अनिरुद्ध पहाट-३ `हा साईच गजानन गणपती। साईच भगवती सरस्वती।’

।। हरि ॐ।।

माझा परमात्मा, माझा सद्गुरू कसा आहे? अर्थात आपल्या सद्गुरूंचे गुणसंकीर्तन करताना, नामस्मरण करताना श्रीसाईसच्चरितकार हेमाडपंत श्रीसाईसच्चरित ग्रंथातील पहिल्या अध्यायात काय म्हणतात? हे लक्षात घ्यायला पाहिजे!

हा साईच गजानन गणपती।
हा साईच घेऊनि परशू हातीं।
करोनि विघ्नविच्छित्ती ।
निज व्युत्पत्ति करु कां ||१०||
हाचि भालचंद्र गजानन।
हाचि एकदंत गजकर्ण।
हाचि विकट भग्नरदन|
हा विघ्नकानन-विच्छेदक ||११||
हे सर्वमंगलमांगल्या।
लंबोदरा गणराया।
अभेदरुपा साई सदया।
निजसुखनिलया नेईं गा।।१२ ।।

भावार्थ:- हा साईच गजानन गणपती आहे. हा साईच हातात परशू घेऊन विघ्नांचा नाश करून स्वतःच स्वत:चे सविस्तर निरूपण (व्युत्पत्ति) करणारा आहे. हाच भालचंद्र (कपाळावर चंद्र शोभा देत असलेला), गजानन (हत्तीचे तोंड असलेला) आहे. हाच एकदन्त (एकच दात असलला), गजकर्ण (हत्तीसारखे मोठे कान असलेला) आहे. हाच विकट (प्रचंड किंवा मोठा), भग्नरदन (दात तुटलेला) आहे, आणि हाच विघ्नरूपी अरण्याचा चुराडा करणारा (विघ्न-कानन-विच्छेदक) आहे. हे सर्व मगल-मांगल्या (सर्व कल्याणकारी गोष्टींपेक्षा कल्याणकारी), लंबोदरा, साईनाथांशी एकरूप असणाऱ्या (साईअभेदरूपा) कृपाळू गणराया! मला आत्मसुखाच्या ठिकाणी (निलया) घेऊन जा.

साईच भगवती सरस्वती।
ॐकारवीणा घेऊनि हातीं।
निजचरित्र स्वयेंचि गाती।
उद्धारस्थिती भक्तांच्या।।१७ ।।

भावार्थ:- श्रीसाई भगवान स्वत:च भगवती सरस्वती होऊन ॐकार वीणा हातात घेऊन स्वत:चे चरित्र भक्तांच्या उद्धारासाठी स्वत:च गात आहेत.

हे साईनाथ स्वप्रकाश।
आम्हां तुम्हीच गणाधीश।
सावित्रीश किंवा रमेश।
अथवा उमेश तुम्हीच।।१९ ||
तुम्हीच आम्हांतें सदगुरु।
तुम्हीच भवनदीचे तारुं।
आम्ही भक्त त्यांतील उत्तारु।
पैल पारु दाविजे।।२०।।
कांहीतरी असल्याशिवाय।
पूर्वजन्मींचे सुकृत्तोपाय।
केवी जोडतील हे पाय।
ऐसा ठाय आम्हांतें।।२१।।

भावार्थ:- हे स्वयंप्रकाशी साईनाथा आम्हाला तुम्हीच गणपती आहात, तुम्हीच ब्रह्मा (सावित्रीश), विष्णू (रमेश) किंवा शंकर (उमेश) आहात. तुम्हीच आमचे सद्गरू आहात. तुम्हीच संसाररूपी नदीतील (भवनदी) नौका (तारु) आहात. त्यातील आम्हा उतारू भकांना पलीकडला किनारा (पैलपारू) दाखवा. काहीतरी पूर्वजन्मीचे चांगल्या कर्माचे साधन (सुकृत-उपाय) असल्याशिवाय हे पाय कसे जोडले जातील आणि हे ठिकाण आम्हाला कसे लाभेल?

असंच आपल्याला परमात्म्याचे, सद्गुरुंचे गुणसंकीर्तन करता आले पाहिजे किंवा असं गुणसंकीर्तन कोणी केलं असेल – करीत असेल ते श्रवण करता आलं पाहिजे. हीच त्या सद्गुरूची खरीखुरी भक्ती ठरेल!

-`स्टार वृत्त’ ०२०५२०२५

अनिरुद्ध पहाट-१ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

अनिरुद्ध पहाट-२ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!