स्वतंत्र मिळाले, रयतेच्या हक्काचा राजा निर्माण झाला. लोक कल्याणासाठीचा राज्यकारभार सुरु झाला. या राज्यात अठरा पगडजाती, बारा बलुते, सर्व धर्म – जाती पंथ – वर्ग यांना समान संधी होती. आताच्या राज्यारोहणानंतरचा राज्यकारभार हा सर्वश्रुतच आहे.

या ६ जून रोजी झालेल्या राज्याभिषेकनिमित्ताने लोकांच्या कल्याणासाठी, रयतेच्या सुखासाठी एका आईने आणि एक वडीलाने जवळपास ५० वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांचा पुत्र राजा झाला आणि समस्त जनता आनंदली, स्वातंत्र्याचे गीत गाऊ लागली. गांजलेल्या, पिचलेल्या, दमलेल्या रयतेला आपला राजा मिळाला. म्हणून ६ जूनला भारतीय इतिहासात खूप मोठे स्थान आहे. ते आपण समजून घेतले पाहिजे, येणाऱ्या पिढीसाठी ते जपले पाहिजे, त्यांच्यापर्यंत ते जिवंत ठेवले पाहिजे.

आजकाल तर असे राज्याभिषेक दर पाच वर्षांनी होतात. हल्ली तर कुणी इकडून तिकडे उडी मारली तरी त्यांचा राज्याभिषेक होतो. संविधानाला साक्षी ठेऊन लोकांच्या कल्याणासाठी झटण्याच्या शपथा घेतल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी विसरल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यकारभार करणाऱ्यांच्या राज्यात मात्र आज रयत उपाशीच राहते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कसलीही शपथ घेतली नाही; पण रयतेच्या हितापासून ते तसूभरही ढळले नाहीत. मी राजा आहे तो रयतेचा, हा एवढा जरी विचार आजच्या पुढाऱ्यांनी केला, तरीही रयतेचे सुराज्य यायला वेळ लागणार नाही. या दिवसाचे महत्व किती आहे हे औरंगजेबाच्या सुरुवातीच्या ओळीतून दिसून येते.

म्हणून आजच्या दिनाच्या निमित्ताने माझी सर्व शिवप्रेमी लोकांना विनंती आहे की, ६ जून राज्याभिषेक दिन हा स्वातंत्र्य दिन म्हणून सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा झाला पाहिजे. शासकीय पातळीवर देखील याचा विचार होणे गरजेचे आहे. सर्वांना पुन्हा एकदा राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!