वाट चुकल्या जीवनी तू ध्रुवतारा, भक्तीवेड्या पामरांना तारणारा

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक बारावा

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

सर्व मार्गांमध्ये, मज असे भक्ती प्रिय ।
जन्म-जीवन-मृत्यू तुमचे काहीही न व्यर्थ जाय ॥

भक्ती हा त्रिविक्रमांचा प्रिय मार्ग असल्यामुळे त्रिविक्रम अनिरुद्धांनी याविषयी ग्रंथांमध्ये, प्रवचनांमध्ये भरभरून सांगितले आहे. ‘भक्ती कशी करायची’ हे स्वतः करून दाखवले आहे. आम्हाला गरज आहे फक्त ते अभ्यासण्याची, जेवढे आठवेल त्याची सतत उजळणी करण्याची आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करण्याची.

अग्रलेखांमध्ये बापूंनी नारदांच्या भक्तीसूत्रांविषयी लिहीले होते. त्यातील दोन सूत्रे पाहू

सात्वस्मिन्परमप्रेमरूपा ॥ २ ॥
ती (भक्ती), या, प्रत्यक्ष नित्यअपरोक्ष परमात्म स्वरूपाचे ठिकाणी, परमप्रेम असणे हेच तिचे स्वरूप (अशी आहे).

‘अस्मिन्’ म्हणजे ‘या’. हा शब्द अखंड जवळीक दाखवतो. सतत आमच्या अतिशय जवळ असणाऱ्या किंबहुना आमच्या आतच असणाऱ्या परमात्म्यावर परमप्रेम म्हणजे भक्ती. आम्ही बाहेरच्या इतर गोष्टींवर, गरजांवर जितके प्रेम करतो; त्याहून जास्त प्रेम म्हणजे परम प्रेम. सर्वोच्च Priority.

आपण स्वतःवर जितके प्रेम करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे म्हणजेच ‘ भक्ती ‘ होय
मधुफलवाटिका ९

अर्चनभक्ती, श्रवणभक्ती, पादसंवाहन या सर्व उपचारांना तेव्हाच अर्थ प्राप्त होतो; जेव्हा त्यामागे परमात्म्याविषयी उत्कट प्रेम असते. अन्यथा ते केवळ उपचार ठरतात. प्रेमाविना उपचार हे एकापुढे एक काढलेल्या शून्यांसारखे असतात. त्यांना काही किंमत नसते. प्रेम हे त्यांच्या आधी काढलेल्या आकड्यासारखे असते. ते असले तर पुढच्या शून्यांना जी काय ती किंमत! आधी अंक असला की शून्यांची किंमत वाढते आणि ती शून्ये अंकाचीही किंमत वाढवितात.
प्रेमही अत्यावश्यक आणि त्याची अभिव्यक्ती म्हणून होणारे उपचारही मौल्यवान.

श्रीभगवान कृष्ण म्हणतात,
एक भाव नाही माझा । तरी पाल्हाळ ते ॥
ज्ञानेश्वरी ९/४३२.

सा तु कर्मज्ञानयोगेभ्योऽप्यधिकतरा ॥ २५ ॥
अर्थ : ती (भक्ती) तर कर्म, ज्ञान, व योगापेक्षाही श्रेष्ठतर आहे.

नारदही भक्तिमार्गाचे श्रेष्ठत्व सांगतात. असे का ? तर इतर सर्व मार्गांना काहीतरी पात्रता लागते. ज्ञानमार्गात अभ्यास लागतो. योगमार्गात यमनियम आदींचे पालन लागते. भक्तीमार्गात मात्र कोणतीही पात्रता अनिवार्य नाही. देवानेच दिलेली प्रेम करण्याची क्षमता त्याच्यासाठीच वापरायची असते. अडाणी, अशिक्षित, निर्धन, पापी माणूसही भक्तीचा अधिकारी असतो. म्हणूनच परमात्म्याला भक्ती हीच सर्वात जास्त प्रिय आहे.

मी श्रीरामांचा वानरसैनिक आहे आणि युद्ध श्रीरामच करणार आहेत, रावणाचा नाशही श्रीरामच करणार आहेत. असा भगवंतावर पूर्ण अवलंबून असणारा भक्तिमार्ग!

