युवकांच्या रोजगाराचा जीवघेणा प्रवास थांबायला हवा!

अष्टपैलू खेळाडू गीतेश गोपाळ गावडे अवघ्या २८ वर्षाचा तरुण. वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावचा हा तरुण वास्को (गोवा) येथे शिपिंग कंपनीत कामाला जायचा. संचारबंदीच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरु असल्याने आड मार्गाने नोकरीवर (वास्को-गोवा) जाण्याशिवाय दुसरा पर्याय गीतेश गोपाळ गावडे या युवकाकडे नव्हता. हा आड मार्गच त्याच्या जीवावर बेतला. २३ जुलै रोजी सकाळी पोलीसांची नाकाबंदी चुकवून बांदा गाळेल मार्गे आपल्या दुचाकीने तो निघाला होता. त्याचवेळी त्याच्यावर दरडी कोसळली. आठ दिवसानंतर त्याचा मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडला.

उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्याने जिल्ह्यात नाव कमावले होते. तो शांत स्वभावाचा व मनमिळावू असल्याने त्याचा मोठा मित्र परिवार खूप मोठा होता. घरची गरिबी आणि सर्वस्वी कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर असल्याने त्याला नोकरीवर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण कोरोना महामारीच्या नावाखाली प्रशासनाने लादलेले घातक नियम-निर्बंध त्याला आडमार्गाने जाण्यास भाग पाडत होते. शेवटी गीतेश गावडे ह्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. त्याच्या कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे; त्याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न ह्या प्रसंगातून निर्माण होत आहेत. त्यासंदर्भात लिहिलेला लेख सिंधुदुर्गातील विकासाचे वास्तववादी चित्र स्पष्ट करतो!                                                                            -संपादक

 

अष्टपैलू खेळाडू कु. गीतेश गावडे ते क्षणार्धात कै. गीतेश गावडे…
युवकांच्या रोजगाराचा जीवघेणा प्रवास थांबायला हवा!

आज अष्टपैलू खेळाडू कु. गीतेश गावडे ते क्षणार्धात कै. गीतेश गावडे लिहिण्याची वेळ आली. तसं बघायला गेलं तर हे अगदी सामान्य आहे; जो जन्मला तो कधी ना कधी मरणारच आहे; पण गीतेशच्या बातमीने खूप मोठा धक्का बसला. हे आमच्यापेक्षा त्याच्या आईवडिलांना जास्त धक्कादायक आहे. आपल्या सगळ्यांचं तर फक्त मैत्रीचं नातं होतं त्याच्याशी! पण ज्या घरातला कर्ता मुलगा गेला; त्यांना काय जाणवत असेल? त्याची कल्पनाच नाही करवत.

गीतेश किती सरळ, साधा आणि लोकप्रिय होता; हे त्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, तो बघा म्हणजे कळेल. क्रिकेट सामना संपल्यानंतर त्याचं मनोगत ऐकण्यासाठी लोकं उत्सुक असायचे. त्याच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या पडायच्या, आयोजक म्हणायचे की “गीतेश, तुझा संघ मागच्या वर्षी या स्पर्धेत सहभागी झाला असता तर विजेता तूच असतास!”.एवढा विश्वास त्या क्रिकेटपटूवर होता लोकांचा. गीतेश एवढा सरळ होता की कोणताही माज, गर्व नव्हता त्याला त्याच्या कौशल्याचा!

असे कित्येक `गीतेश’ त्या किंवा इतर रस्त्यावरून ऊन- पाऊस- थंडीत सिंधुदुर्ग-गोवा प्रवास दररोज करतात. लॉकडाऊनचे निर्बंध असल्याने गोव्याला जाणारा मुख्य रस्ता बंद; त्यात प्रवेशबंदी! पण नोकरी वाचविण्यासाठी तरूण-तरुणी जीवाची पर्वा न करता छुप्या रस्त्याने ये-जा करतात. असे कित्येक `गीतेश’ आपला जीवन प्रवास याच रस्त्यावर अर्धवट सोडून निघून गेले. ह्याची नोंद ना प्रशासनाने घेतली, ना राज्यकर्त्यांनी घेतली, ना राजकीय पुढाऱ्यांनी घेतली. ना आपल्या जिल्ह्यातील कोणा स्वयंघोषित कार्यसम्राटांनी घेतली. त्याची दखल घ्यावी, असे त्यांना वाटलंच नसेल हो!

आता काहीजण उठून जागे होतील आणि म्हणतील आम्ही खूप सुधारणा केल्या, खूप सोयी पुरविल्या; सिंधुदुर्गातील लोकांसाठी. अरे मग काय झालं? त्याचसाठी तर निवडून देतात तुम्हाला मतदार! काही सुविधा देऊन उपकाराची भाषा करत असाल तर मग नका करू, घरी बसा! दुसरा कोणीतरी येईल आणि करेल. ज्या सुविधा देताय, त्या का देता? ते न कळण्याएवढी जनता मूर्ख नाही! जिथे तुम्हाला तुमचा फायदा दिसतो, तेच तुम्ही करता. नवीन गावातील मतांची बेरीज गोळा करण्यासाठी नवीन रस्ते फटाफट मंजूर होतात.

