यापुढे “एनटीए”व्दारे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा होणार
नवी दिल्ली:- ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (एनटीए) या स्वायत्त संस्थेच्यावतीने संगणकाद्वारे नीटसह इतर परीक्षा देशभर घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शास्त्री भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ ही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे गठीत स्वायत्त संस्था आहे. ही संस्था यापुढे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट), संयुक्त प्रवेश परीक्षे (जेईई)च्या मुख्य परीक्षा, विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा, सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा (सी-मॅट), पदवीधर फार्मसी योग्यता परीक्षा (जीपॅट) या राष्ट्रीय स्तराच्यावरील परीक्षा यापुढे ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ तर्फे संगणकाद्वारे घेण्यात येतील. परीक्षांचे अभ्यासक्रम, भाषेचा विकल्प, अथवा शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती श्री.जावडेकर यांनी दिली.
देशभरातून दरवर्षी नीट परीक्षा देणारे जवळपास १३ लाख विद्यार्थी असतात. संयुक्त प्रवेश परीक्षे (जेईई)ची मुख्य परीक्षा देणारे जवळपास १२ लाख विद्यार्थी असतात. जवळपास १२ लाख उमेदवार युजीसीची नेट परीक्षेला बसतात. १ लाख विद्यार्थी सीमॅटची परीक्षा देतात. तसेच जीपॅटची परीक्षा देणारे ४० हजारच्या जवळपास विद्यार्थी दरवर्षी असतात. या सर्व विद्यार्थ्यांसाठी संगणकीय परीक्षेचे नियोजन करण्यात आलेले असून ही परीक्षा यापुढे ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ घेणार असल्याचे श्री.जावडेकरांनी सांगितले.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षा या वर्षातून दोन वेळा घेण्यात येतील आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती श्री.जावडेकर यांनी दिली. यासह दोन वेळा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या परिक्षेत सर्वाधिक गुण मिळतील ते गुण ग्राह्य धरण्यात येतील, याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.
परीक्षांचे असे असेल वेळापत्रक
यावर्षी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्यावतीने घेण्यात येणाऱ्या परिक्षेचे अपेक्षित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
युजीसी-नेट ही परीक्षा दिनांक २ आणि दि. १६ डिसेंबर २०१८ ला दोन सत्रात होणे अपेक्षित आहे. या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची कालावधी हा दि. १ ते ३० सप्टेंबर २०१८ असणार आहे. या परीक्षेचा निकाल जानेवारी २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात लागू शकेल.
जेईईची मुख्य परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाईन अर्ज दि. १ ते ३० सप्टेंबर २०१८ दरम्यान भरता येणार असून ही परीक्षा दिनांक ६ ते २० जानेवारी २०१९ च्या दरम्यान ८ वेळा होणार असून उमेदवार कोणत्याही एका तारखेला परिक्षेस बसू शकतील. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०१९ च्या पहिल्या आठवड्यात लागू शकेल.
जेईइची-मुख्य परीक्षा दुसऱ्यांदा ७ ते २१ एप्रिल २०१९ दरम्यान ८ वेळा होणार असून उमेदवार या परीक्षेलाही कोणत्याही एका तारखेला बसु शकतील. या परीक्षेला बसण्यासाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ऑनलाईन अर्ज भरता येतील. या परीक्षेचा निकाल मे २०१९ च्या पहिल्या आठवड्यात लागू शकेल.
राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा ही पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मे २०१९ मध्ये होणार. फेब्रुवारी २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी दिनांक १ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. दि. ३ ते १७ फेब्रुवारी २०१९ च्या दरम्यान ८ वेळा होणार असून विद्यार्थी कोणत्याही एका तारखेला परीक्षा देऊ शकतील. या परीक्षेचा निकाल मार्चच्या २०१९ मध्ये लागू शकेल.
राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा दुसऱ्यांदा दि. १२ ते २६ मे २०१९ दरम्यान होणार असून यासाठी मार्च २०१९ च्या दुसऱ्या आठवड्यात ऑनलाईन अर्ज भरता येणार. या परीक्षेचा निकाल जून २०१९ च्या पहिल्या आठवड्यात लागणे अपेक्षित आहे.
सीमॅट आणि जीपॅट ही परीक्षा जानेवारी २०१९ मध्ये होणे अपेक्षित असून दिनांक २२ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येऊ शकतील. या परीक्षा दिनांक २७ जानेवारी २०१९ ला होऊ शकतात. तर या परीक्षांचे निकाल फेब्रुवारी २०१९ च्या पहिल्या आठवड्यात लागणे अपेक्षित आहेत. (‘महान्यूज’)