आरोग्य क्षेत्र-महाराष्ट्र देशात अव्वल

महाराष्ट्राला सर्वात जास्त ३० राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ३० आरोग्य संस्थांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ठरवून दिलेल्या राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानकात (एनक्यूएएस) बाजी मारली असून यात पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त १० प्राथमिक आरोग्यकेंद्रांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

येथील डॉ.राममनोहर लोहिया रूग्णालयाच्या पीजीआयएमईआर सभागृहात आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील गुणवत्ता’ विषयावरील राष्ट्रीय परिषदेत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राच्या (एनएचएसआरसी) कार्यकारी संचालक डॉ.रजनी देव, डॉ.राममनोहर लोहिया रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.के.तिवारी यावेळी मंचावर उपस्थित होते.

केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एनक्यूएएस मानक मिळविणाऱ्या देशातील विविध राज्यांतील आरोग्य केंद्र व रुग्णालयांना यावेळी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळ्यात सर्वात जास्त ३० पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम ठरले. राज्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागपूर येथील महिला रूग्णालय व उस्मानाबाद येथील ग्रामीण रूग्णालयाचा यावेळी सन्मान करण्यात आला.

१० प्राथमिक आरोग्य केंद्रासह पुणे जिल्हा राज्यात अव्वल

राज्यातून पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त १० प्राथमिक आरोग्य केंद्रांना यावेळी सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातील मान, वाघोली, सावरगाव, मोरगाव, लोणी काळभोर, काटेवाडी, उरळीकांचन, टाकळेहाजी, ताकवे, आणि खाडकला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना यावेळी सन्मानित करण्यात आले. संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रतिनिधींसह तालुका गुणवत्ता आश्वासक समन्वयक डॉ. अजित कारंजकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

यासोबतच नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा, मकरधोकडा आणि टाकळघाट या तीन प्राथमिक केंद्रांना आणि ठाणे जिल्ह्यातील धासई, दाभाड आणि दिवांजूर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील निवडे आणि चिखली, अकोला जिल्ह्यातील हिवरखेड आणि मळसूर, औरंगाबाद जिल्ह्यातील आळंद आणि गाणोरी या प्रत्येकी २ प्राथमिक आरोग्य केंद्राना यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच, पालघर जिल्ह्यातील घोलवड, जालना जिल्ह्यातील हसनाबाद, अहमदनगर जिल्ह्यातील आढळगाव, वर्धा जिल्ह्यातील साहुर ,धुळे जिल्ह्यातील होलनाथे आणि बुलडाणा जिल्ह्यातील हातेडी या प्रत्येकी एका प्राथमिक केंद्राला सन्मानित करण्यात आले.

राज्यातील महिला रुग्णालय व ग्रामीण रूग्णालयाचाही सन्मान

नागपूर येथील डागा मेमोरिअल महिला रूग्णालय आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रूग्णालयाचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्रात जास्तीत-जास्त आरोग्य संस्थांना एनक्यूएएस मानांकन मिळवून देण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणारे महाराष्ट्र राज्य गुणवत्ता आश्वासक समितीचे राज्य समन्वय अधिकारी डॉ.रामजी आडकेकर, राज्य कार्यक्रम अधिकारी डॉ.मयुरी संखे व अनामिका निगवाल यांचाही या पुरस्कार सोहळ्यात प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला.
(साभार-‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *