संगनमताने काजू बीचे दर कोसळविले!- कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांचा आरोप

व्यापारी आणि कारखानदारांनी संगनमताने काजू बीचे दर कोसळविले!

काजू बीच्या हमी भावासाठी प्रसंगी संघर्ष करणार! -मोहन केळुसकर

कणकवली:- “व्यापारी आणि कारखानदारांनी संगनमताने काजू बीचे दर कोसळविले!” असा आरोप कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केला असून `काजू बीच्या हमी भावासाठी प्रयत्न करू आणि प्रसंगी संघर्ष करू’; असा निर्वाणीचा इशारा त्यांनी आपल्या पत्रकातून दिला आहे.

काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना यंदा किमान रू. १२० किलो दर मिळावा, यासाठी अनेक सामाजिक संस्थांसह राजकीय पक्षांनी सुद्धा विविध सनदशीर मार्गाने प्रयत्न केले. दोडामार्ग परिसरातील शेतकरी संस्थांनी जबाबदारी स्वीकारुन या भावाने काजू बी खरेदी करण्यास सुरुवात केली होती. मात्र या सर्वांच्या प्रयत्नावर व्यापारी-कारखानदारांनी साटलोटे करून कुरघोडी करीत काजू बीचे दर कोसळविले. किमान पुढील वर्षापासून काजू बीला हमीभाव मिळावा यासाठी सार्वत्रिक संघर्ष करणे अटळ आहे, असा इशारा कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष, पत्रकार मोहन केळुसकर यांनी पत्रकातून केला आहे.

कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर आपल्या पत्रकात म्हणतात की, १९७८ दरम्यान पुलोदचे शरद पवार मुख्यमंत्री असताना सहकार मंत्री असलेले प्रा. एन. डी. पाटील यांनी काजू बीला हमी भाव मिळावा म्हणून एकाधिकार खरेदी योजना जाहीर केली होती. मात्र त्यानंतरच्या एकाही सरकारने अथवा कोकणातील आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींनी ही योजना पुढे कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर यंदा गंभीर परिस्थिती ओढावली आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरीवर्ग अडचणीत असताना आणि केवळ ३० टक्के काजूचे उत्पादन असताना घाऊक व्यापारी-काजू कारखानदारांनी साटलोटे करीत सुरुवातीला रु. १५० दर देत असताना हळूहळू हा दर घसरवित रु. ७०/८० एवढा निम्म्यावर आणला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोविआने काजू बी खरेदी शेतकरी तालुका खरेदी-विक्री संघांनी करावी आणि जिल्हा बँकांनी आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी केली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी तातडीने हिरवा कंदील दाखविला. मात्र शेतकरी संघाचे सभासद हेच मुळात व्यापारी वृत्तीचे असल्याने त्यांना शेतकरी वर्गाबाबत आस्था नाही. त्यामुळे एकही संघ पुढे आला नाही.

दरम्यान कोविआने याबाबत आवाज उठवतात अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी काजू बीला किमान रु. १२० हमीभाव मिळावा यासाठी सर्वस्तरावरुन प्रयत्न केले. दोडामार्ग भागातील शेतकरी संघटनांनी जबाबदारी स्वीकारून या दराने खरेदीला सुरुवात केली. मात्र एकमेकांशी साटलोटे असलेल्या व्यापारी-कारखानदारांनी सर्वांच्या प्रयत्नावर नांगर फिरवून शेतकऱ्यांची लुट करून त्यांना नागवले आहे. म्हणूनच काजूचा पुढील हंगाम सुरु होण्याअगोदर काजू बीला हमी भाव मिळवून देण्यासाठी कोकणातील सर्व सामाजिक संस्थांनी संघटितरित्या प्रयत्न केले पाहिजेत. प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे! असे आवाहन कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केला आहे.

You cannot copy content of this page