रा. प. च्या सर्व आस्थापनांचे परवाना शुल्क माफ करण्याची शासनाकडे वेलफेअर असोसिएशनची मागणी

कणकवली:- कोरोना महामारीमुळे एस. टी. ची राज्यातील प्रवाशी वाहतूक गेले दोन महिने पुर्णपणे बंद आहे. त्यांमुळे राज्यातील स्थानकांतील सर्व प्रकारच्या आस्थापना (दुकाने) बंद आहेत. त्यामुळे या सर्व आस्थापना परवानधारकांचे परवाना शुल्क (भाडे), स्थानिक कर इत्यादी एस. टी. ची प्रवाशी सेवा पुर्णपणे पुर्ववत सुरळीत होईपर्यंत पुर्ण माफ करण्यात यावे; अशी मागणी एस. टी. कँन्टीन व स्टाँल फरवानधारक वेलफेअर असोसिएशनने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि परिवहन अँड. अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासून राज्यातील एस. टी. ची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बस स्थानके, मार्गनिवारे यामधील सर्व परवानाधारकांच्या सर्व प्रकारच्या आस्थापना बंद आहेत. त्यांच्या कुटुंबियांची रोजी-रोटी बंद झाली आहे. त्यातच या आस्थापनांमध्ये असलेले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खराब झाल्याने दुहेरी नुकसान झाले आहे. त्यामुळे या सर्वांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडले आहे.

वास्तविक गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या कारणांमुळे एस. टी. चे प्रवाशी भारमान निम्म्यावर आले आहे. त्यामुळे या आस्थापना चालविणे आर्थिकदृष्ट्या नुकसानीचे झाले आहे. सबब राज्यातील विविध स्थानकांतील ४८ उपहारगृहासह अन्य शेकडो आस्थापना बंद झाल्या आहेत. त्यांच्या फेरनिविदांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे एस. टी.चे मोठे नुकसान होत आहे.

या पार्श्वभूमीवर सध्याचे परवानधारक दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने तो कसाबसा तग धरून या आस्थापना चालवित आहे. कोरोनामुळे त्यांच्या आर्थिक हलाखीत आणखी भर पडली आहे. शासनस्तरावर त्यांना कुठलीच मदत मिळत नाही. त्यामुळे दरमहाचे भाडे भरण्यास असमर्थ झाला आहे. तरी एस. टि. महामंडळासोबत प्रवाशांच्या सेवेसाठी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या या परवानधारकांचे एस. टी. ची प्रवासी सेवा पूर्णपणे पुर्ववत शंभर टक्के सुरळीत होईपर्यंत त्यांचे मासिक परवाना शुल्क आणि स्थानिक कर पूर्णपणे माफ करावे; अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष राम हराळ, सचिव आण्णासाहेब तिबोले यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेआणि परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page