देवळा येथील एसटी बसचा भीषण अपघात- २० ठार, ३५ जखमी

जखमींना तातडीने सर्व वैद्यकीय मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

नाशिक:- मालेगाव-देवळा रस्त्यावर धोबीघाटाजवळील देश-विदेश हॉटेलजवळ आज सायंकाळी एसटी बस-अपे रिक्षा यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण दुर्दैवी अपघातात चालकासह २० प्रवासी ठार झाले. तर ३५ जण जखमी झाले असून दोघांचा अद्याप शोध लागलेला नाही. ह्या अपघातात दोन्ही वाहने एका विहिरीत कोसळली. दुर्दैवी अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला असून जखमींना तातडीने योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

कळवण डेपोची उमराणे – देवळा बसचा टायर फुटल्याने बस अॅपे रिक्षाला धडकली. बसमध्ये एकूण ४३ प्रवासी होते.

जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र त्यांना आवश्यक तो सर्व औषधोपचार देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे. बचाव कार्य अधिक वेगाने व्हावे; यासाठी एनडीआरएफच्या जवानांची मदतही घ्यावी, तसेच मृत व जखमींच्या नातेवाईकांना सर्व आवश्यक सहाय्य करावे; असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

जखमींवर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व ९ डॉक्टर जातीने लक्ष ठेवून आहेत. अपघात झाल्याचे कळताच पाच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून विहिरीत पडलेली बसदेखील काढण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *