चाकरमान्यांना कृषी-मत्स्य पुरक सामुदायिक व्यवसायांमध्ये भवितव्य घडविण्याची सुवर्णसंधी! – भाई चव्हाण
कणकवली:- “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. आपल्या कोकणपट्टीचा विचार करता त्यापैकी कृषी – मस्त्यपुरक विविध योजना सामुदायिकरित्या इथेच यशस्वीपणे राबवू शकतो. आम्ही त्यादृष्टीने काही प्रकल्पांवर अभ्यासपूर्वक नियोजन करीत आहोत. कोरोनानंतरचे आपले भवितव्य गावातच राहून निर्माण करण्याची सुवर्णसंधी चाकरमान्यांसह आम्हां सर्वांसमोर आहे. सर्वांना सोबतच घेऊन आम्ही आखणी केली तर एक नवा इतिहास घडवू शकतो!” असा ठाम विश्वास कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, जेष्ठ पत्रकार गणपत ऊर्फ भाई चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
लिनिअर ब्लु लाईव्ह स्टाँक या मत्स्योत्पादन, कुक्कुटपालन, कोकणी मेवा आदी व्यवसायांशी संबंधित संस्थेचे पदाधिकारी, पेडणे-गोवा येथील सतीश नार्वेकर, सिंधुदुर्गचे अक्षय गुरव, संभाजी शेडगे, नामदेव सावंत, रत्नागिरीचे संजय चव्हाण, सागर नार्वेकर यांनी श्री चव्हाण यांच्याशी व्हिडीओ काँन्सफरद्धारे संपर्क साधून उपरोक्त प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. श्री. चव्हाण हे गेली काही वर्षें कोकण विकास आघाडी संघटनेच्या माध्यमातून कोकणात यशस्वी होणाऱ्या सर्व प्रकल्पांचा अभ्यास करीत आहेत.
कोकणातील जमिनी या बहुतांशी तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेल्या आहेत. अद्याप वाटण्या न झाल्यामुळे त्यावर अपेक्षित लागवड होऊ शकत नाही. त्यावर सामुदायिक शेती हाच पर्याय आहे; असे स्पष्ट करून श्री. चव्हाण यांनी लिनिअर ब्लु लाईव्हस्टाँक या संस्थेची कार्यपद्धती जाणून घेतल्या.
ही संस्था शेतकऱ्यांसह बचत गट, सधन गुंतवणूकदार यांच्या सहकार्याने प्राधान्याने कोकणासह महाराष्ट्रात अत्यंत किफायतशीर, दुप्पट-तिप्पट हमखास उत्पन्न देणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने अभ्यासपूर्वक काम करीत आहे. श्रीवर्धन येथील संशोधक विलास पारावे यांनी वर्षाला २५० ते ३०० अंडी देणारी देशी गावठी कोंबडीची जात पैदास केली आहे. त्याचे स्वामित्व (पेटंट) हक्क मिळविले आहेत. कोकणच्या विकासाला पुरक ठरतील अशा अन्य प्रकल्पांचे त्यांनी स्वामित्व हक्क मिळविले आहेत. कोकणामध्ये आजही खाडीच्या जमिनीवर तलाव खोदून वर्षाला दोनवेळा कोळंबी उत्पादन घेतले जाते. त्याऐवजी फ्रेंच तंत्रज्ञानावर आधारित जमिनीवर फायबरचे टँक उभारुन वर्षाला आठ-दहा कोळंबीसह माशांच्या बँच घेता येतील अशा बायोफ्लोक तंत्रज्ञानाने प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पांसाठी अनेकजण स्वत:च्या जमिनी भाडेतत्वावर देण्यासाठी पुढे आले आहेत. काहीजण भागीदारीत उत्सुक आहेत. बरेचशे गुंतवणूकदार तयार होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हामध्ये जूनमध्ये हा प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन आहे.
कोकणी मेवा महिला बचत गटांद्धारे तयार करून त्या ब्रँडच्या नावाने विकला जाणार आहे. रेफ्रिजरेटर वँनद्धारे मासे विक्री करण्याचा प्रकल्प मुंबईत कार्यान्वित केला असून शहरा-शहरांमध्ये तो राबविला जाणार आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये मनुष्यबळ मोठ्या स़ंख्येने लागणार आहे.
अशाप्रकारच्या प्रकल्पांमध्ये इच्छुक असलेल्यांनी अधिक माहितीसाठी ९४२२३८१९९३ या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











