जपान आणि महाराष्ट्रादरम्यान पर्यटन विकासाला मिळणार चालना
जपान शिष्टमंडळाने घेतली मंत्री जयकुमार रावल यांची भेट
मुंबई:- जपानमधील वाकायामा प्रांत आणि महाराष्ट्रादरम्यान पर्यटनविषयक देवाण – घेवाण अधिक वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने या प्रांताचे वरिष्ठ अधिकारी योशिओ यामाशिता आणि कोयासान विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा.ओकुयामा यांच्यासह शिष्टमंडळाने राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील आणि विशेषत: मुंबईतील पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या जपानी भाषेतील माहितीपत्रकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
वाकायामा प्रांत आणि महाराष्ट्रादरम्यान पर्यटनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराचे नुतनीकरण करण्याच्या दृष्टीने यावेळी चर्चा झाली. जपानमध्ये संस्कृत आणि पाली भाषेचे मोठे आकर्षण असून तिथे या भाषांचा वापरही केला जातो. या दोन्ही भाषांची जन्मभूमी भारत असून या भाषांमधील शिक्षणाला चालना देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आणि वाकायामा प्रांत एकत्रीतरीत्या काम करेल, असे यावेळी पर्यटन मंत्री श्री.रावल यांनी सांगितले. दोन्ही राज्यात करण्यात आलेल्या सामंजस्य कराराची कक्षा वाढवून वाकायामा प्रांताने पर्यटन आणि सांस्कृतिक आदान – प्रदानासह आता आयटी, उद्योग आदी क्षेत्रातही महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन यावेळी मंत्री श्री.रावल यांनी केले.
बौद्ध संस्कृतीविषयक पर्यटनाला मिळणार चालना
भारत ही गौतम बुद्धांची भूमी आहे. बहुतांश जपानी नागरीक हे बौद्ध अनुयायी असून त्यांच्यासाठी भारत देश हा नेहमीच आकर्षणाचा केंद्र राहिला आहे. जपानी नागरीक मोठ्या संख्येने अजिंठा, वेरुळसह इतर बौद्ध लेण्या पाहण्यासाठी तसेच बौद्ध संस्कृती आणि पाली भाषा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रात येतात. भविष्यात या पर्यटनाला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने यावेळी चर्चा झाली. जपानमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही मंत्री श्री. रावल यांनी यावेळी दिली.
वाकायामा प्रांत आणि महाराष्ट्रादरम्यान धार्मिक पर्यटन, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची देवाण – घेवाण आणि पर्यटन विकास यासाठी वाकायामा प्रांत निश्चित काम करेल, असे यावेळी वाकायामा प्रांताचे वरिष्ठ अधिकारी योशिओ यामाशिता यांनी सांगितले.
यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, एमटीडीसीचे उपव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, शिष्टमंडळातील प्रतिनिधी श्री. नागानो, कोया शहराचे अधिकारी श्री.ओकाकीटा आदी मान्यवर उपस्थित होते. (‘महान्यूज’)