नैतिकता ही संसदीय लोकशाहीचा गाभा – सचिवालयाचे प्रधान सचिव
राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा ४८ वा अभ्यासवर्ग
नागपूर:-आपल्या दैनंदिन आयुष्यात नैतिक अधिष्ठान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नैतिकतेच्या बळावर अनेक कठीण प्रसंगामध्ये मार्ग काढणे सोपे जाते. केवळ दैनंदिन आयुष्यातच नाही, तर संस्थात्मक रचनांमध्येसुद्धा नैतिकता महत्त्वाची ठरते. आपल्या देशाने अंगिकारलेल्या संसदीय लोकशाही पद्धतीचा नैतिकता हा गाभा आहे. त्यामुळेच एक प्रगल्भ लोकशाही आपल्याला मिळाली आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी आज केले.
विधीमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत आयोजित ४८ व्या अभ्यासवर्गात ‘भारतीय संविधानाच्या संदर्भात जगातील राज्यघटनांचे तुलनात्मक विश्लेषण’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. अनंत कळसे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे सुनील झोरे उपस्थित होते.
लोकशाहीला चिरंतन ठेवण्यासाठी विधीमंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत श्री. कळसे म्हणाले, आपल्या देशाची संसदीय पद्धत ही सर्वंकष आहे. जगातील अत्युच्च घटकांचा समावेश घटनाकांरानी आपल्या राज्यघटनेत केला आहे. अमेरिका, इंग्लड, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या राज्यघटनांमधून देशाला प्रगतीसाठी पोषक ठरणारी तत्वे घटनाकारांनी घटनेत घेतली आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटना ही जगात श्रेष्ठ आहे.
श्री. कळसे म्हणाले, विधीमंडळात एखादी समस्या विविध संसदीय आयुधांमधून आली असल्यास तिचा त्वरित निपटारा होतो. जनतेला सुकर आयुष्य जगण्यासाठी योग्य त्या उपाययोजना विधीमंडळाच्या माध्यमातून करण्यात येतात. त्यामध्ये सत्ताधारी व विरोधक दोन्ही घटक आपआपली भूमिका चोख बजावित असतात. विधीमंडळात अनेकदा गोंधळ निर्माण होतो. हा गोंधळ विधीमंडळाचे कामकाज व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारी उपाययोजना अंमलात आणण्याकरिता असतो. त्यामुळे सभागृहात काहीच काम झाले नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. विधीमंडळाची प्रतिमा उच्च आहे. धोरणात्मक निर्णय, चर्चा, राज्याला पुढे नेण्यासाठी आवश्यक पद्धती विधीमंडळातच निर्माण करण्यात येतात.
प्रत्येकाने राज्यघटनेने दिलेले अधिकार चोख बजाविण्याचे आवाहन करीत डॉ. कळसे म्हणाले, प्रत्येक पात्र मतदाराने मतदान करावे. तरूणांनी मतदान प्रक्रियेत आवर्जून सहभाग नोंदवावा. राजकीय क्षेत्रात तरूणांनी यावे आणि आपल्या व्यवस्थेला बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत. सध्या सामाजिक माध्यमांचे युग आहे. सामाजिक माध्यमे हाताळताना कुठे अफवा तर पसरत नाही, ना याबाबत काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये तरूणाईच्या खांद्यावर जबाबदारी जास्त आहे. अफवांना पसरु देऊ नका. अशा अफवांमुळे निरपराध नागरिकांचे बळी जाण्याचे उदाहरण आपण पाहत आहोत. तरी सर्वांनी अगदी जबाबदारीने सामाजिक माध्यमांची हाताळणी करावी.
देशाच्या व राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी संसदीय लोकशाहीला बळकट करणे, समृद्ध करणे अत्यावश्यक आहे. देशाची लोकशाही पद्धती ही चिरकाल टिकणारी आहे. कारण देशाजवळ समृद्ध राज्यघटना आहे. तरी प्रत्येकाने आपल्या अधिकारांचा उपयोग करीत कर्तव्य पाळली पाहिजेत. त्यामुळे ही लोकशाही आणखी प्रगल्भ होईल, असा विश्वासही प्रधान सचिव डॉ. कळसे यांनी व्यक्त केला.
यावेळी सुनील झोरे यांनी डॉ. कळसे यांच्याबद्दल परिचय करून दिला. अभ्यासवर्गाच्या या सत्राचे आभार प्रदर्शन श्री. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील विद्यार्थी श्री सातपुते यांनी केले. अभ्यासवर्गाला विविध विद्यापीठांमधून आलेले प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होत्या. (‘महान्यूज’)