पूरग्रस्त भागातील पाणीपुरवठ्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी आज तातडीची बैठक
पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश
मुंबई:- मुसळधार पावसामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे या दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्या अनुषंगाने तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करून तातडीने सुरळीत करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दिले.
पूरग्रस्त भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना श्री. लोणीकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलरासु, प्रादेशिक मुख्य अभियंता श्री. भुजबळ यांना दिल्या आहेत.
राज्यातील अन्य भागापेक्षा कोल्हापूर, सांगली भागातील परिस्थिती बिकट आहे. या भागातील पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला स्वच्छता मोहीम व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने तात्पुरत्या उपाययोजना राबविण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या उद्भवाची तातडीने तपासणी करावी. त्याठिकाणी टी. सी.एल. पावडर, क्लोरिनचा वापर करून जे पाणी पिण्यालायक आहे, त्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा. तसेच या भागातील जे जलस्त्रोत दूषित आहेत, त्या जलस्त्रोतांची तातडीने तपासणी करून पाणी पिण्यायोग्य करण्यात यावे, अशा सूचना करून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना पिण्याच्या पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून देण्यासंदर्भात श्री. लोणीकर यांनी निर्देश दिले आहेत.
तसेच अन्य जिल्ह्यातून हातपंप दुरुस्ती व पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. जेणेकरून सर्व पिण्याच्या पाण्याच्या योजना तातडीने सुरू करता येवू शकतील. या भागातील अनेक विहिरी ढासळल्या आहेत. तर काही ठिकाणच्या बुजलेल्या आहेत. त्या सर्व योजनांचा सर्व्हे करून यामध्ये बाधित योजनामध्ये कोणत्या उपाय योजना करणे गरजेचे आहे, त्याचे तातडीने सर्व्हेक्षण करावे. तसेच या कामांचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हास्तरावरून उपलब्ध होणारा निधी तातडीने वापरण्यात यावा. तसेच इतर उपाययोजनांच्या बाबतीत शासनाला एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री. लोणीकर यांनी यावेळी दिले.
पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर जलजन्य आजार निर्माण होऊ नयेत, यासाठी सर्व उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच राज्यातील पूरस्थितीसंदर्भात व पूरग्रस्त भागातील पाणीपुरवठ्यासंदर्भात दि. 13ऑगस्ट 2019 रोजीच्या विभागाची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.