राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्रसैनिक हे देशातील तरुणांचे आदर्श – राष्ट्रपती
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३४ व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन दिमाखात
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे ‘सेवा परमो धर्म’ हे ब्रीद वाक्य आहे. छात्रसैनिकांनी या मंत्राचा कधीही विसर पडू न देता मानवतेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज राहण्याचे आवाहन करून देशातील तरुणांचे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्रसैनिक हेच आदर्श असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज काढले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) मैदानावर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३४ व्या तुकडीतील छात्रसैनिकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत दिक्षांत संचलन केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छात्रसैनिकांच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी एनडीएचे कमांडन्ट एअर मार्शल आय. पी. बिपीन, डेप्युटी कमांडन्ट एस. के. ग्रेवाल, प्रबोधिनीचे प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, यांच्यासह सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी, राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, छात्रसैनिकांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, तुमच्या कठोर मेहनतीचे फळ आज तुम्हाला मिळत आहे. या यशात तेवढाच महत्त्वाचा वाटा तुमच्या आई वडिलांचा सुद्धा आहे. खडतर प्रशिक्षण हेच आपल्याला कठीणातील कठीण आव्हानासाठी सज्ज करत असते. शिस्त, धाडस, चिकाटी यांना पर्याय नाही. सशस्त्र सेना ही सर्वोत्कृष्ठता आणि समर्पणाचे प्रतिक आहे. येत्या आव्हानाच्या काळात सकारात्मक दृष्टिकोण हाच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. आता तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर काम सुरू कराल, अशावेळी एनडीएमध्ये मिळालेले प्रशिक्षण विसरू देऊ नका. देशाच्या लष्कराची मान उंचावण्यासाठी सदैव तयार रहा. सशस्त्र दलांचा सर्वोच्च कमांडर म्हणून, हा क्षण माझ्यासाठी खूप समाधानाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती पुढे म्हणाले, साठपेक्षा अधिक वर्षांचा वारसा लाभलेल्या आणि देशासाठी उत्तमोत्तम अधिकारी दिलेल्या एनडीए सारख्या संस्थेमधून पदवी प्राप्त करणे ही स्नातकांसाठी अभिमान बाळगावा अशीच गोष्ट आहे. कोणत्याही दलातील गणवेशधारी सैनिक हा संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असतो, सैनिकांना प्रत्येक ठिकाणी सन्मानच मिळत असतो. देशाच्या सीमा सुरक्षित करण्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही सैनिकांचे काम अद्वितीय असते. सैनिक केवळ शत्रूंशीच सामना करत नाहीत, तर सियाचीन, लद्दाख सारख्या ठिकाणी निसर्गाशीही सैनिकांना सामना करावा लागतो. सर्व आपत्तींशी सामना करत देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा सर्वांनाच अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अकॅडमी कॅडेट अक्षत राज याने सर्व शाखांमध्ये प्रथम येत राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर छात्रसैनिक सोहेल इस्लाम याने सर्व शाखांमध्ये दुसरा येत रौप्य पदकाचा सन्मान मिळविला. अली अहमद चौधरी याने तिसरे स्थान पटकावत कांस्य पदक मिळविले. ‘के’ स्क्वॉड्रनला ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ पुरस्कार मिळाला. विजेत्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी चेतक हेलिकॉप्टरने ध्वज सलामी देण्यात आली. सुखोई विमानांच्या तुकडीने आकाशात नयनरम्य प्रात्यक्षिके केली. यावेळी छात्र सैनिकांचे नातेवाईक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (‘महान्यूज’)