असंख्य नवीन रस्ते बांधले जातात किंवा जुन्या खराब रस्त्यांची दुरुस्ती दरवर्षी केली जाते. पण एकदा बांधलेला रस्ता किमान तुमचा कार्यकाल असेपर्यंत तरी पाच वर्षे टिकू दे, पण इथे तर एका पावसातच धुवून जातोय रस्ता. त्या निविदा स्वीकारत असताना त्या ठेकेदाराकडून सदर रस्ता किमान किती वर्षं शाबूत राहील याची काही खात्री लिहून घेतली जात असेल की नाही? असेल तर मग ती पूर्ण न झाल्यास अशी कोणावर कारवाई होत असेल का? नसेल तर ती करणे गरजेचं आहे.

आजच्या घडीला गोवा राज्यातील कित्येक कंपन्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलां- मुलींच्या जीवावर चालतात असं नाही म्हणणार; पण त्यांच्या योगदानामुळे चालू आहेत हे मात्र नक्की आणि हे कित्येक वर्षे चालू आहे. का गरज पडते, आज युवकांना गोव्यात जाऊन नोकरी करण्याची? कित्येक मुली तिथे एका छोट्याशा खोलीत पाच सहा जणी राहतात, कधीकधी जेवण बनवून खातात, कधी दमून आल्या की अश्याच उपाशी झोपतात. त्यांना नोकरी करून मिळणारा मोबदला एवढा नसतो की नेहमी बाहेरून काही मागवून खावं. कित्येकजण तर घरभाडे, जेवणाचा खर्च वाचविण्यासाठी रोज घरी ये-जा करतात. पण मुळातच ह्या तरूण तरुणींना तिकडे जायची गरजच का भासते? का नाही त्यांना आपल्याच गावात, जिल्ह्यात नोकरी- व्यवसायाचा पर्याय उपलब्ध होत. जर त्या मुलांमध्ये कौशल्य नसेल, पात्रता नसेल तर मग त्यांना त्याठिकाणी कोणी नोकरी दिली असती का? त्यांच्यात कुवत आहे, धमक आहे आपल्या ज्ञानाचा उपयोग ते आपल्या कंपनीसाठी देऊ शकतात. जर जिल्ह्यात अशाप्रकारे रोजगार उपलब्ध झाला तर त्याचा खूप जास्त मोबदला आपल्याच मुलांना मिळेल.

आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कित्येक ठिकाणी एमआयडीसी मंजूर आणि अर्धवट बंद अवस्थेत पडून आहेत. कित्येक कारखाने मरणासन्न अवस्थेत आहेत. त्यांना पुनरुज्जीवित करून कित्येक कर्त्या हातांना रोजगार मिळू शकतो. कित्येक ठिकाणी जागा ओसाड पडून आहेत. आडजागी का होईना; जर काही कारखाने, कंपन्या सुरू झाल्या तर कित्येक तरुण-तरुणींना नोकरी मिळेल, कित्येकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. उद्या सकाळी तीच अडगळीची वाटणारी जागा प्रसिध्द होऊ शकते. आज जिल्ह्यात गणेशोत्सव, दिवाळी, होळी इत्यादी सण खूप व्यापक प्रमाणात साजरे होतात, त्या सणात होणारी खरेदी मुंबई, गोवा, कोल्हापूर इत्यादी ठिकाणाहून केली जाते. पण तेच जर इथेच उपलब्ध झालं तर मग कोणाला कुठे जायची गरजच नाही पडणार. सगळ्या गोष्टी इथेच बनविल्या गेल्यातर कितीतरी जणांना त्याचा फायदा होऊ शकतो.

आता पुढील प्रश्न आहे की आपण ह्या कार्यसम्राटांवर अवलंबून का आहोत. तर हो, ह्यांना न सांगता काही करायला गेलो तर ती कंपनी चालू व्हायच्या आधीच बंद होऊ शकते; ही भीती कायम मनात असते. काही दिवसांपूर्वी सर्व पक्षीय नेते एकत्र येत असल्याची बातमी समोर आलेली. देव करो आणि ती खरी होवो म्हणजे कोणी विरोधकच नाही राहिला तर कामे पटापट होतील.

म्हणूनच सर्व राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे की जे काही आपले संपर्क असतील ते फक्त आपल्यापुरते मर्यादित नका ठेवू, त्याचा उपयोग करून इथेच आपल्या मुलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्या, भले त्या कंपनीचे मालक तुम्ही राहा; पण मुलांना वाचविण्यासाठी पुढाकार घ्या. आयुष्य काय असतं? हे कळायच्या आधीच त्यांना नका मारू!

-किसन रामचंद्र पेडणेकर
(संपर्क 7709334235)

You cannot copy content of this page