वानरसैनिकाने स्वतःचे सामर्थ्य सातत्याने वाढवतच राहणे एवढाच माझा भक्तिमार्ग. ( हनुमंत बिभीषण भरत व शबरी यांचे आचरण).
प्रेमप्रवास. निर्धार ४

कोणाच्या आचरणाचा अभ्यास करायचा आणि अनुकरण करायचे हेही बापूंनी स्पष्ट सांगितले आहे.

जन्म कुठे होणार हे आमच्या हातात नसते आणि मृत्यूचा क्षणही माहित नसतो. ते व्यर्थ होणार की कारणी लागणार हे फक्त त्या भगवंतालाच माहित असते. भक्ती करणाऱ्या घरात जन्म आणि अंतकाळी हरिनाम मनात असणे हे केवळ त्याच्याच कृपेने शक्य असते. श्रीसाईसच्चरितात हेमाडपंतही हेच सांगतात

परमभाग्यें हा नरजन्म । महत्पुण्यें ब्राम्हाणवर्ण । ईशकृपें साईचे चरण । लाभ हा संपूर्ण अलभ्य ॥
श्रीसाईसच्चरित ८/४९

आयुष्यभर जागृत राहिला । अंतकाळीं जरी कां निदेला । तरी तो शेवटीं फुकट गेला । यदर्थ केला सत्संग ॥
म्हणूनि जे भक्त भावार्थी । ते जीव निरविती संतांहातीं । कीं ते जाणती गती – निर्गती । अंतींचे सांगाती ते एक ॥
श्रीसाईसच्चरित ३१/ ९,१०

आता उरले जन्म आणि मृत्यू या दोन क्षणांच्या मध्ये असणारे जीवन. उचित पुरुषार्थ करून हे जीवन सार्थ करणे हे मात्र आपल्या हातात असते. पण यासाठी त्या जीवनाचा आणि हिताचा विचार तर आधी व्हायला हवा. त्यासाठी जीवनाचे नियंत्रण बुध्दीकडे असायला हवे, मनाकडे नाही. कारण मन हे दुर्बळ आणि चंचल असते.

दिवा तोपर्यंतच प्रकाश देतो, जोपर्यंत त्याला विजेचा पुरवठा होत आहे. त्याचप्रमाणे बुद्धी मनाला तोपर्यंतच काबूत ठेवते, जोपर्यंत कुठल्याही प्रकारे भक्ती चालू आहे. -मधुफलवाटिका १०८

ही भक्ती करताना बऱ्याचवेळा फारच उथळपणा असतो. भगवंताने मला अमुक एक गोष्ट दिली नाही की भक्ती डळमळीत होते. कालांतराने विचार केल्यावर कळते की ती गोष्ट मिळाली असती तर अहितच झाले असते.

भक्तिमार्गामध्ये भक्ती करताना सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती सम्यक् दूरदृष्टीची.
– प्रेम प्रवास निर्धार ४

मन डळमळीत होते कारण जीवन हा एक संघर्ष आहे. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती येतात, प्रिय आणि अप्रिय गोष्टींची प्राप्ती होत राहते. या जीवनाला अर्थपूर्ण आणि यशस्वी बनविण्यासाठी लागणारे गुण परमात्माकडून आमच्यापर्यंत फक्त भक्तीद्वारेच येतात.

ह्या संघर्षासाठी आवश्यक असणारे धैर्य, नीतीमानता, शिस्तबद्धता, युद्धसामर्थ्य आणि उचित क्षमाशीलता हे गुण भगवंत मर्यादामार्गीयांस सातत्याने पुरवत राहतो व जीवनसंघर्षात यशस्वी करून परत कुठल्याही विध्वंसात भक्ताला तो टाकत नाही.
मधुफलवाटिका २५

भक्तीमध्ये कुठल्याही अवघड गोष्टींची गरज नसते. जीवनात आमच्याकडून चुका होत असतात. चूक आहे हे कळले तरी पुन्हा पुन्हा होत राहतात. मग काय करायचे ? नामस्मरण करत राहायचे. अतिशय प्रेमाने. ते नामच आम्हाला त्या नामी पर्यंत पोचवते, त्या नामी ची कृपा आमच्यापर्यंत आणते आणि जीवनाला अर्थ प्राप्त करून देते.

