राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला कलचाचणी २०१८ चा अहवाल

१७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांची कल चाचणी महाकरियर मित्र पोर्टलवर अहवाल उपलब्ध

मुंबई:- दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कल चाचणी २०१८ चा अहवाल आज जाहीर करण्यात आला असून यावर्षी वाणिज्य क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल हा सर्वाधिक दिसून आला आहे. २०१८ मध्ये १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिली आहे. या कल चाचणीचा सविस्तर अहवाल www.mahacareermitra.in वर उपलब्ध असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कल चाचणी २०१८ चा अहवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज जाहीर केला. त्यानंतर श्री. तावडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचायला मदत करण्याचा महाराष्ट्र शासनाचा दृष्टिकोन आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये कल चाचणी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच घेण्याचा शासनाचा मनोदय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

२०१८ या वर्षामध्ये १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली. ही कल चाचणी विद्यार्थ्यांचे ७ प्रमुख क्षेत्रातील कलाचे परीक्षण करते. २०१७ च्या कल चाचणी अहवालानुसार विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल हा ललित कला म्हणजेच (fine arts) या क्षेत्रात सर्वाधिक दिसून आला होता. तर यावर्षी २०१८ मध्ये वाणिज्य क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल सर्वाधिक दिसून येत आहे.

शैक्षणिक भविष्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने २०१६ पासून दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कलचाचणीचा उपक्रम सुरू करण्यात आला. ज्याअंतर्गत या मुलांचा कल ओळखू शकणारी चाचणी घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची कल चाचणी घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

कल चाचणी हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांचा संयुक्त प्रकल्प असून श्यामची आई फाऊंडेशन हे सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) च्या साहाय्याने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये सहकार्य करीत आहे. कल चाचणी प्रत्येक विद्यार्थ्याला करिअर निवड करण्यास मदत करते.

याशिवाय विद्यार्थ्यांना कल अहवालाबाबत शालेय स्तरावर अधिक मार्गदर्शन मिळावे या हेतूने महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने १२ हजार शासकीय व शासन अनुदानित माध्यमिक विद्यालयांमधील एक मुख्याध्यापक व २ शिक्षक यांना ‘अविरत’ या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित केले आहे. याद्वारे ४१,६०७ शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले आहे. पुढील मार्गदर्शनासाठी विद्यार्थी पोर्टलवर दिलेल्या त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था (DIECPD) केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

www.mahacareermitra.in वरून मिळवा अहवाल

विद्यार्थी त्यांच्या एसएससी बोर्ड क्रमांकाच्या आधारे त्यांचा कल चाचणी अहवाल ऑनलाईन प्राप्त करू शकतात. त्यासाठी त्यांनी www.mahacareermitra.in या पोर्टलवर जाऊन मुखपृष्ठावर त्यांनी आपला हा क्रमांक प्रविष्ठ केल्यानंतर त्यांना त्यांचा कल चाचणीचा अहवाल मिळू शकेल. हा अहवाल विद्यार्थी डाऊनलोड करू शकतात. याचसोबत त्यांचा कल ज्या क्षेत्रात आला आहे त्या क्षेत्राविषयी माहिती सांगणारा व्हीडिओ ते पाहू शकतात. तसेच त्यांचा आवडक्षेत्रानुसार त्यांच्या जिल्ह्यातील अभ्यासक्रमांचा शोध ही त्यांना या पोर्टलद्वारे घेता येऊ शकतो. पोर्टलवर ७० हजारहून अधिक शासनमान्य अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली आहे. पालकांनी या शास्त्रशुद्ध कलचाचणीच्या आधारेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.

क्षेत्रनिहाय राज्यस्तरीय कल विश्लेषण

युनिफॉर्मडसेवा- १५%, कृषी-१३%, कला-११%, ललित कला-१८%, आरोग्य विज्ञान१२%, वाणिज्य- २१%, तांत्रिक- १०%,( सौजन्य- ‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *