राजधानीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दालन ठरतेय आकर्षण

नवी दिल्ली:- सामाजिक वनीकरण, प्लास्टिक बंदी, इज ऑफ डुईंग बिजनेस, व्याघ्र प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा आदि विषयांचे प्रभावी सादरीकरण असणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दालन येथील केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने आयोजित प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरत आहे.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनाच्या परिसरात चार दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रिय पर्यावरण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते आज या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले.

देश व विदेशातील विविध संस्थांच्या विविध दालनांमध्ये महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दालन आकर्षण ठरत आहे. संपूर्णपणे कागद विरहीत, पुरेपूर तंत्रज्ञाचा वापर असलेल्या ह्या दालनात आवाजाचे प्रदूषण रोखत हेडफोनचा वापर करून ग्लोबल वॉर्मिंगची माहिती देणारी विशेष चित्रफित बघणाऱ्यांची गर्दी बघायला मिळते.

राज्यातील प्लास्टिक बंदी व त्याची अंमलबजावणी, संगणक प्रणालीच्या माध्यमातून कामकाजातून आणलेली पारदर्शकता वेगळ्या आदर्शाचा वस्तूपाठ ठरत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संपूर्ण संगणीकरणामुळे पारदर्शी व्यवहार, वेळेवर काम असे अनेक फायदे उद्योजकांना लाभत आहेत. यासंदर्भातील आकर्षक मांडणी प्रदर्शनीस भेट देणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करीत आहे.

हे प्रदर्शन ५ जून २०१८ पर्यंत चालणार असून सर्वांसाठी खुले राहणार आहे. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *