प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्याचे मच्छिमारांना आवाहन
मुंबई:- नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे क्रियाशील मच्छिमारांचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास मच्छिमारांच्या वारसदारास मदतीसाठी केंद्र शासन सहाय्यीत ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ सुरू करण्यात आली असून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी केले आहे.
केंद्र शासनाने राष्ट्रीय कल्याणकारी योजनांतर्गत भूजलाशयीन तसेच सागरी क्षेत्रातील नोंदणीकृत क्रियाशील मच्छिमारांसाठी ही योजना सुरु केली आहे. समुद्र, तलाव, नदी, डोह आदी ठिकाणी मासेमारी करीत असताना मच्छिमारांच्या जीविताला धोका उद्भवू शकतो हे लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. मच्छिमाराचा नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव होणाऱ्या अपघातामुळे मृत्यू ओढावल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यांच्या वारसांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत २ लाख रुपये व अंशत: अपंगत्व आल्यास त्यांच्या वारसांना १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच विशेष आकस्मिकता धोरणांतर्गत १० हजार रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च अनुज्ञेय असेल.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी परवानाधारक मच्छिमार नोंदणीकृत मच्छिमार संस्थेचा क्रियाशील सभासद असावा. १८ ते ७० वर्षे वयोगटातील क्रियाशील मच्छिमारांच्या कुटुंबियांना योजनेचा लाभ देण्यात येईल. मच्छिमारांनी संबंधित नोंदणीकृत मच्छीमार संस्थेमार्फत नोंदणी करताना संपूर्ण नाव व पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, जन्मतारखेचा दाखला, आधार क्रमांक, बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक व आयएफएससी क्रमांक, नामांकन करावयाच्या व्यक्तीचे नाव आदी माहिती देणे आवश्यक राहील. विम्याचा कालावधी १२ महिन्यांचा असेल. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही वर्गणी शुल्क आकारले जाणार नाही. (महान्युज)