नामस्मरणाने चूक समजून येते, ती सुधारण्याची उर्मी उत्पन्न होते आणि चूक सुधारण्याची ताकदही मिळते. आणि हे सर्व काही ‘ त्या ‘ नामाच्या प्रभावाने आपोआप होत असते, मला फक्त नामावर व नामीवर प्रेम करायचे असते.
मधुफलवाटिका २५७

जीवन व्यर्थ होऊ नये म्हणून केलेले आमचे प्रयत्न तोकडे पडतात कारण आमच्या जीवनाची आम्ही कल्पना केलेली आकृती आणि आमच्या हातून घडणारी कृती यांचा ताळमेळ बसत नाही. कधी बसलाच तर त्याची दिशा चुकीची असते. यासाठीही भक्तीच कामी येते

प्रत्येक मानवाच्या मनात त्याची स्वतःची एक प्रतिमा घडलेली असते. या प्रतिमेस आपण मानवनिर्मित प्रतिमा म्हणूया, ही प्रतिमा आपणच आपली घडवत असतो. परंतु त्यासाठी आम्ही दोन प्रकारची उपकरणे वापरतो. एक उपकरण म्हणजे स्वतःचे स्वतःबद्दलचे मत, तर दुसरे म्हणजे इतरांचे माझ्याविषयी काय मत आहे असे माझे मत. परंतु ही दोन्ही उपकरणे चुकीची प्रतिमा निर्माण करतात व त्यामुळे मानवाच्या संपूर्ण जीवनाची आकृती कुरूप होऊन जाते.

खरे म्हणजे या मानवनिर्मित प्रतिमेच्या पलीकडे परमेश्‍वरी मन प्रत्येक जीवात्म्याची एक सुंदर आकृती घडवत असते आणि हीच आकृती मानवाला पूर्णाकृती व पूर्णरूप बनविते, एवढेच नव्हे तर पूर्ण सौंदर्यही याच आकृतीत असते. परंतु त्यासाठी मानवाला स्वतःच्या मनातील द्वंद्वांच्या पलीकडे जावे लागते व असे करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘ रससाधना ‘ होय.
मधुफलवाटिका २२६

म्हणजेच काय ? माझे जन्म, जीवन आणि मृत्यु व्यर्थ होऊ नये आणि सार्थकी लागावे यासाठी भक्ती आवश्यक आहे. कारण भक्तासाठी परमेश्वराकडे परिपूर्ण योजना असते.

संपूर्ण आयुष्य हा एक मोठा प्रवास आहे. नियोजनासाठी छोटे टप्पे आवश्यक असतात. आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा एक टप्पा आहे. त्याच्याकडे कसे पाहिले पाहिजे ? त्याचे नियोजन कसे करायचे ? हे बापूंनी सांगितले आहे.

सकाळी उठल्यावर जर चांगले पवित्र विचार असतील तर त्या दिवसाचा balance नीट राहतो. त्याचप्रमाणे, जर रात्रीच्या वेळी देखील पवित्र विचार मनात असतील तर रात्रीचाही balance नीट होतो.

सकाळी उठल्याबरोबर इष्ट देवतेचे स्मरण करायचे व I Love You म्हणायचे. रात्री झॊपताना देखील परमेश्वराचे स्मरण करत स्तोत्र म्हणायचे.

प्रत्येक दिवस हा नवीन जन्मच आहे. कारण प्रत्येक रात्र हे मृत्युचेच स्वरुप आहे.
– परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन
(२५ ऑगस्ट २०११)

संपूर्ण जीवनविकास प्रॅक्टिकल च्या आधारे पाहायचे झाले तर; आम्ही फक्त भक्ती करायचा प्रयास करून ‘त्या’च्या नामाचा उच्चार अखंड करायचा. त्यापुढे आमच्याकडून उचित कृती घडवून घेऊन आमची अर्थपूर्ण आकृती बनविण्याचे कष्ट हा अनिरुद्धच घेतो.

त्रिविक्रमा ,
वाट चुकल्या जीवनी तू ध्रुवतारा, भक्तीवेड्या पामरांना तारणारा…

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

– डाॅ आनंदसिंह बर्वे

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक अकरावा वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

You cannot copy content of this page