इंटरनेट हाताळणाऱ्या प्रत्येकाने सायबर सुरक्षेत साक्षर होण्याचे आवाहन

मुंबई:- विविध प्रकारची संकेतस्थळे किंवा समाज माध्यमे हाताळताना तसेच इंटरनेट आधारे आर्थिक व्यवहार करताना पूर्णत: सजगता बाळगणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच या क्षेत्रातील फसवणुकीचे तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे इंटरनेट हाताळणाऱ्या प्रत्येकाने आता सायबर सुरक्षिततेविषयी साक्षर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी केले.

बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, महाराष्ट्र पोलीस तसेच महाराष्ट्र सायबर यांच्या वतीने काल वित्तीय व सामाजिक क्षेत्रातील सायबर गुन्हे रोखून त्यातील सुरक्षितता वाढविणे तसेच विवाहविषयक संकेतस्थळांवरील ऑनलाईन गैरप्रकारांना आळा घालण्यासंदर्भात एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला अत्याचार प्रतिबंधक तथा विशेष सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक डॉ. बालसिंग राजपूत, बॉम्बे चेंबरचे महासंचालक विजय श्रीरंगन, सायबरविषयक कायदे तज्ञ ॲड. प्रशांत माळी, सेठ असोसिएटस् लॉ फर्मच्या संस्थापक डॉ. कर्णिका सेठ आदी उपस्थित होते.

श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, सायबर गुन्हेगारांकडून विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. इंटरनेट तथा समाज माध्यमांवर कोणतीही माहिती गोपनीय किंवा खासगी राहील याची शाश्वती नाही. समाज माध्यमांवरील माहितीच्या आधारे आपल्या बँक व्यवहारविषयीचे पिनकोड किंवा सिक्युरिटी प्रश्नांचा अंदाज लावून सायबर गुन्हेगार अपहार करतात. त्यामुळे समाज माध्यमांवरही आपली माहिती देताना सजगता पाळणे गरजेचे आहे. विवाह विषयक संकेतस्थळांनी गैरप्रकार रोखण्यासाठी अधिक दक्ष होणे आवश्यक असून ग्राहकांची खात्रीशीर ओळख नोंदवण्यासाठी योग्य उपायोजना करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

महिला आणि बालकांविरोधी सायबर गुन्हे रोखण्यासाठी वेबपोर्टल

महिला आणि बालकांविरोधी सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्र शासनाने https://cybercrime.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. पॉर्नोग्राफी किंवा इतर कोणत्याही सायबर गुन्ह्यांप्रकरणी या वेबपोर्टलवर थेट तक्रार करता येते. या वेबपोर्टलवरील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक राज्यात नोडल ऑफिसर नेमण्यात आले असून राज्यात महाराष्ट्र सायबरकडून हे काम करण्यात येते. महिला आणि बालकांविरोधी सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणात या वेबपोर्टलवर थेट तक्रार करावी, असे आवाहनही ब्रिजेश सिंह यांनी यावेळी केले.

विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी यावेळी महिला आणि बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. महिलांसाठी सध्या १०९१ तसेच १०३ या क्रमांकावर हेल्पलाईन सुरु आहे. पण यात एकसूत्रीपणा रहावा यासाठी संपूर्ण देशभर लवकरच फक्त १८१ या क्रमांकाची हेल्पलाईन महिलांसाठी सुरु होणार आहे. तसेच बालकांच्या सुरक्षिततेसाठी १०९८ ही हेल्पलाईन सुरु आहे. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत हरविलेल्या अनेक बालकांना शोधून त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. बालके आणि महिलांची तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या असून पॉक्सो कायदा प्रभावीपणे राबविला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *