‘अतिथी देवो भव’चा प्रत्यय देणारी ‘न्याहरी निवास योजना’
कोकणातील विविध धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, विलोभनीय समुद्र किनारे, डोंगर रांगा, नदी, खाड्या याचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरे रायगड जिल्ह्यापासून सारख्याच अंतरावर आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयी म्हणजेच अलिबागला येणे सहज शक्य होते. सहकुटूंब येऊन अलिबाग, मांडवा, सासवणे, किहिम, चोंढी, आक्षी, चौल, रेवदंडा, नागाव, काशिद आणि मुरुड या ठिकाणी २-३ दिवस थांबून पर्यटनाचा आनंद पर्यटक घेत असतात. तसेच पर्यटक श्रीवर्धन, दिवेआगर, मुरुड, हर्णे दापोली तारकर्ली म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारीही मोठ्या प्रमाणात जातात.
या पर्यटकांची निवास, भोजन व्यवस्था व्हावी, त्यांना स्थानिक संस्कृतीची ओळख व्हावी आणि स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निवास व न्याहरीची योजना तयार केली आहे. रायगड जिल्ह्यात न्याहरी निवास योजनेची सुरुवात अलिबाग शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी सन १९८४ मध्ये कै. कांचनगौरी यशवंत बिर्जे काकूंनी केली. त्यांच्या घरचे अस्सल कोकणी चविचे खाद्यपदार्थ खाण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. त्याचबरोबर पर्यटन विकास महामंडळाने पाठविलेले हॉलंड, इंग्लंड, इस्त्राईल आदी विविध देशातील परदेशी पर्यटकांची सुद्धा येथे सतत ये-जा असते. काही विदेशी पर्यटक दर वर्ष दोन वर्षाने त्यांच्या टूमदार कौलारु घरी येत असतात. नियमित फोनवरुन बुकींगमुळे कायम त्यांचे घर पाहुण्यांनी भरलेले असते. आज त्यांची सूनबाई सौ. अश्विनी अजीत बिर्जे, चिरंजीव अजित यशवंत बिर्जे नातू यश अजीत बिर्जे हे येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तत्पर असतात.
या योजनेचे महत्त्व व फायदा लक्षात आल्यानंतर संपूर्ण कोकणात आतापर्यंत ६४० जणांनी नोंद केली असून त्यामुळे ३००० खोल्या पर्यटकांना उपलब्ध झाल्या आहेत. या योजनेमुळे घरमालकांपासून ते गावातील विविध लहान लहान व्यावसायिकांचे, सर्वांचे आर्थिक उत्पन्न वाढले. घरमालकांचे महाराष्ट्रातील विविध गावे शहरे येथील लोकांचे परिचय झाल्याने आंबा, काजू, चिंच, सफेद कांदे, सुकी-ओळी मासळीचा व्यवहार सरळ होऊ लागला. वाढत्या आर्थिक उत्पन्नामुळे जीवनमान उंचावले. पर्यटक येणार म्हणून संपूर्ण घर, परिसर नियमित स्वच्छ होऊ लागले. आपल्या घरासोबतच वाडी, परिसराचीही नियमित स्वच्छता देखभाल होऊ लागल्याने गावे अधिक टुमदार व देखणी झालीत. आपल्या गावाचे नाव सर्वत्र चांगले निघावे यासाठी रिक्षा, मोटरवाले पर्यटकांशी सौजन्यशील वागताना दिसतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कराल?
या योजनेत समाविष्ट होण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय, के.सी.महाविद्यालयाजवळ मुंबई येथून अथवा त्यांच्या वेबसाईटवरुन अधिकृत अर्ज घ्यावा. त्यामध्ये अर्जदाराचे नाव, संपूर्ण पत्ता, टेलिफोन ,मोबाईल नंबर, प्रकल्पाचे नाव, आपल्या येथे पर्यटकाला निसर्ग, शेती, काम हस्तकला संस्कृती, परंपरा जीवन शैली, एैतिहासिक वारसाची ठिकाणे, पर्यावरण, जंगले, शैक्षणिक सहलीसाठी ठिकाण, चहा कॉफी, दूध, नास्ता, मांसाहारी, शाकाहारी जेवण, राहण्याची सुविधा. आपल्या घराचे रंगीत फोटो, सोबत जागेचे मालकीपत्र सातबारा, मालकाचे संमतीपत्र पर्यटकाना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा जागेची, ग्रामपंचायत-नगरपालिका यांना भरलेली कराची पावती, वीज, पाणी, दुरध्वनीचे भरलेल्या बिलांच्या पावत्या, स्थानिक पोलीस पाटील, पोलीस अधीक्षक यांच्याकडून चारित्र्याचा दाखला, टूर पॅकेजची माहिती, खाद्यपदार्थांचे रेट कार्ड, अर्जदाराचे रंगीत फोटो, व १ वर्षाच्या नोंदणी कालावधीसाठी १०००/- रुपयाचा मुंबई येथे देय असलेला धनादेश महाराष्ट्र पर्यटन महामंडळ यांच्या नावे, सोबत लागतो. आणि पुढे नुतनीकरणासाठी रु.५०००/- भरावे लागतात. आपणास प्रमाणपत्र देण्यात येते. घरासमोर आपल्या ओळखपत्रावर महामंडळाचा लोगो लावावा लागतो. आपल्याबाबत तक्रार आल्यास खातरजमा, शहनिशा करुन परवाना रद्द करण्याचा अधिकार महामंडळाने आपल्याकडे ठेवला आहे. त्याचबरोबर २००/- रुपयाचा स्टँपपेपर वर अटीचे पालन करेन असे लिहून द्यावे लागते.
पर्यटन क्षेत्रात नेहमीच्या पर्यटनापेक्षा वेगळा अनुभव देणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकाच्या पर्यटन विकास महामंडळाने हा उपक्रम सुरु केला आहे. अधिक माहितीसाठीसाठी वरीष्ठ व्यवस्थापक, रवींद्र नाट्य मंदिर, ३ रा मजला, प्रभादेवी मुंबई.(022-24300413) येथे तसेच प्रादेशिक व्यवस्थापक, रत्नागिरी (02352-221508) सिंधुदुर्ग ओरस (02362-228785), कोल्हापूर (0231-2659435) नागपूर – (0712-2560687), पुणे-(020-26126867) औरंगाबाद-(0240-2334259) नाशिक-(0253-2570059), अमरावती-(0721-2661612) येथे संपर्क साधावा.
जयपाल पाटील, ज्येष्ठ पत्रकार –अलिबाग (‘महान्यूज’)